-->
अश्रु आणि संताप

अश्रु आणि संताप

शनिवार दि. 16 मार्च 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
अश्रु आणि संताप
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकरांच्या जीवनाचा कधीच भरवसा देता येणार नाही. एक तर सतत अतिरेक्यांच्या धोक्याचे सावच तर असतेच त्याशिवाय कोणती आपत्ती ओढावेल त्याचा नेम नसतो. यातून घरातून कामासाठी गेलेला माणूस सुखरुप घरी येईलच याची खात्री देता येत नाही. काल सायंकाळी मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत असलेल्या ठिकाणी रेल्वेला जोडणारा हाकेच्या अंतरावर असलेला पूल अचानक कोसळला व त्यात पाच जणांचे नाहक बळी गेले, तसेच किमान 50 जण जखमी झाले आहेत. ही घटना पाहता मुंबईकरांचे जीवन किती धोक्याचे झाले आहे याची प्रचिती यावी. बरे हा पूल कोसळल्यावर जबाबदारी झटकण्याची जणू स्पर्धाच सुरु झाली. मुंबई महापालिका म्हणते या पुलाची जबाबदारी रेल्वेची होती तर रेल्वे म्हणते हा पूल महापालिकेच्या ताब्यात होता. या घटनेमुळे मुंबईकरांच्या डोळ्यात आश्रु होते तर दुसरीकडे संताप होता. सर्वसामान्य मुंबईकरांच्या जगण्या मरण्यातील सेतूंनाच प्रशासकीय बेफिकिरीची वाळवी लागल्याचे चित्र या पूल कोसळल्यातून दिसले. पूर्वी या पुलाचे नाव हिमालय होते. मात्र कसाब येथून गेल्याने याचे बोली भाषेतील नामकरण कसाब पूल असे झाले. आज या कसाब पुलाने मुंबईकरांना दणका दिला आहे. या वेळी पुलाखालून जाणार्‍या पादचार्‍यांवरही हा भाग कोसळल्याने दुर्घटनेतील जखमींची संख्या वाढली. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले की नाही, याबाबत माहिती नसल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले. दुर्घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना तत्काळ सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालयात हलवण्यात आले. पुलाखाली केळी विकणारी महिला आणि मुलीसह जाणारी पादचारी महिला होती. त्यांच्यावर पुलाचा भाग कोसळला. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना पाच लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. जखमींच्या औषधोपचारांचाही संपूर्ण खर्च केला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. एकूणच काय तर मुंबईतील रहिवाशांच्या जीवाची किंमत पाच लाख आहे असे यावरुन स्पष्ट झाले. सी.एस.एम.टी. 1980 मध्ये बांधलेल्या पुलाच्या किरकोळ दुरुस्तीची गरज असल्याचे स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये सुचविण्यात आले होते. असे असतानाही एवढी मोठी दुर्घटना झालीच कशी? याची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार असणार्‍या संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली पाहिजे. पालिकेने पुलाचे ऑडिट करून दुरुस्तीसाठी रेल्वे प्रशासनाकडे ना हरकत मागितली होती. मात्र ती अद्याप मिळाली नाही, असा दावा महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केला आहे. तर याबाबत माहिती घेऊन सांगू असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अंधेरी येथील गोखले पुलाच्या दुर्घटनेनंतर महापालिका आणि रेल्वे प्रशासनात जसे आरोप-प्रत्यारोप झाले होते त्याचीच पुनरावृत्ती या प्रकरणी झाली आहे. हिमालय पुलाचा भाग कोसळला, नेेमक्या त्याच्या काही क्षण आधी त्या रस्त्यावरील सिग्नल लाल झाला. त्यामुळे सर्व वाहने उभी राहिली. तरीही पुढे आलेल्या दोन वाहनांवर पुलाचा स्लॅब कोसळलाच. या घटनेतून टॅक्सीचालक वाचला. त्यावेळी सिग्नल सुरू असता, तर मात्र पुलाखालील वाहने दुर्घटनाग्रस्त होऊन मोठी जीवितहानी झाली असती. परंतु सुदैवाने तसे काही झाले नाही. सप्टेंबर 2017 मध्ये एलफिन्स्टन पूल चेंगराचेंंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबईतील सर्वच पादचारी पुलांचे ऑडिट झाले होते. मात्र या पुलाचे झाले नसावे असेच दिसते. नेमकी ही घटना ऑफिस सुटल्यावर झाल्यामुळे घडल्याने येथे जास्त गर्दी होती. सी.एस.टी. स्टेशनच्या बाहेरीलच ही पूल असल्यामुळे येथे त्यावेळी गर्दीच असते. नेमका याच वेळी ही दुर्घटना घडली. मुंबईतील गेल्या दीड वर्षातली ही तिसरी दुर्घटना आहे. 3 जुलै 2018 रोजी अंधेरीत फुटओवर ब्रिज कोसळला होता. त्यात 1 ठार, तर 6 जखमी झाले होते. त्यानंतर 29 सप्टेंबर 2017 रोजी एलफिन्स्टन स्टेशनवर पूल कोसळल्याच्या अफवेमुळे चेंगराचेंगरी होऊन 23 जण ठार झाले होते. मुंबईतील आता अनेक पूल जुने झाले आहेत. यातील काही पूल हे ब्रिटीशींनी उभारलेले आहेत व त्यांचे आयुष्य संपले आहे. आता त्याजागी नवीन पूल उभारणे गरजेचे आहे. मात्र आपल्याकडे राजकीरणी व प्रशासन या दोघांनाही जनतेची काळजी नसल्याने जुने झालेले पूल आपल्याकडे तसेच वापरात आहेत. त्यातूनच अशा दुर्घटना घडला व त्यात नाहक जीव जातात. गेल्या दीड वर्षात तीन घटना घडल्या तरी आपल्याकडे प्रशासन जागे होत नाही. उलट रेल्वे व महानगरपालिका एकमेकांना दोष देत आपल्यावरील जबाबदारी झटकणे पसंत करते. आता तरी यासंबंधी प्रशासनाने जागे होऊन सर्व पुलांची स्थीती तपासून जे मोडकळीस आलेले आहेत त्यांची दुरुस्ती तातडीने करण्याची किंवा नव्याने उभारण्याची आवश्यकता आहे.
------------------------------------------------------------------

0 Response to "अश्रु आणि संताप"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel