-->
मानवनिर्मित दुष्काळ संपविण्याचा रोडमॅप

मानवनिर्मित दुष्काळ संपविण्याचा रोडमॅप

रविवार दि. ०४ ऑक्टोबर २०१५ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
मानवनिर्मित दुष्काळ संपविण्याचा रोडमॅप
-----------------------------------------
एन्ट्रो- आपल्याकडे एकूण जो पाऊस पडतो त्यातील ९४ टक्के पाणी हे समुद्रात वाहून जाते. ४.१ टक्के पाणी भूगर्भात जाते व केवळ ०.२ टक्के पाणी आपण जलाशयांच्या मार्फत साठवून ठेवतो. ९९.८ टक्के पाणी हे आपल्या हाताशी लागतच नाही. हे पाहता आपण अतिशय मर्यादीत पाणीसाठ्यावर जगत आहोत. त्यामुळे जे पाणी आपल्या हाती लागते त्याचा योग्य वापर करणे आवश्यक ठरते. आपली बहुतांशी शेती ही पावसावर अवलंबून असल्यान यंदा अनेक पिकांचे उत्पादन घटणार आहे. तसेच आपण गेल्या दोन दशकात सिंचनाखालील क्षेत्र वाढण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. आजही आपल्याकडील सिंचनाखालील क्षेत्र जेमतेम १७ टक्केच आहे. पावसाचे प्रमाण कमी असलेल्या अवर्षणग्रस्त भागातील भूजल पातळी खोल गेली आहे. त्यासाठी पाण्याची पातळी वाढविण्यासाठी विभागवार विचार झाला पाहिजे. शासनाच्या जलसंधारण योजनेनुसार पाणी अडवा पाणी जिरवा, एकात्मिक जलयुक्त शिवार योजना, शेततळी उभारणे, नाला बंडिंग. ओढ्यांचे खोलीकरण, रुंदीकरण व साखळी सीमेंटचे बंधारे बांधण्याच्या योजना राबविल्या जाण्याची आवश्यकता आहे...
-------------------------------------------------
दुष्काळ म्हटला की आपल्याला वाटते की, आपल्यावर वरुणराजा कोपल्याने हे सर्व घडले आहे. परंतु आपली ही कल्पना पूर्णपणे बदलावी लागेल. कारण दुष्काळ हा मुळातच मनुष्यनिर्मित आहे. अगदी सध्याच्या पावसाचे प्रमाण कमी झाले असतानाही आपण दुष्काळातून मुक्ती मिळवू शकतो. मात्र त्यासाठी ध्येयाने प्रेरित होऊन झगडण्याची इच्छा हवी. शेकापने दुष्काळ कायमचा हद्दपार व्हावा यासाठी लातूरमध्ये जे कार्यकर्ता शिबीर आयोजित केले होते ती एक सकारात्मक घटना ठरावी. दुष्काळसाठी जादा निधी द्या किंवा दुष्काळासाठी टँकरचा पुरवठा वाढवा, अशा मागण्या यात न करता विद्यमान सरकारी योजना प्रभावीपणे अंमलात आणून आपण कशा प्रकारे दुष्काळापासून मुक्त होऊ शकतो याचा एक रोडमॅपच तयार करण्यात आला. मुळातच गेल्या काही वर्षात आपल्याकडील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु असे असले तरी आपल्यापेक्षा कमी पाऊस पडणार्‍या इस्त्रायल या देशात जास्त क्षेत्र सिंचनाखाली आहे तसेच हा देश जगात कृषी निर्यात करतो. स्वातंत्र्यानंतर आपण कृषीमध्ये चांगली कामगिरी केली. पंजाबमध्ये हरित क्रांती झाली परंतु देशाचा कृषीतला विकास समान झाला नाही. आपल्याकडे राज्यात अजूनही सिंचनाखालील क्षेत्र जेमतेम १७ टक्केच आहे. तर मराठवाडा व विदर्भाला दुष्काळाने घेरले आहे. १९७२ सालच्या दुष्काळापेक्षा यंदाची स्थिती वाईट आहे असे सांगितले जाते. दुष्काळ पडण्याची जी अनेक कारणे त्या विषयातील तज्ज्ञ सांगतात त्यानुसार पाण्याचा गेल्या काही वर्षात झालेला अतिरिक्त उपसा. आपल्याकडे सहकारी क्षेत्रात साखर कारखानदारी फुलू लागल्यावर उसाचे पीक घेण्याची फॅशनच आली. मात्र हे उसाचे पीक ऐवढे जास्त पाणी घेते की भविष्यात आपल्याला दुष्काळाला सामोरे जावे लागेल असे कुणालाही वाटले नव्हते. कॉ. दत्ता देशमुख-देऊसकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या पाण्याच्या समान वाटपाच्या समितीने खरे तर हा इशारा दिला होता. एकाच उसाच्या पिकावर अवलंबून न राहता विविध पिके घेतली गेली पाहिजेत. पाण्याचे वाटप समान रितीने व्हावे व आठ माही पाणी वाटक जाहीर करावे अशी या समितीने ४० वर्षांपूर्वी केलेली सूचना जर त्यावेळी स्वीकारली गेली असती तर सध्याची स्थिती ओढावली गेली नसती. असो. १९७२ पासून बोअरवेलने पाणी उपसा करण्याचे तंत्र विकसीत झाले आणि आपण आपल्या पायावर धोंडा मारुन घेतला. पाणी मिळते आहे म्हणून त्याच अवास्तव उपसा करण्याचे धोरण सरकारी आशिर्वादाने सुरु झाले. आपल्याकडे एकूण जो पाऊस पडतो त्यातील ९४ टक्के पाणी हे समुद्रात वाहून जाते. ४.१ टक्के पाणी भूगर्भात जाते व केवळ ०.२ टक्के पाणी आपण जलाशयांच्या मार्फत साठवून ठेवतो. ९९.८ टक्के पाणी हे आपल्या हाताशी लागतच नाही. हे पाहता आपण अतिशय मर्यादीत पाणीसाठ्यावर जगत आहोत. त्यामुळे जे पाणी आपल्या हाती लागते त्याचा योग्य वापर करणे आवश्यक ठरते. आपली बहुतांशी शेती ही पावसावर अवलंबून असल्यान यंदा अनेक पिकांचे उत्पादन घटणार आहे. तसेच आपण गेल्या दोन दशकात सिंचनाखालील क्षेत्र वाढण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. आजही आपल्याकडील सिंचनाखालील क्षेत्र जेमतेम १७ टक्केच आहे. पावसाचे प्रमाण कमी असलेल्या अवर्षणग्रस्त भागातील भूजल पातळी खोल गेली आहे. त्यासाठी पाण्याची पातळी वाढविण्यासाठी विभागवार विचार झाला पाहिजे. शासनाच्या जलसंधारण योजनेनुसार पाणी अडवा पाणी जिरवा, एकात्मिक जलयुक्त शिवार योजना, शेततळी उभारणे, नाला बंडिंग. ओढ्यांचे खोलीकरण, रुंदीकरण व साखळी सीमेंटचे बंधारे बांधण्याच्या योजना राबविल्या जाण्याची आवश्यकता आहे. उत्तर कोकणातील अनेक नद्यांचे पाणी जे सागराला जाऊन मिळते ते पाणी मराठवाड्यास कसे फिरविता येईल याची आखणी झाली पाहिजे. एकीकडे पाण्याचा भूजलसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात असताना शेतकरी आत्मह्त्येसारख्या भयाण पर्यायापासून कसा अलिप्त होईल याचा विचार झाला पाहिजे. त्यासाठी शेतकर्‍यांच्या आत्महत्या या नेमक्या कोणत्या कारणांसाठी होतात याचा अभ्यास झाला पाहिजे. आजवरच्या पाहण्यांमधून असे आढळले आहे की, मराठवाडा, विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमागे आर्थिक कारण आहे. शेतकर्‍याला निधीची चणचण भासते त्यासाठी त्याला स्वस्तात कर्ज पुरवठा कसा होईल हे पाहिले पाहिजे. शेतकरी कर्ज घेण्यासाठी सावकाराची पायची चढतो आणि त्यातच तो आपल्या पायावर धोंडा मारुन घेतो. शेतकर्‍याला जर कमी किंमतीत शेतीसाठी कर्ज उपलब्ध झाल्यास तो सावकारांकडे जाणार नाही. यासाठी जिल्हा बँका व सहकारी तसेच राष्ट्रीयीकृत बँका विशेष कर्ज योजना हाती घेऊ शकतात. दुष्काळ आपल्याच हातांनी निर्मिला गेला आहे व आपणच तो संपवू शकतो. याचे उत्तम उदाहरण हे मध्यप्रदेशातील देवासचे देता येईल. अगदी अलिकडे पर्यंत हा दुष्काळी जिल्हा होता. मात्र येथे पाणी जिरविण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न झाले. येथे १२ हजार शेततळी उभारण्यात आली व पाणी अडवा पाणी जिरवा हा प्रयोग प्रभावीपणाने हाती घेण्यात आला. आज येथील दुष्काळ संपुष्टात आला असून तीन व चार पिके घेतली जात आहेत. देवासचे हे उदाहरण आपल्या डोळ्यापुढे ठेवून आपण गेल्यास मराठवाड्याचे वाळवंट नाही तर सुजलाम, सुफलाम करु शकतो. मात्र त्यासाठी आपली राजकीय इच्छाशक्ती पाहिजे आहे. शेकापने लातूरच्या शिबीराच्या माध्यमातून एक सकारात्मक पाऊल टाकले आहे. यातून काही चांगले घडेल असा विश्‍वास आम्हाला वाटतो.
--------------------------------------------------------    

0 Response to "मानवनिर्मित दुष्काळ संपविण्याचा रोडमॅप"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel