-->
इंग्लंडमधील मनसुखभाईंची टांकसाळ

इंग्लंडमधील मनसुखभाईंची टांकसाळ

रविवार दि. २२ मे २०१६ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
इंग्लंडमधील मनसुखभाईंची टांकसाळ
------------------------------------------
एन्ट्रो- इंग्लडमधील पहिल्या पाच मोठ्या शहरात गणल्या गेलेल्या बर्मिंगहॅम या शहरापासून सुमारे २०० कि.मी. दूर असलेल्या लेक्स्टर या मध्यम आकाराच्या शहरात मनसुखभाईंचा प्रिंटटांक हा प्रेस आहे. आज त्यांची दुसरी पिढी या प्रेसमध्ये कार्यरत आहे. मनसुखभाईंनी वयाची साठी पार केल्यावर निवृत्ती पत्करली व दुसर्‍या पिढीच्या हाती सुत्रे दिली. मनसुखभाई दिलखुलास व्यक्ती. इंग्लंडमध्ये गेली चार दशकाहून जास्त काळ राहूनही त्यांच्या बोलण्यातून अजूनही गुजराथी भाषेचा सुर येतो. इंग्लंडमध्ये राहूनही त्यांनी आपली गुजराथी भाषा काही सोडलेली नाही. ब्रिटनमध्ये एवढा काळ राहूनही ते फाफडा, जलेबीचा आस्वाद नेहमीच घेतात आणि आपले पदार्थ कसे चविष्ट आहेत ते गुजराथी ढंगात रंगवून सांगतात...
------------------------------------
जगात छपाईचे पहिले तंत्र चीनमध्ये विकसीत झाले असे म्हणतात. मात्र इंग्लडमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यावर मुद्रण कलेचा खरा विकास झाला. छपाईची यंत्रसामुग्री बनविण्यात जर्मनीने आघाडी घेतली आणि जगात त्यांनी मशिनरी पुरविली. जर्मनीचे हे या क्षेत्रातील प्राबल्याला गेल्या दोनशेहून जास्त काळात कुणीही आव्हान देऊ शकलेला नाही. केवळ छपाईच्याच मशिन्स नव्हे तर जगातील प्रमुख मशिनरींचे उत्पादन हे जर्मनीतच होते. मात्र अठराव्या शतकात ब्रिटनमध्ये छपाई तंत्रज्ञान झपाट्याने वाढले. याचे प्रमुख कारण होते ते येथील सारक्षरता. ब्रिटनने आपले राज्य असलेल्या देशात छपाईचे त्यावेळी उपलब्ध असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान पोहोचविले. आता मात्र इंग्लंडमध्ये मुद्रण उद्योग झपाट्याने कमी होत चालला आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सोशल मिडिया गेल्या पाच वर्षात वेगाने वाढला. वृतपत्रे असोत किंवा कोणतेही छपाईचे साहित्य प्रत्यक्ष वाचण्यापेक्षा मोबाईलच्या एका क्लिकवर वाचणारी तरुण पिढी पुढे आली. यातून छपाई उद्योगाला उतरती कळा लागली. इंग्लडच्या नुकत्याच केलेल्या दौर्‍यात तेथील छपाई उद्योग जवळून पाहाण्याचा योग आला. या उद्योगावर अर्थातच ब्रिटीश नागरिकांचे वर्चस्व असणे स्वाभाविकच आहे. परंतु तेथे मला भेटलेल्या मनसुखभाईंच्या प्रेसविषयी लिहिणे आवश्यक वाटते. मनसुखभाई टांक यांनी येथे स्थिरावण्यासाठी केलेला संघर्ष व त्यांचा आज उभा असलेला अत्याधुनिक प्रेस या सर्व बाबी लक्षणीय आहेत. एका गुजराती सर्वसामान्य माणसाने आपल्या कष्टाच्या बळावर इंग्लंडमध्ये आपला स्वत:चा प्रेस उभारणे ही बाब काही सोपी नाही. त्यांच्या या प्रेसमध्ये जसे भारतीय कामगार कामाला आहेत तसे गोरेही काम करतात. बरे हे त्यांनी सर्व शून्यातून उभारले आहे.  इंग्लडमधील पहिल्या पाच मोठ्या शहरात गणल्या गेलेल्या बर्मिंगहॅम या शहरापासून सुमारे २०० कि.मी. दूर असलेल्या लेक्स्टर या मध्यम आकाराच्या शहरात मनसुखभाईंचा प्रिंटटांक हा प्रेस आहे. आज त्यांची दुसरी पिढी या प्रेसमध्ये कार्यरत आहे. मनसुखभाईंनी वयाची साठी पार केल्यावर निवृत्ती पत्करली व दुसर्‍या पिढीच्या हाती सुत्रे दिली. मनसुखभाई दिलखुलास व्यक्ती. इंग्लंडमध्ये गेली चार दशकाहून जास्त काळ राहूनही त्यांच्या बोलण्यातून अजूनही गुजराथी भाषेचा सुर येतो. इंग्लंडमध्ये राहूनही त्यांनी आपली गुजराथी भाषा काही सोडलेली नाही. ब्रिटनमध्ये एवढा काळ राहूनही ते फाफडा, जलेबीचा आस्वाद नेहमीच घेतात आणि आपले पदार्थ कसे चविष्ट आहेत ते गुजराथी ढंगात रंगवून सांगतात. ज्यावेळी आम्ही मनसुखभाईंना म्हटले तुमची तब्येत तर ठीक आहे, मग निवृत्ती कसली घेता? हे काय निवृत्तीचे वय आहे काय? त्यावर ते म्हणाले मी आता मनाने थकलो आहे. आजवर खूप कष्ट केले. आता आराम करावासा वाटतो. त्यामुळे रोजचे तेच ते काम नको म्हणून निवृत्ती घेतली. त्यानंतर गप्पांच्या ओघात त्यांनी आपली कहाणी सांगायला सुरुवात केली. राजकोट जवळच्या एका लहानशा खेड्यात मनसुखभाईंचे बालपण गेले. त्यांना पाच भावंडे. घरची परिस्थीती जेमतेमच. वडिल रोजगारासाठी त्याकाळी आफ्रिकेत गेले होते. परंतु शेतीवरच त्यांची गुजराण होई. मनसुखभाईंचे शिक्षण जेमतेम दोन पुस्तके झाले आणि आता पोटासाठी घराबाहेर पडणे आवश्यक होते. शिक्षण तेव्हा जे सुटले ते कायमचेच. वडिल आहेत तिकडे आफ्रिकेत जाण्याने आपले काही भवितव्य उज्वल नाही असे त्यांना नेहमी वाटे. त्यातून त्यांनी तेथे जाणे टाळले. ज्या ब्रिटीशांचे आपल्यावर सत्ता आहे त्यांच्याच देशात जावे आणि आपले भविष्य आजमवावे असे त्यांना मनोमन वाटे. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरु केले. त्याकाळी परदेशी नोकरीला पाठविणारे एजंंट कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांचा मोठा भाऊ लंडनमध्ये गेला होता व तेथे तो नोकरीलाही लागला होता. आपल्यालाही असेच लंडनला जायचे आहे याची पक्की खूणगाठ मनसुखभाईंनी बांधली होती. एका दिल्लीतील सरदारजी एजंटशी त्यांची भेट झाली. त्या एजंटला त्यांची पाठवणी लंडनला करण्यासाठी दोन हजार रुपये देण्याचे ठरविले. हे पैसे त्यांनी कसेबसे जमविले होते. एकूण बारा जण इंग्लंडला जाणार होते. त्यातही सहा-सहा जणांचे दोन गट पाडण्यात आले. मुंबई-फ्रँकफर्ट-लंडन असे विमान होते. त्यातील सहा जणांचा एक गट दिवसा व दुसरा गट रात्री पाठविला जाणार होता. त्याकाळी इंग्लंडला नोकरीसाठी जाणे ही बाब काही सोपी नव्हती. त्यामुळे एजंटांना हाताशी घेऊन जावे लागे. दिवसा जाणारा एक गट सुखरुप पोहोचला. मात्र रात्रीच्या विमानाने जाणार्‍या गटाला अडविण्यात आले. लंडनला उतरल्यावर योग्य व्हिसा नसल्यामुळे फ्रँकफर्टला या सहा जणांच्या गटाला परत पाठविण्यात आले. नेमके याच सहा जाणांच्या गटात मनसुखभाई होते. आता येथे फ्रँकफर्ट राहून करायचे काय? मनसुखभाईंनी तर लंडनलाच जाण्याचे नक्की केले होते. शेवटी आम्हाला लंडनलाच पाठवा अन्यथा आम्ही येथेच राहू असा पवित्रा विमानतळावर मनसुखभाईंच्या बरोबर असलेल्या सहा जणांच्या गटाने घेतला. शेवटी नाईलाज म्हणून पुढील व्यवस्ता होईपर्यंत विमानतळावरच व्यवस्था करण्याचे एअरलाईन्सने मान्य केले. राहाण्याची व्यवस्था एअरपोर्टमध्येच एका कॅन्टीनमध्ये करण्यात आली. तर जेवणासाठी विमान कंपनीने कॅन्टीनची कुपन्स दिली. दिवस असेच जात होते. शेवटी या तरुणांनी कॅन्टीनवाल्याला गाठून त्याच्यातील काही कुपन्सचे पैशात रुपांतर करुन घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे चार पैसे हातात आले. शनिवार-रविवारी सर्व बंद असताना हे सर्व जण विमानतळाच्या बाहेर जात व चित्रपट पाहून येत किंवा फिरुन येत. काय करायचे हा मोठा प्रश्‍नच होता. यात तब्बल सहा महिने काढले. शेवटी विमानतळावरच्या एका रेस्टॉरंटमध्ये नोकरीला असलेल्या एका भारतीय कॅशरने त्यांची सुरु असलेली दैना एका वृत्तपत्राला कळविली. ही सर्व बातमी छापून आल्यावर सर्व सुत्रे हलू लागली. शेवटी इंग्लंडला जाण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र मनसुखभाई लंडनला उतरल्यावर त्यांना अटक झाली. एक महिना अटकेत होते. त्यावेळी मोठा भाऊ भेटायला आला. महिन्याभराने तेथून सुटका झाल्यावर त्यांनी थेट भावाचे लेस्टर येथील घर गाठले. लगेचच  दुसर्‍या दिवशी भावाने तेथील काही कंपन्यात नोकरीविषयी चाचपणी केली आणि मनसुखभार्इांना अखेर नोकरी लागली. पगार होता आठवड्याला दोन पौंड. अशा प्रकारे दोन-तीन वर्षे नोकरी केल्यावर आपण काही तरी स्वत:चा उद्योगधंदा केला पाहिजे असे त्यांना वाटू लागले होते. यातूनच त्यांनी घराच्या गॅरेजमध्ये छपाई कारखाना सुरु केला. त्यावेळी कामावरुन आल्यावर हे दोघे भाऊ छपाईचा व्यवसाय करीत. सर्व काही एक हाती काम चाले. मनसुखभाईंना खिळे जुशविण्याचे काम उत्तम येते. त्यांनी आपण जेथेे व्यवसाय सुरु केला ते गॅरेज आम्हाला मोठ्या आपुलकिने दाखविले. त्यावेळे छपाईसाठी वापरले जाणारे जस्ताचे खीळे अजूनही जपून ठेवल्याचे सांगितले. हळूहळू कष्ट करीत करीत व्यवसाय वाढू लागला. मनसुखभाईंनी आपल्या सर्व चारही भावंडांना आपल्याकडे लंडनला आणले व व्यवसायात जोडून घेतले. देशातील तरुणांनी आदर्श घ्यावा असा मनसुखभाईंचा हा संघर्षाचा इतिहास आहे. मनसुखभाईंची ही टांक साळ सर्वांनाच मार्गदर्शक ठरावी.
-------------------------------------------------------------------      

0 Response to "इंग्लंडमधील मनसुखभाईंची टांकसाळ"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel