-->
संपादकीय पान बुधवार दि. १३ मे २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
अम्मा मुक्त झाल्या!
अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा नेत्या जयललिता व त्यांच्या तीन सहकार्‍यांची ६६.६४ कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती बाळगल्याच्या प्रकरणातून कर्नाटक उच्च न्यायालयाने सोमवारी मुक्तता केली. ज्या प्रकारे सलमान खानच्या निकालाचे झाले तसेच काहीसा आश्‍चर्यकारक निकाल जयललितांचा लागला आहे. खरे तर तामीऴनाडूनतल्या कोर्टातून हा खटला कर्नाटकात नेण्यात आला होता. यामागचे महत्वाचे कारण म्हणजे तामीळनाडूत जयललितांचा पक्ष सत्तेत असल्याने त्याचा निकालावर परिणाम होऊ शकतो. मात्र असे होऊनही जयललिता अम्मा सुटल्या आहेत. गुजरातमधील दंगलींचे खटले देखील निप:क्षपातीपणाने चालावेत म्हणून मुंबईत चालविण्यात आले होते. शेवटी अम्मांचा खटला व गुजरात दंगलींचा खटल्याचा निकाल खटल्याची जागा बदलूनही जो लागावयाचा तोच लागला, असे म्हणता येईल. या निकालामुळे तामीळनाडूच्या राजकारणाला एक नवी कलाटणी मिळणार आहे हे नक्की. कारण येत्या वर्षात तामीळनाडू विधानसभेची निवडणूक येऊ घातली आहे. तामीळनाडूच्या यापूर्वीच्या निकालामुळे जयललितांचा राजकीय विरोधक असलेला द्रमूक हा पक्ष खूष होता. अर्थात हे दोन्ही पक्ष म्हणजे एकाच माळेचे मणी आहेत. मात्र असे असले तरी राजकीय हाडवैरी आहेत. द्रमूकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांची कन्या कनीमोळी व ए. राजा यांना स्प्रेक्ट्रम घोटाळ्यात तुरुंगाची हवा खावी लागली होती. त्यामुळे आपल्या सोबत जर जयललिता या भ्रष्टाचाराच्या मुद्यावर अडकल्या तर राजकीयदृष्ट्या लाभ आपल्याला होणार अशी खूणगाठ द्रमूकचे नेते बांधून होते. मात्र आता या निकालामुळे सर्व फासे उलटे फिरले आहेत. उलट यामुळे जयललिता यांच्या बाजूने सहानभूतीची लाट येऊ शकते. त्यादृष्टीने आपल्या बाजूने हवा निर्माम करण्यात जयललिता हुशार आहेत व त्या या खटल्याचे योग्यरित्या भांडवल करु शकतात. या प्रकरणी निर्दोष सुटल्याने जयललितांना आकाशच ठेंगणे झाले. आपण कोणतेही बेकायदेशीर कृत्य केले नसून हे सगळे द्रमुक पक्षाचे कारस्थान होते, असे निवेदन जयललितांनी या निकालानंतर केले आहे. हे सर्व तामिळी प्रादेशिक पक्षांच्या क्षुद्र राजकारणाला साजेसेच राजकारण आहे. जयललिता या काही धुतल्या तांदळासारख्या स्वच्छ राजकारणी नव्हेत! त्यांचे कपडे, त्यांच्या चपला किती हजारो आहेत याची वर्णने यापूर्वीच आली आहेत. जयललितांनी भ्रष्टाचार केला यात काहीच शंका नाही मात्र ज्यावेळी त्यांना यात गोवण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी त्यांनी त्याचेही भांडवल केले. त्यांची आजवरची कारकीर्द ही राजकीय तडजोडी व वादग्रस्त प्रकरणांनी भरलेली आहे. तामिळनाडूमध्ये अस्मितेचे संकुचित राजकारण करूनच अण्णाद्रमुक व द्रमुक या पक्षांनी आपले अस्तित्व टिकवले आहे. या दोन्ही पक्षांचे परस्परांशी हाडवैर आहे. या दोन्ही पक्षांपैकी ज्याच्या हातात सत्ता येतं तो आपल्या परंपरागत राजकीय शत्रूवर हर प्रकारे कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो. करुणानिधी मुख्यमंत्री असताना जयललितांचे राजकीय धिंडवडे काढण्यासाठी ते टपलेले होते. सध्या भाजपामध्ये डेरेदाखल झालेल्या डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी जयललितांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी याचिका दाखल करुन त्यांच्यापाठी शुक्लकाष्ठ लावून दिले. हा खटला न्यायालयीन प्रक्रियेत सुमारे वीस वर्षे रेंगाळला ही आपल्यकडील व्यवस्थेची नामुष्की आह, असेच म्हणावे लागेल. जयललितांच्या बाजूने न्यायालयाने दिलेल्या निकालावर अनेकांनी कोरडे ओढले असून सामान्य माणसांच्या मनातही काही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांचे निराकरण होण्याची गरज आहे. विशेष न्यायालयाने जयललितांना २७ सप्टेंबर २००४ रोजी दोषी ठरवल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले व त्या पदावर त्यांच्या मर्जीतील खास असलेले पनीरसेल्वम विराजमान झाले होते. आता या निकालामुळे पुन्हा एकदा जयललिता यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालामुळे निवडणुका लढवण्यावर जयललितांवर लागू असलेली बंदीही मोडीत निघाली असून त्या आता पुन्हा मुख्यमंत्री होणे अटळ आहे. तामिळनाडूतील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन व जयललिता यापुढेही तुरुंगातच असणार, असे गृहीतक मनात ठेवून भाजप त्या राज्यात आपले पाय भक्कमपणे रोवण्याचा प्रयत्न करीत होता. त्यांच्या मनसुब्यावरही आता पाणी पडले आहे. तामिळनाडूमध्ये कॉंग्रेस तर निराशेच्या गर्तेत पूर्णपणे अडकलेली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची लाट असतानाही त्यांची मात्रा तामिळनाडूत चालली नाही. राज्यात ३९ पैकी ३७ जागा जिंकत जयललितांच्या अण्णाद्रमुकने विद्यमान लोकसभेतील सर्वात जास्त जागा मिळवणारा तिसर्‍या क्रमांकाचा पक्ष असे स्थान पक्के केले होते.  गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीत जयललितांनी चक्क भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी समझोता केला होता. यामागचे महत्वाचे कारण म्हणजे त्यांची पंतप्रधान होण्याची काही इच्छा लपून राहिलेली नाही. जर समजा भाजपाला बहुमत मिळाले नसते तर डाव्या आघाडीचे नेतपद आपल्याकडे घेऊन पंतप्रधान होण्याचा त्यांचा डाव होता. मात्र त्यांची ही खेळी काही यशस्वी झाली नाही. आजवर जयललितांनी भाजपा, कॉँग्रेस यांच्याशी वेळोवेळी सत्तेत सहभागी होण्यासाठी हातमिळवणी केली होती. त्यामुळे जयललिता सत्तेच्या केंद्रस्थानी राहाण्यासाठी कोणतेही राजकारण करु शकतात. आता त्यांच्या वरील खटल्याचे बालंट दूर झाल्याने त्या पुन्हा एकदा राजकीयदृष्टया सुसाट सुटतील. या घटनेचा तामीऴनाडूच्या राजकीय घडामोडींवर फार मोठा बदल होईल हे नक्की.
-------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel