
सोनार बांगला
10 मार्च २०२१साठी अग्रलेख
पश्चिम बंगालमधील निवडणूक आता खऱ्या अर्थाने रंगू लागली आहे. भाजपाने यावेळी जोर लाऊन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांना सत्ताभ्रष्ट करण्याचा जणू विडाच उचलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा हे जातिने तळ ठोकून तेथे आहेत व निवडणुकीतील सर्व सुत्रे अमित शहा हलवित आहेत. एवढे सर्व करुन पश्चिम बंगालमध्ये ते कितपत यशस्वी होतात हे पहावे लागेल, परंतु ममतादिदी देखील तेवढ्याच त्वेषाने यावेळी रणांगणात उतरल्या आहेत. गेल्या दोन महिन्यात सत्ताधारी असलेल्या तृणमूल कॉँग्रेसला विविध पातळीवर भगदाड पाडण्यात भाजपा यशस्वी ठरला आहे. त्याचबरोबर त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे काही कार्यकर्तेही पळविले आहेत. ही लढाई जिंकण्यासाठी भाजपाने क्रिकेटवीरांपासून सिनेसृष्टीतील अनेकांचा भाजपा प्रवेश सुकर केला. सौरव गांगुलीला त्यांनी सर्वात प्रथम आपल्याकडे खेचून घेतले होते. परंतु सौरवला नशिबाने काही साथ दिली नाही व मोठ्या आजारपणाचा सामना करावा लागला. त्यातच भाजपाने मिथून चक्रवर्तीसारख्या एकेकाळी ममतादिदींच्या विश्वासातल्या सेलिब्रेटीला आपल्याकडे खेचून घेतले. पंतप्रधानांच्या रविवारी कोलकात्यात झालेल्या रॅलीत मिथूनदांनी भाजपा प्रवेश केला. या प्रवेशामुळे मिथून चक्रवर्ती यांचे राजकीय विचारसारणीचे एक चक्र पूर्ण झाले असे म्हणता येईल. कारण तरुणपणात मिथून चक्रवर्ती हे नक्षलवादी विचारांनी भारावलेले होते. त्यांना वडिलांनी नक्षलवादी विचारांचा स्वीकार केल्याने घरातून हाकलून दिले होते. त्यानंतर त्यांनी मुंबईत येऊन हिंदी सिनेसृष्टीत चांगलेच पाय रोवले. त्याकाळी सत्तेत असलेल्या माकपच्या अनेक नेत्यांच्या ते संपर्कात होते. सरकारचे एक सदिच्छा दूत असल्यासारखेच ते वावरत असत. परंतु त्यावेळी त्यांनी माकपमध्ये सक्रिय होऊन राजकारणात उतरण्याचे ठरविले नव्हते. यामागे महत्वाचे कारण म्हणजे त्यांची सिनेसृष्टीतील कारकिर्दही ऐन भरात होती. परंतु त्याकाळी थेट माकपचे काम न करताही त्यांच्या वर्तुळात वावरत होते. त्यानंतर त्यांचे सिनेसृष्टीतील बहर संपला त्यावेळी माकपचे राज्यातील सरकार जाऊन तेथे तृणमूल कॉंग्रेसचे ममतादीदींच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले होते. तेथे त्यांनी लगेचच जवळीक स्थापन केली आणि दीदींनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त करुन खासदारकी बहाल केली. अलिकडेच त्यांनी प्रकृतीचे कारण सांगत खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यावेळी अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. शेवटी तसेच झाले. गेल्या काही दिवसात मिथूनदा भाजपात प्रवेश करणार अशा वावड्या होत्या. अखेर ते खरेच ठरेल. अशा प्रकारे कडवा डावा विचार ते एकदम उजवा टोकाचा विचार असा मिथूनदांचा प्रवास पूर्ण झाला आहे. अर्थात पश्चिम बंगालमध्ये असा प्रवास आता अनेकांचा झाला आहे. एकेकाळी तब्बल चार दशके सत्तेत असणारा माकप आता पूर्णपणे राज्यात खिळखिळा झाला आहे. पुन्हा सत्तेत येण्याचे आता सोडून द्या, किमान सध्या अस्तित्वात असलेले काही गड त्यांनी जरी कायम राखले तरी खूप होईल असेच दिसते. एकेकाळी तळागाळात जबरदस्त पक्ष संघटना असलेला व शिस्तप्रिय म्हणून गणला गेलेला माकप सत्ता गेल्यावर पूर्णपणे दुबळा झाला आहे. ममतादीदींनी त्यांना सत्तेबाहेर ठेवले खरे परंतु आता ममतादीदींचा भाजपासोबत संघर्ष सुरु आहे. या संघर्षात माकप फारसा कुठे दिसत नाही. दीदींनी एकेकाळी मॉँ, माटी, मानुषी ची जोरदार घोषणा देऊन माकपच्या नेतृत्वाला आव्हान दिले होते. त्यात बंगाली जनतेने दीदींच्या नेतृत्वाला कौल दिला. परंतु गेल्या दोन टर्ममध्ये दीदींनी फारसे नाविष्यपूर्ण राज्यात काही बदल केले नाहीत. त्यामुळे भाजपा आता सोनार बांगलाचे स्वप्न घेऊन पश्चिम बंगालवासियांच्या मनात हात घालण्यासाठी सज्ज झाला आहे. रविवारी नरेंद्र मोदींनी दीदींवर व त्यांच्या पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. परंतु तृणमूलच्याच लोकांची फोडाफोड करुन भाजपाने जमविलेली गर्दी फारसे काही नाविष्यपूर्ण बदल करु शकेल असेही नाही. आज भाजपाकडे जातियवादी प्रचार व अन्य पक्षातून फोडलेले कार्यकर्ते आहेत. यातून ते यशस्वी होतील का ते पहावे लागेल. एकेकाळी ज्या मातीत लाल बावटा रुजला होता तेथे भाजपाचे कमळ फुलेल का, असा सवाल आहे. जर खरोखरीच असे झाले तर पश्चिम बंगालमध्ये वैचारिक मतपरिवर्तन झालेले दिसेल. अर्थात भाजपासाठी ही लढाई सोपी नाही. ममतादीदींची वैयक्तीक प्रतिमा ही सर्वात चांगली आहे, त्याचा त्यांना गेल्या वेळच्या विधानसभेलाही फायदा झाला. यावेळी त्याचा हा करिष्मा कायम आहे का? जनतेत त्यांच्याविषयी रोष आहे ते समजेल. बंगालच्या विकासाची हमी घेऊन पंतप्रधान मोदी या रणांगणात उतरले आहेत. परंतु त्यांनी खरे तर राज्यात सत्ता नसताना येथे केंद्र सरकारच्या माध्यमातून चार चांगल्या गोष्टी करुन दाखविल्या असता तर जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला असता. परंतु तसे काही झालेले नाही. ममतादीदींशी संघर्ष असल्याने केंद्राने मोदींच्या काळात पश्चिम बंगालच्या विकासाच्या दृष्टीने काही काम केले नाही. उलट सरकारची अनेकवेळा नाकेबंदीच केली आहे. आता सत्ता आल्यावर हाच भाजपा सोनार बांगला काय करुन दाखविणार असा सवाल आहे.
0 Response to "सोनार बांगला"
टिप्पणी पोस्ट करा