-->
शेतीच्या दुरावस्थेचे सामाजिक परिणाम

शेतीच्या दुरावस्थेचे सामाजिक परिणाम

रविवार दि. 16 जुलै 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
शेतीच्या दुरावस्थेचे सामाजिक परिणाम
------------------------------------------
एन्ट्रो- शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक व लेखक हेरंब कुलकर्णी आणि विठ्ठलराव शेवाळे यांनी नगर जिल्ह्यातील अकोले व संगमनेर तालुक्यांत 45 गावांत शेतीविषयी सर्वेक्षण केले. त्यातून त्यांच्यापुढे अत्यंत विदारक चित्र पुढे आले आहे. या पाहणीतून त्यांनी काढलेली निरिक्षणे पाहता, आपल्याकडील शेतीची घडी विस्कटल्यामुळे आपल्याकडे सामाजिक व आर्थिक परिणाम त्याचे समाजव्यवस्थेवर खोलवर कसे उमटत आहेत त्याचे चित्र जाणवते...
-----------------------------------------------
शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा मुख्य पाया आहे. आपल्याकडे औद्योगिक क्षेत्राच्या रोजगाराबाबत कितीही दावे केले तरी अजूनही सर्वाधिक रोजगार हा शेतीतूनच पुरविला जातो. मात्र शेतीच्या नियोजनात आपण मागे राहिल्यामुळे आपल्याकडे शेती करणे हे फायद्याचे सोडा परंतु शेती करणे आता शेतकर्‍यांना व त्यांच्या मुलांना नकोसे झाले आहे. आपल्याकडे शेतीचे तज्ज्ञ डॉ. स्वामीनाथन अय्यर यांनी शेतीविषयी अभ्यास करुन शेतीतील सुधारणा सुचविल्या. शेतकर्‍यांचे जीवनमान त्यातून कसे सुधारता येईल हे दाखवून दिले. त्याचे अनेक प्रयोग त्यांनी यशस्वी केले. मात्र अय्यर यांचया या सूचनांचा स्वीकार सरकारने केलेला नाही. सध्याच्या केंद्रातील व राज्यातील सरकार असलेल्या भाजपाचा मतदार हा प्रामुख्याने शहरी आहे. त्यामुळे त्यांना या शहरी मतदाराला खूष ठेवण्यासाठी त्यांच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतात. शेतकरी हा केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले जात नाहीत. यातून शेती व शेतकरी यांचे विविध प्रश्‍न प्रलंबित राहिले आहेत. याचा दोष हा फक्त सध्याच्या सरकारला देऊन उपयोग नाही तर यापूर्वीच्या कॉग्रेस सरकारने देखील फारसे शेतकर्‍यांच्या हितासाठी काही केले नाही, असेच म्हणावेसे वाटते. सध्याच्या भाजपाच्या नेत्यांनी सत्तेत येण्यापूर्वी अनेक मोठी-मोठी आश्‍वासने दिली. प्रत्यक्षात मात्र काहीच केले नाही. यातून शेतकर्‍यांच्या अपेक्षांचा भंग झाला. परिणामी शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबावयाच्या ऐवजी त्यांची संख्या वाढतच गेली. हे फारच दुदैवी आहे. यासाठी आपले नियोजनशून्य राज्यकर्तेच आहेत. शेती विस्कटल्यामुळे आपल्याला त्याचे अनेक सामाजिक व आर्थिक परिणाम दिसू लागले आहेत. शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक व लेखक हेरंब कुलकर्णी आणि विठ्ठलराव शेवाळे यांनी नगर जिल्ह्यातील अकोले व संगमनेर तालुक्यांत 45 गावांत शेतीविषयी सर्वेक्षण केले. त्यातून त्यांच्यापुढे अत्यंत विदारक चित्र पुढे आले आहे. या पाहणीतून त्यांनी काढलेली निरिक्षणे पाहता, आपल्याकडील शेतीची घडी विस्कटल्यामुळे आपल्याकडे सामाजिक व आर्थिक परिणाम त्याचे समाजव्यवस्थेवर खोलवर कसे उमटत आहेत त्याचे चित्र जाणवते. या दोन सर्व्हेक्षणात त्यांना शेतकर्‍यांची लग्न रखडलेली 3068 तरुण मुले आढळली. त्यात 774 मुलांची वये 31 ते 40 च्या दरम्यान आहेत. शेतीमालाला भाव नसल्याने व शेती व्यवसाय उद्ध्वस्त होण्याचा परिणाम शेतकर्‍याची कुटुंबसंस्थाच उद्ध्वस्त होण्याच्या दिशेने जात आहे. विशेष म्हणजे यात सर्व जातीचे शेतकरी आहेत. या सर्वेक्षणाला पूरक म्हणून पुणे व सोलापूर जिल्ह्यातील 10 गावांची पाहणी केली असता तिथेही तेच चित्र दिसले. याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्रात कमी- अधिक संख्येने हेच वास्तव असल्याचे जाणवते. 25 ते 30 वयोगटातील 2294 तरुण मुले व 31 ते 40 वयोगटातील 774 तरुण मुले लग्नाविना आढळली. यातील बहुसंख्य मुले अल्पभूधारक शेतकरी असून शिक्षणही चांगले आहे. अनेक जण पदवीधर आहेत. यातील चार मुले एम.बी.ए. झालेली असून, बेरोजगार असल्याने व शेती करीत असल्याने लग्न रखडले आहे. 30 वयोगट उलटलेल्यांनी तर आता लग्नाची आशाच सोडून दिली आहे. दोन मोठ्या गावांत तर 300 व 250 मुले सापडली, तर 100 पेक्षा जास्त मुले आढळलेलीही 12 गावे आहेत. 50 पेक्षा जास्त मुले असलेली 8 गावे आहेत. केवळ अल्पभूधारकच नव्हे, तर अगदी 10 एकर जमीन असलेल्या कुटुंबातही लग्न होत नाहीत. एका कुटुंबात तर 60 गुंठे जमीन असल्याने 3 मुलांची लग्नं रखडल्याचे भीषण वास्तव त्यांना दिसले. 2012 चा दुष्काळ व त्यानंतर सतत शेतीमालाचे भाव पडण्याची प्रक्रिया, वाढलेला उत्पादन खर्च यातून शेतीवर जगणे अधिक कठीण झाले. परिणामी शेतकरी बाप आपल्या मुलीला अजिबात शेतकरी कुटुंबात द्यायचे नाही, या निष्कर्षावर आले. मुलीही माहेरी बघितलेले शेतीचे हे भयावह वास्तव व त्यात करावे लागणारे जनावरासारखे कष्ट यामुळे लग्न करून शेतकरी कुटुंबात जायला उत्सुक नाहीत. आता मुली 12 वी पर्यंत किमान शिक्षण घेत आहेत. त्यातून अधिक चांगल्या जीवनाची तयार झालेली आकांक्षा, शहरी महिलांशी होणारी तुलना, यातून व्यक्तिमत्त्व विकासाची व चांगल्या जीवनशैलीची आस त्यांच्या निर्माण होणे काही चुकीचे नाही. शिकलेल्या मुली नोकरदार व शहर याला प्राधान्य देऊ लागल्या. खेड्यात 10 एकर जमीन असण्यापेक्षा तालुक्याला 10 बाय 10 चे दुकान असले तर लवकर लग्न होते. त्यातून अनेक गावांत लग्नाच्या मुलांना सहकारी संस्थांत लग्न होईपर्यंत नोकरीला ठेवा, अशी गळ घालणारे कार्यकर्ते आहेत, तर अनेक तरुण सिन्नर, चाकण येथील कारखान्यांत लग्न जमेपर्यंत नोकरी मिळवायची धडपड करीत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 10 गावांत 319 मुलांची लग्ने रखडल्याचे या सर्व्हेक्षणात आढळले. हुंडा प्रथा कमी होते आहे. अनेक ठिकाणी मुलाकडच्यांनी लग्न करून मुली आणल्या आहेत. विधवा व परित्यक्ता, अनाथ आश्रमातील मुली यांच्याशी लग्न करण्याचे प्रमाण वाढते आहे. नाशिक, यवतमाळ, ठाणे या भागातील आदिवासी भागांतील मुलींशी आंतरजातीय विवाह करण्याचीही अल्प पण लक्षणीय उदाहरणे आढळली, हे त्याचे सकारात्मक पैलू आहेत. तर, अडलेल्या शेतकर्‍यांचा गैरफायदा घेणारे एजंटही निर्माण झाले आहेत. अगदी मुली दाखविण्याचे 5000 रुपये घेणे, इतर जिल्ह्यातील मुलीशी लग्न लावून देणे, असे उद्योग ते करतात. यातून अनेकांची फसवणूकही झाली आहे. शेतकर्‍यांच्या वेदनेचा असा बाजार मांडला जातो आहे. जिरायती गावांत तर हा प्रश्‍न खूप गंभीर आहे. त्यातून गावाबाहेर व शेतीबाहेर पडण्याची मानसिकता तयार होते आहे. सारोळा पठार या दुष्काळी गावातील 300 कुटुंबांतील 412 मुले गावाबाहेर नोकरी किंवा व्यवसायाला गेली आहेत. वाढते नागरीकरण हे उद्ध्वस्त होणार्‍या शेती धंद्यातून तयार झाल्याचे हे वास्तव आहे. शेती हा व्यवसाय अस्थिर झाल्यवर त्याचे किती वाईट सामाजिक व आर्थिक परिमाम होतात त्याची ही वरील उत्तम उदाहरणे आहेत. हेरंब कुलकर्णी आणि विठ्ठलराव शेवाळे यांनी हे सर्व्हेक्षण करुन एक चांगले राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजण गालणारे वास्तव उघड केले आहे. यातून तरी आपण बोध घेणार का हा सवाल आहे.
----------------------------------------------------------------------------

0 Response to "शेतीच्या दुरावस्थेचे सामाजिक परिणाम"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel