-->
नायडू विरुध्द गांधी

नायडू विरुध्द गांधी

बुधवार दि. 19 जुलै 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
नायडू विरुध्द गांधी
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वतीने उपराष्ट्रपतिपदासाठी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांना उमेदवारी देण्यात आल्याने आता नायडू विरुध्द गोपाळकृष्ण गांधी अशी लढत होणार आहे. गांधी यांची उमेदवारी कॉग्रेसच्या नेतृत्वाखालील 18 विरोधी पक्षांच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यावेळी गोपाळकृष्ण गांधी यांच्या नावाची सर्वात अगोदर घोषणा करुन कॉग्रेसने यात बाजी मारली होती. 71 वर्षीय गांधी हे महात्मा गांधी यांचे नातू आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाला विशेष वजन आहे. अर्थात सध्या भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडीकडे जादा मते असल्यामुळे नायडू यांचे निर्विवादपणे मते जास्त आहेत. त्यामुळे त्यांचा विजय निश्‍चित होणार हे जवळपास नक्कीच आहे. मात्र असे असले तरीही ही भाजपाचा आक्रमक हिंदुत्ववाद व सर्वधर्मसमभाव मानणार्‍यांच्या विरोधातली ही प्रतिकात्मक लढाई आहे. कॉग्रेसने यासाठी गोपाळकृष्ण गांधी या विचारवंतांना व महात्माजींच्या घरातील एका प्रतिनिधीला पुढे केले आहे. भाजपा हा केवळ गांधीच्या विचाराला जेवणात लोणचे खावे तसा वापरत आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांचे कृत्य हे गांधींच्या विचारधारेच्या विरोधातच आहे. याला विरोध करण्यासाठीच ही लढाई आहे. 22 एप्रिल 1946 रोजी जन्मलेल्या गोपाळकृष्ण यांच्या आईचे नाव लक्ष्मी होते. त्या स्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सी. राजगोपालाचारी यांच्या कन्या होत्या. गोपाळकृष्ण 1968 मध्ये आय.ए.एस. झाले. 2004 ते 2009 पर्यंत त्यांनी पश्‍चिम बंगालचे राज्यपालपद भूषविले. बंगालच्या सिंगूर आणि नंदीग्राम येथे हिंसक आंदोलने झाली त्यावेळी ते आमदार होते. 2008 च्या सिंगूर हिंसाचाराच्या वेळी गोपाळकृष्ण गांधी यांनीच बुद्धदेव भट्टाचार्य आणि ममता बॅनर्जी यांना चर्चेसाठी तयार केले होते. त्यावेळी डाव्यांची ताकद कमी होत होती आणि ममता यांची ताकद वाढत चालली होती. गोपाळकृष्ण गांधी सेंट स्टीफन्स कॉलेजचे विद्यार्थी होते. आय.ए.एस. झाल्यानंतर 80 च्या दशकात ते तामिळनाडूत सेवेत रुजू झाले. 1985 ते 1987 पर्यंत ते उपराष्ट्रपतींचे सचिव होते. यानंतरची 5 वर्षे ते राष्ट्रपतींचे संयुक्त सचिव होते. 1992 ते 2003 मध्ये त्यांनी अनेक मुत्सद्दी पदे भूषविली. 1996 मध्ये ते दक्षिण आफ्रिकेत भारताचे उच्चायुक्त होते. 1997 ते 2000 पर्यंत राष्ट्रपतींचे सचिव, 2000 मध्ये श्रीलंकेचे हायकमिशनर आणि 2002 नंतर नॉर्वे आणि आयरलँडचे राजदूत होते. गोपाळकृष्ण हे सनदी सेवेत असले तरीही एक विचारवंत म्हणून ओळखले जातात. तसेच महात्मा गांधींचे नातू असल्यामुळे त्यांच्याभोवती एक वेगळे वलय आहे. त्यांच्या विरोधात असलेले भाजपाचे व्यंकय्या नायडू यांचा संसदीय कामकाजाचा दीर्घ अनुभव आहे. आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत ते नेहमीच वादविवादापासून दूर राहिले आहेत. गोपाळकृष्ण गांधी यांचे संपूर्ण करिअर दक्षिण भारतात पार पडले. त्यामुळे द्रमुक पक्ष त्यांना पाठिंबा देतील, असा अंदाज आहे. दिल्लीत जन्मलेले गांधी हे अनेक वर्षांपासून चेन्नईत राहतात. भाजपनंही दक्षिण भारतीय उमेदवाराविरुद्ध दक्षिण भारतीय उमेदवार उभा केला. व्यंकय्या नायडू हे आंध्र प्रदेशचे आहेत. त्यांच्या राजकीय कारकीर्दीला तेथूनच सुरुवात झाली. खरं तर ती त्यांची कर्मभूमी मानली जाते. दक्षिण भारतीय असा विचार केल्यास नायडू यांची निवड फरफेक्ट असल्याचं बोलले जाते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपनं रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिली. कोविंद कानपूरचे आहेत. याशिवाय दलित नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर विरोधकांनी मीरा कुमार यांना उमेदवारी दिली. त्यामुळं राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीला दलित विरुद्ध दलित असा रंग देण्यात आला. आता नायडू किंवा गांधी यांच्यापैकीकोणाचाही विजय झाल्यास तर उत्तर आणि दक्षिण भारत असं संतुलन साधता येणार आहे. कारण कोविंद हे उत्तर भारताचे आहेत. नायडू हे दक्षिण भारतीय असूनही त्यांनी हिंदी शिकण्यासाठी गेल्या काही वर्षात भरपूर मेहनत घेतली होती आणि उत्तर भारतातील निवडणूक प्रचारसभांमध्ये त्यांनी हिंदीतून भाषणेही केली. नायडू यांचे दक्षिणेतील राज्यांमधील प्रादेशिक पक्षांसोबत चांगले संबंध आहेत. त्या राज्यांमध्ये भाजपला जम बसवण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागणार आहे. नायडू यांच्या माध्यमातून भाजप तेथील मतदारांना आकर्षित करू शकतो. व्यंकय्यांचे आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यांचा तेलगू देसम पक्ष एन.डी.ए.चाच भाग आहे. नायडू तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचं मन वळवण्यात यशस्वी झाल्यास टी.आर.एस.ही एन.डी.ए.ला समर्थन देऊ शकते. व्यंकय्या नायडू हे चार वेळा राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. 1998 मध्ये त्यांची कर्नाटकातून राज्यसभेवर निवड झाली. 2004 ते 2010 मध्येही त्यांना कर्नाटकातूनच राज्यसभेवर पाठवण्यात आले. 2016 मध्ये राजस्थानमधून राज्यसभेवर पाठवण्यात आले. 2014 ते 16 पर्यंत ते संसदीय कामकाज मंत्री होते. वरिष्ठ सभागृहाचा त्यांचा 19 वर्षांचा अनुभव आहे. नायडू 1972 पासून राजकारणात आहेत. एक यशस्वी विद्यार्थी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांनी काम केले. ही त्यांची एक जमेची बाजू. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचेही ते सदस्य होते. वाजपेयी सरकारमध्ये ते मंत्री होते आणि आता मोदी सरकारमध्येही मंत्री होते. राजकीय कारकीर्द मोठी असली तरी ते वादविवादापासून ते कोसो दूर राहिले. त्यादृष्टीने नायडू विरुध्द गांधी ही दक्षिणेतील लढत देशव्यापी लक्ष खेचून घेणार आहे.
----------------------------------------------------------------

0 Response to "नायडू विरुध्द गांधी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel