
राण्यांनू चुकलाच तुमचा...
२९ ऑगस्टच्या मोहोरसाठी चिंतन
राण्यांनू चुकलाच तुमचा...
शिवसेना, कॉँग्रेस, स्वत: स्थापन केलेला स्वाभिमानी पक्ष व त्यानंतर भाजपा अशा भिन्न विचारसारणीच्या पक्षांची गेल्या चार दशकात वारी केलेले माजी मुख्यमंत्री व विद्यमान केंद्रीय नेते नारायण राणे यांनी उध्दव ठाकरे यांविषयी काढलेल्या उद्गारानंतर त्यांना जेलची हवा खाली लागली. उध्दव ठाकरे यांच्याशी कितीही वैर असले तरीही आज ते मुख्यमंत्री आहेत व त्यांच्याविषयी बोलताना कसे शब्द वापरावयाचे याचे त्यांना भान राहिले नाही. केंद्रात मंत्रीपद मिळाल्यापासून राणेंच्या आक्रमक स्वभावाला खतपाणीच मिळाले आहे. भाजपाला शिवसेनेच्या विरोधात गरळ ओकण्यासाठी असा एखादा नेता हवाच होता. नेमकी ही जागा राणेच भरुन काढू शकतात हे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने ओळखून त्यांना हे मंत्रीपद बहाल केले होते. राणेंनी आपले काम योग्यरित्या बजावण्यास सुरुवात केले आहे असे म्हणण्यास वाव आहे. काही करुन शिवसेना व त्यांच्या नेतृत्वाला पर्यायाने महाविकास आघाडीला खिळखिळे करणे हा भाजपाचा अजेंडा आहे. त्यानुसारचे राणेंचा वापर करुन घेत आहेत. राणेंना हे कळत नाही असे नाही, परंतु आता त्यांना हे करण्याशिवाय काही पर्याय नाही. ते जर शिवसेनेच्या व उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलले नाहीत तर त्यांचे दिल्ली दरबारी वजन राहाणार नाही हे देखील तेवढेच खरे. राणेंना ज्यावेळी बाळासाहेबांनी मुक्यमंत्री केले त्यावेळी उध्दव सक्रिय राजकारण नसते तरी त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे उद्धव आणि राणे यांच्यातील वादाला एवढा प्रदीर्घ इतिहास आहे. ज्यावेळी बाळासाहेबांकडून उद्धव यांच्याकडे पक्षाची सुत्रे हळूहळू येऊ लागली त्यावेळी हा संघर्ष वाढत गेला व त्यातून नारायण राणेंनी पक्ष सोडला आणि कॉँग्रसे पक्षात दाखल झाले. अर्थात यावेळी देखील राणेंनी काही मोठ्या तात्विक वादामुळे शिवसेना सोडली नव्हती. तर त्यालाही वैयक्तीक सत्तास्पर्धेची व राजकीय इर्षेची झालर होती. शाखाप्रमुख, नगरसेवक, बेस्ट समितीचे अध्यक्ष, मंत्रीपद आणि नंतर मुख्यमंत्रिपद असा प्रवास झालेले राणे व शिवसेनेची तोफ असा उल्लेख केला जाई ते छगन भुजबळ हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्वात जवळ होते. बहुजन समाजाकडे नेतृत्व देण्याची राजकीय गरज ओळखून बाळासाहेबांनी मनोहर जोशी यांच्याकडील मुख्यमंत्रिपद १९९९ मध्ये राणे यांना दिले होते. आपल्या अल्पावधीच्या म्हणजे आठ महिन्यांच्या काळात राणेंनी आपल्य़ा आक्रमक शैलीने कामकाज करण्याचा प्रयत्न केला, निर्णयांचा धडाका घेतला परंतु पुन्हा सत्ता आणण्यात ते अपयशी ठरले, हे देखील वास्तव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काऱ्यकर्त्याच्या २००२ मध्ये झालेल्या हत्येनंतर राणे यांच्या घराची जाळपोळ झाली, त्यावेळी शिवसेनेचा एकही नेता कोकणात आला नाही, तेव्हापासून राणे शिवसेनेपासून दुरावत गेले. यातून त्यांचा उद्धव विरोध एवढा तीव्र झाला की, २००३ सालच्या महाबळेश्वर येथे झालेल्या कार्यकारीणीमध्ये उद्धव यांना कार्याध्यक्ष करण्यास विरोध केला होता. तेथूनच राणेंनी आपल्याला नजिकच्या काळात शिवसेना सोडावी लागणार आहे याची खूणगाठ बांधली होती. २००४ मध्ये ते विरोधी पक्षनेते असतानाही पक्षनेतृत्व त्यांच्यावर नाराजच होते. शेवटी त्यांनी २००५ मध्ये शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी 'उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेला भविष्य नाही', असेही भाकित केले होते. अर्थातच त्यांचे हे भाकित खोटे ठरले आहे. कॉँग्रेसमध्ये राणेंचे नुकसान झाले का, असा विचार केला तर त्यांना अपेक्षीत असणारे मुख्यमंत्रीपद काही दिले नसले तरी त्यांना व त्यांच्या कुटुंबांना याच काळात भरपूर सत्ता उपभोगता आली, हे देखील वास्तव विसरता येणार नाही. त्याचबरोबर मुख्यमंत्री होण्यासाठी त्यावेळी राणेंनी एवढा उतावीळपणा दाखविला होता की, त्यावेळी पक्षात असताना केंद्रीय नेत्यांवरही शरसंधान साधले होते. कॉँग्रेसमध्ये खरे तर अशा प्रकारांना माफी नसते, परंतु कॉँग्रेसच्या नेतृत्वाने राणेंना उदार मनाने माफ केले. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांना कॉंग्रसेची सत्ता असेपर्यंत मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान दिले होते. तसेच एका मुलाला खासदार व दुसऱ्या मुलाला आमदार केले होते. कॉँग्रेसमध्ये असतानाही पक्षाने त्यांचे चांगलेच लाड केले होते. परंतु सत्ता जाताच राणे अस्वस्थ होऊ लागले. त्यातच असे म्हटले जाते की, भाजपाने त्यांना ईडीचा धाक दाखविला होता. ईडी ची चौकशी लावून जेलमध्ये जाण्यापेक्षा राणेंना पक्षात घेतले. परंतु भाजपाने त्यांना प्रदीर्घ काळ पक्षाच्या दारात उभे केले होते, पक्षात सरळ स्वागतार्ह प्रवेश दिला नव्हता. गेल्या विधानसभेच्या अगोदर त्यांना पक्षात सामील करुन घेतले. त्यापूर्वी काही काळ त्यांना स्वाभिमान या त्यांच्याच स्वयंसेवी संस्थेचे पक्षात रुपांतर करायला लागले होते. त्यानंतर स्वाभिमानचे भाजपात विलीनीकरण करण्यात आले. विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात सर्व समिकरणे बदलली आणि शिवसेना-राष्ट्रवादी-कॉँग्रेसची सत्ता आली. राणेंनी भाजपाची सत्ता येणार असे गृहीत धरुन भाजपाची वाट धरली होती. परंतु त्यांची ही गणिते फिसकटली. आता शिवसेनेला आक्रमकरित्या धारेवर धरण्यासाठी रामेच फायदेसीर आहेत हे लक्षात घेऊन भाजपाने त्यांना मंत्रिपद बहाल केले. परंतु राणेंना कधी, कुठे व किती संयमाने बोलायचे याचे भान नसल्याने त्यांनी ही आपत्ती ओढावून घेतली आहे. राणेंच्या या विधानाबाबत साशंकता व्यक्त करीत अनेकांनी पक्षातून त्यांना तोंडदेखला पाठिंबा दिला असला तरीही राणे नावाचे हे ओझे आपल्याला भविष्यात महाग पडणार याचा अंदाज भाजपातील नेत्यांना आला आहे. त्यामुळे राणेंच्या या विधानाबाबत सावध प्रतिक्रीया भाजपातून व्यक्त झाल्या आहेत. राणेंचा वापर कसा करायचा याची कल्पना भाजपाला पूर्ण आहे. तो उपयोग झाल्यावर ते राणेंना कधी फेकून देतील हे त्यांनही कळायचे नाही. राणेंना याची कल्पना असेलच. त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्र्याविषयी बोलताना भविष्यात सावध पवित्रा घेण्याचे ठरविले आहे. टीका करताना ती संयमित हवी, योग्य भाषेत हवी, सभ्यपणाला धरून हवी, याचे भान सुटले कसे वातावरण तयार होते, त्यानंतर तापलेले राजकीय वातावरण सारा महाराष्ट्र पाहातो आहे. महाराष्ट्राला सांस्कृतिक, राजकीय, साहित्यिक क्षेत्रातल्या वादाची मोठी परंपरा आहे आणि अशा वादांमुळेच लोकशाही टिकून राहाते, आणखी बळकट होते. राजकीय वाद-प्रतिवाद एका ठराविक उंचीवरच झाले पाहिजेत, सुसंस्कृत महाराष्ट्राच्या परंपरेला साजेसे झाले पाहिजेत, ही महाराष्ट्रजनांची अपेक्षा आहे. येणाऱ्या काळात निवडणुका जसजशा जवळ येत जातील, तसतशी टीकेची, विरोधाची धार आणखी टोकदार होत जाईल. कुणावर वैयकतीक टिका न करता पक्षांच्या धोरणांवर टीका केली जावी असे अनेकांना अपेक्षीत आहे. राज्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी हे भान पाळणे गरजेचे आहे. मुद्द्यांवरून गुद्द्यांवर येऊ नये, एवढीच अपेक्षा. मालवणी भाषेत सांगायचे तर राण्यांनू चुकलाच तुमचा..
0 Response to "राण्यांनू चुकलाच तुमचा..."
टिप्पणी पोस्ट करा