-->
संपादकीय पान गुरुवार दि. १४ मे २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
पुन्हा भयकंप
विनाशकारी भूकंपातून नेपाळ अद्याप सावरला नसताना मंगळवारी व बुधवारी सकाळी पुन्हा बसलेल्या भूकंपाच्या दोन मोठ्या धक्क्यांमुळे नेपाळसह संपूर्ण उत्तर भारत हादरला. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नेपाळमध्ये ४२ जणांचा मृत्यू झाला असून, १,११७ जण जखमी झाले आहेत. भारतातही भूकंपामुळे २१ जणांचा बळी गेला आहे. नेपाळचे हे नष्टचर्य कधी संपणार असा प्रश्‍न उपस्थित होतो. अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, नेपाळला लहान-मोठे भूकंपाचे सहा धक्के जाणवले. दुपारी १२.३५ मिनिटांनी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.३ इतकी होती. याचा केंद्रबिंदू नेपाळची राजधानी काठमांडूच्या पूर्वेकडे ८३ किलोमीटर लांब माउंट एव्हरेस्टच्या परिसरात होता. नंतर ३० मिनिटांनी पुन्हा एकदा ६.३ रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. या दोन धक्क्यांसह चार ते पाच तीव्रतेचे एकूण सहा धक्के नेपाळ आणि उत्तर भारताला जाणवले. नेपाळमध्ये २५ एप्रिलला बसलेल्या भूकंपामुळे आठ हजारांवर लोकांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा आलेल्या या भूकंपानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अफगाणिस्तानलाही आज भूकंपाचे दोन धक्के जाणवले. यातील एका भूकंपाची तीव्रता ६.९ इतकी होती. हे धक्केही भारतापर्यंत जाणवले. मागच्या भूकंपानंतर उत्तर भारतातील नागरिकांमध्ये भूकंपामुळे भीतीचे वातावरण होते. भारतात भूकंपाचे धक्के दिल्लीपासून चेन्नईपर्यंत आणि हिमाचल प्रदेशपासून ईशान्य भारतापर्यंत जाणवले. हादरे जाणवताच बहुतेक सर्व ठिकाणी नागरिक भीतीने घराबाहेर पडून आपला जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावत सुटले. लोकांना देखील आपला जीव वाचविण्यासाठी नेमके काय करावे याचा अंदाज नव्हता. नेपाळ, अफगाणिस्तान, जपानसह उत्तर भारतात भूकंपाचे अस्मानी संकट आले असतानाच आता गुजरातमधील कच्छ येथेही बुधवारी भूकंपाचे हादरे बसले. कच्छ परिसरात सकाळी ७ वाजून १२ मिनिटांनी भूकंपाचे हादरे बसले. या भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल एवढी होती. यामध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाल्याचे स्पष्ट झालेले नाही. जपानलाही ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. जपानमध्ये २०११ मध्ये झालेल्या भूकंप व त्सुनामीमुळे उध्वस्त झालेल्या भागामध्येच हा भूकंप झाला आहे. संपूर्ण उत्तर जपान व राजधानी टोकियोपर्यंत या भूकंपाचा धक्का जाणवला. येथील अत्यंत संवेदनशील मानल्या जाणार्‍या फुकुशिमा दाई इची आण्विक प्रकल्पाचीही या भूकंपामुळे कोणतीही हानी झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या भागामध्ये २०११ मध्ये भूकंप व त्सुनामीच्या आलेल्या एकत्रित संकटामुळे १८ हजार नागरिक मृत्युमुखी पडले होते. जपानला भूकंप ही बाब आता नवीन राहिलेली नाही. जगातील सर्वात जास्त भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून जपानचा उल्लेख करता येईल. परंतु जपानने या परिस्थितीवरही मोठ्या जिद्दीने मात केली आहे. तेथे कधीही भूकंप झाल्यास काही क्षणातच नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला जातो. एस.एम.एस. पासून ते भोंगे वाजण्यास सुरुवात होते. आपत्ती व्यवस्थापन तिथे अत्यंत तत्परतेने काम करते. नागरिकांनाही अशा स्थितीत आपण कशा प्रकारे मुकाबला करायचा याचे प्रशिक्षण दिले जाते. मुलांना शालेय वर्गातूनच याचे प्रशिक्षण दिले जाते. एकीकडे हे प्रशिक्षण दिले जात असताना नवीन तंत्रज्ञान शोधून भूकंपावर मात करणार्‍या नवीन इमारती उभारण्याचे तंत्र विकसीत केले. त्यामुळे भूकंपाचा मुकाबला करण्याची ताकद या इमारतींमध्ये आहे. तसेच या इमारती पडल्या तरी कमीत कमी मनुष्यहानी होईल असे पाहिले जाते. जपानकडून आपण हाय स्पीड ट्रेनचे तंत्रज्ञान घेण्याऐवजी आपत्ती व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान विकसीत करुन घेणे आवश्यक आहे. आपल्याला सध्या त्याची मोठी गरज आहे. नेपआळमधील निसर्गाने धारण केलेले हे सौद्र रुप धक्कादायी असले तरीही गेल्या काही वर्षात पृथ्वीच्या पोटात ज्या हालचाली होत होत्या त्याचा हा परिपाक आहे. पृथ्वीच्या आत ज्या प्लेटस् आहेत, त्या सतत फिरत असतात. जेथे या प्लेट्‌स एकमेकांवर आपटतात त्याला फॉल्ट लाईन असे म्हणतात. भारतीय उपखंडाच्या प्लेटस् दरवर्षी ५.५ सेमी उत्तरेकडे सरकत आहेत. या प्लेेटस् एकमेकांवर आदळत असताना मोठी उर्जा निर्माण होते व जास्त दाबामुळे त्या तुटतात. त्या जमिनीखालील उष्णता बाहेरचा मार्ग शोधीत असते व यामुळे भूकंप होतो. नेपाळच्या या भूकंपाचे हे प्रमुख कारण आहे. तसे पाहता नेपाळ हा काही भूकंपप्रवण क्षेत्राच्या पट्‌ट्यात येत नाही. यापूर्वी ८० वर्षांपूर्वी नेपाळमध्ये भूकंप झाला होता. नेपाळच्या पट्यात बर्फाची शिखरे आहेत. म्हणजे वरुन थंडपणा जाणवत असला तरीही पृथ्वीच्या पोटात मात्र तीव्र उष्णता आहे. या होणार्‍या घडामोडींना मनुष्यप्राणी जबाबदार आहे का? काही पर्यावरण तज्ज्ञांच्या मते मानवाने जो र्‍हास सुरु केला आहे त्याचा हा परिपाक आहे. परंतु ही बाब शंभर टक्के खरी नाही. मुनष्याने पर्यावरणाचा समतोल जपण्यासाठी जी खबरदारी घेतली पाहिजे ती घेतली जात नाही ही वस्तुस्थिती असली तरीही या सर्वच बाबी त्याला कारणीभूत आहेत असे नव्हे. नेपाळचा भूकंप असो किंवा जगातील कोणताही भूकंप असो पृथ्वीच्या पोटात ज्या घडामोडी होत असतात त्यामुळे हे होत असते. या नैसर्गिक आपत्तीवर कशी मात करावयाची यावर तोडगा नवीन नवीन शोध लावणार्‍या मानवाने काढला पाहिजे. नेपाळच्या भूकंपातून आपण धडा घेऊन त्यादृष्टीने वाटचाल केली पाहिजे.
---------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel