-->
वादाच्या भोवऱ्यात वाझे

वादाच्या भोवऱ्यात वाझे

11 मार्चसाठी अग्रलेख
वादाच्या भोवऱ्यात वाझे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या मोटारी प्रकरणी असिस्टंट पोलीस इन्पेक्टर व एकेकाळी गाजलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गेले काही दिवस हे प्रकरण गाजत आहे. आता या प्रकरणाचे एक एक नवनीवन पैलू उघड होत आहेत. मंगळवारी विधानसभेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर हे प्रकरण दिसते तसे काही साधे नाही, हेच स्पष्ट झाले आहे. या मोटारीचे मालक मनसुख हिरेन हे सचिन वाझे यांचे चांगले मित्र होते. हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूच्या अगोदर तीन-चार दिवस वाझे व हिरेन हे एकत्रच असायचे. तसेच जी स्फोटकाने भरलेली गाडी सापडली होती ती वाझेंच्याच ताब्यात चार महिने होती असे स्पष्टीकरण हिरेन यांच्या पत्नीने दिले आहे. हिरेन यांच्या पत्नीने हे निवेदन दहशतवादविरोधी पथकाने नोंदविले गेल्याने याला विशेष महत्व आहे. सचिन वाझेंचे निलंबन केले जावे अशी विरोधी पक्षांची मागणी होती. मात्र सत्ताधारी वाझेंची बदली करण्य़ास तयार आहेत. एकूणच पाहता हे प्रकरण फार गंभीर आहे व त्याची कसून चौकशी करुन यातील गुन्हेगार जनतेसमोर आले पाहिजेत. देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना त्यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता. मात्र महाविकास आघाडीच्या काळात हे प्रकरण उकरुन काढण्यात आले व रिपब्लिक टी.व्ही.चे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामी याला जेलची हवा दाखविण्यात आली. त्यावेळी हेच सचिन वाझे गोस्वामींना अटक करायला त्यांच्या घरी गेले होते. त्यामुळे फडणवीस यांचा वाझेंवर खून्नस असणे आपण समजू शकतो. परंतु सचिन वाझे हे देखील काही धुतल्या तांदळासारखे नाहीत. आता तर त्यांच्या विरोधात हिरेन यांची हत्या केल्याचा आरोप आहे. अशा वेळी सरकारने वाझेंसारख्या एका एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलिस अधिकाऱ्याला पाठिशी घालणे चूकच आहे. यासंबंधी सरकारने केवळ वाझेंची बदली न करता त्यांचे निलंबन करुनच या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. ज्यावेळी आपण अन्वय नाईक प्रकरणी गुन्हेगाराला माफी करु नये असे बोलतो त्याचवेळी सचिन वाझेंना अशा प्रकारे संरक्षण देणेही चुकीचेच आहे. त्याचवेळी सभागृहात मंगळवारी न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. सरकारने या प्रकरणाचीही चौकशी करुन एकदा दूध का दूध, पानी का पानी करण्याची आवश्यकता आहे. लोया प्रकरण हे देखील बराच काळ रेंगाळत पडलेले आहे. यापूर्वीच्या सरकारने लोया यांचा खून झाला नसल्याचा अहवाल दिलेला असला तरीही अनेकांचे याबाबत समाधान झालेले नाही. न्या. लोया यांच्या मृत्यूशी संबंधीत अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत राहिले आहेत. अशा स्थितीत त्या प्रकरणाची पुन्हा चौकशी करणे काही चुकीचे नाही. गुन्हेगार कोणही असो त्याला गुन्हयाची शिक्षा ही झालीच पाहिजे. सचिन वाझे हे तर एक नेहमीच वादग्रस्त ठरलेले व्यक्तीमत्व आहे, हे वास्तव विसरता येणार नाही. डिसेंबर २००२ रोजी घाटकोपर येथे बॉम्बस्फोट प्रकरणी परभणीच्या सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या सत्तावीस वर्षांच्या ख्वाजा युनूसला अटक झाली. त्याला तपासासाठी औरंगाबादला नेत असताना अंधाराचा फायदा घेऊन तो पळून गेला, असे सांगितले गेले. परंतु पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचा मृत्यू झाल्याने चौदा जणांसह वाझे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. त्यानंतर तब्बल सोळा वर्षांनी ते मुंबई पोलीस दलात परतले. विशेष म्हणजे निलंबनाचा काळ संपल्यावर त्यांनी २००८ मध्ये जाहीरपणे शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेत त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर कोरोनाचे निमित्त करुन वाझे पुन्हा पोलीस दलात परतले. मूळचे कोल्हापूरचे असलेले वाझे १९९० च्या बॅचचे आहेत. पोलीस उपनिरीक्षक म्हणून पहिली नेमणूक नक्षलग्रस्त भागात गडचिरोलीला झाली होती. १९९०च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डचा दबदबा असतानाच्या काळात सचिन वाझे यांची मुंबईत क्राईम ब्रांचमध्ये नेमणूक झाली. एन्काउन्टर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्याबरोबर त्यांना काम करायला मिळाले होते. आजच्या घडीला वाझे यांच्या नावावर एकूण ६३ एन्काउन्टर आहेत. वाझे तसे पोलीस दलात ज्युनियर अधिकारी आहेत. पण त्यांच्यावर अनेकदा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्यामुळे इतरांच्या विशेषत: विरोधी पक्षाच्या भुवया उंचावणे स्वाभाविकच आहे. यात त्यांचे शत्रू जसे राजकीय नेते आहेत तसेच पोलिस दलातही काही अधिकारी त्यांच्यावर डूक ठेऊन आहेत. महाआघाडीचे सरकार आल्यावर त्यांचे मुंबई पोलीस दलात पुनरागमन झाल्यावर त्यांचे महत्त्व आणखीनच वाढले. अर्णब गोस्वामी प्रकरणात त्यांना अटक करण्यात त्यांच्या नेतृत्वाखालील टीम गेली होती. त्यावेळी झालेला अटकेचे नाटक सर्वांनी पाहिले आहेच. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ज्या टीमने तपास केला त्यात सचिन वाझे होतेच. हृतिक रोशन बनावट ‘ई मेल’ प्रकरणाचा तपास करणाऱ्या टीममध्ये वाझे होते. आता पुन्हा एकदा अंबांनी यांच्या घरासमोर स्फोटकाने भरलेली मोटार आढळल्याप्रकरणी वाझे अडचणीत आले आहेत. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींच्या घरासमोर ही मोटार आढळल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. केंद्र सरकारने याचा तपास एन.आय.ए. कडे सोपविला आहे तर राज्याने याची चौकशी ए.टी.एस.च्या मार्फत करण्याचे ठरविले आहे. एकूण पाहता या प्रकरणाची निपक्षपातीपणाने चौकशी होणे गरजेचे आहे.

0 Response to "वादाच्या भोवऱ्यात वाझे"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel