-->
संपादकीय पान मंगळवार दि. १२ मे २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
नक्षलवाद्यांच्या गुहेत मोदी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या विदेशी दौर्‍यातून अखेर सवड काढत नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या छत्तीसगढच्या बस्तर या भागास भेट दिली. तेथे त्यांनी विकासाच्या विविध योजनांचा प्रारंभ करण्याच्या घोषणा करीत नक्षलवाद्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग सोडून द्यावा असे आवाहन केले. पंतप्रधान येणार असल्याने प्रशासनाने तेथे कडेकोट बंदोबस्त ठेवला असला तरीही तेथून ७० कि.मी. अंतरावरील एका गावातील १२०० गावकर्‍यांना नक्षलवाद्यांनी एकत्र बोलावून त्यांना बराच काळ ओलीस ठेवले होते. हे गावकरी पंतप्रधान मोदी यांच्या सभेला जाणार होते. जिल्हा प्रशासनाला या ओलिस प्रकरणाची पूर्ण कल्पना होती. मात्र ते काही करु शकले नाहीत. यावरुन नक्षलवाद्यांनी आपला या भागात प्रभाव कायम असल्याचे प्रशासनाला दाखवून दिले. माओवाद्यांनी बंदुका सोडून हाती नांगर धरावा आणि नक्षलवादाचा मार्ग सोडून विकासाच्या वाटेवर येण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील भाषणात केले. बस्तरसह नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या परिसरात सुमारे २४ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा प्रारंभ पंतप्रधानांनी केला. माओवाद्यांनी ज्या निरपराध लोकांना मारले आहे, त्यांच्या घरी जाऊन कुटुंबाचे दु:ख पाहिले की ते स्वतहून हिसेचा मार्ग सोडतील, असे ते म्हणाले. पंतप्रधानांच्या उपस्थितीत रौघाट-जगदलपूर रेल्वेमार्ग, बस्तरमध्ये पोलादप्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे. नक्षलवाद्यांनी केवळ घरदार, शाळाच नाही, तर डोक्यावरचे छत्रही हिरावून घेतले तरीही हार न मानता आयुष्यात काही तरी ध्येय गाठायचे, हे ठरविलेल्या मुलांच्या खास शाळेला पंतप्रधानांनी भेट दिली. पंतप्रधांनी येथील शाळेत मुलांशी संवाद साधला व त्यांच्याच भाषेत बोलायचे तर मन की बात केली. मात्र प्रशासकीय यंत्रणेने ही भेट एवढी बंदोबस्तात ठेवली होती की तेथील मुलांना अनेकदा इच्छा असूनही प्रश्‍न विचारता आले नाहीत. त्यामुळे पंतप्रधांनानी आपल्याला काय वाटते तेच सांगितले. तेथील मुलांना काही बोलताच आले नाही. येथील चुणचुणीत मुलांनी पंतप्रधानांना यशाचे रहस्य, मार्ग, जीवनातील ध्येय आणि त्यांच्या आयुष्यातील कठीण क्षण याविषयी प्रश्न विचारले. पण मात्र नक्षलवादाबद्द  विचारता आले नाही. एकूणच ही भेट म्हणजे वरवरची झालेली एक सदिच्छा भेट ठरली.
आयुष्यात वाटचाल करीत असताना यशापयशाकडे न पाहता केवळ ध्येयाकडे बघून वाटचाल करण्याचा सल्ला मोदी गुरूजींनी या मुलांना दिला. मी अपयशामध्ये खचून न जाता वाटचाल करीत राहतो आणि यशाकडे फारसे लक्ष न देता वाटचाल करतो. प्रत्येकाने आपले उद्दिष्ट ठरवून कितीही अडचणी आल्या तरी न डगमगता वाटचाल करण्याचा गुरूमंत्र या मुलांना दिला. मोदींच्या या बस्तर भेटीत नक्षल्यांकडून हिंसाचार अपेक्षित होताच. नक्षलवाद्यांनी थेट गावकर्‍यांनाच वेठीस धरले. दंतेवाडाच्या सभेत मोदी विकासाची भाषा करीत असताना तिकडे नक्षल्यांनी याच विकासाचा आग्रह धरणार्‍या शेकडो गावकर्‍यांना ओलीस ठेवून त्यांच्यासमोर सरकारविरोधी भाषण केले व एकाची हत्या करूनच या नाटयाचा शेवट केला. या चळवळीकडून केंद्राला मिळालेले हे थेट आव्हान आहे, हेच या घटनाक्रमातून स्पष्ट झाले. लोकशाहीसाठी हे आव्हान स्वीकारायचे तर केंद्र व राज्य सरकारांना याविरुद्ध अधिक कठोर भूमिका घेणे भाग आहे. देशातील सत्ताबदलानंतर केंद्र या प्रश्नावर काही ठोस भूमिका घेईल, ही अपेक्षा फोल ठरली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह या प्रश्नावर तेच तेच बोलताना दिसतात. छत्तीसगडात भाजपची सत्ता आहे, पण तेथील त्यांनाही हिंसाचार रोखणे शक्य झालेले नाही. आजवर सरकार विकासाची भाषा केवळ बोलत राहिले व नक्षली लोकांचे गळे कापत राहिले. हे चित्र आता तरी बदलणे गरजेचे आहे. सरकारच्या याच बोटचेपेपणाचा फायदा घेत नक्षल्यांनी आता पश्चिम घाटात विस्ताराचा कार्यक्रम हाती घेतला आहे. नक्षल्यांचा हा कार्यक्रम बहुस्तरीय असतो. एकाच वेळी वेगवेगळे घटक वेगवेगळ्या स्तरांवर काम करीत असतात. त्यांच्या अनेक समर्थक संघटना सध्या पुण्यात सक्रिय आहेत. हे सारे एका सूत्रात बांधले गेले आहेत. पश्चिम घाटाचा प्रारंभ व शेवट, अशा दोन्ही ठिकाणी ही चळवळ सक्रिय होत असल्याचे पुणे व केरळमधील घटनांवरून दिसून आले आहे. केवळ ग्रामीणच नाही, तर शहरी भागातही प्रभावक्षेत्र निर्माण करणार्‍या या चळवळीचा तेवढयाच ठोसपणे मुकाबला करणे गरजेचे आहे. सत्तेच्या पातळीवर ही समर्थता दिसून येत नाही, हे दुर्दैवी आहे. नक्षलवादी चळवळ ही एक क्रांतीकारी मार्गाने मार्क्सवाद लेनिनवाद आणणारी चळवळ आहे. जगातील डाव्या चळवळीचा तो एक घटक आहे. मात्र त्यांची काम करण्याची पध्दती ही सशस्त्र आहे. त्यांचा सध्याच्या व्यवस्थेवर विश्‍वास नाही. केवळ सशस्त्र क्रांती करुनच आपण जनतेचे प्रश्‍न सोडवू शकतो यावर नक्षलवाद्यांचा विश्‍वास आहे. खरे तर ही काही अतिरेकी संघटना नव्हे. परंतु गेल्या काही वर्षात त्यांनी या चळवळीला जे हिंसक रुप दिले व त्यातून जी हिंसा झाली त्यामुळे याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. अनेकदा क्रांतीच्या लाल झेंड्याखाली नक्षलवाद्यांनी खंडणी उकळण्याचे धंदे केल्याने ही चळवळ बदनाम झाली आहे हे विसरता कामा नये. गेल्या कित्येक वर्षात नक्षलवाद्यांच्या प्रभाव क्षेत्रात विकास झालेला नाही. त्यामुळे विकासाच्या आसेपोटी म्हणा किंवा नक्षलवाद्यांच्या धाकापोटी येथील जनता त्यांच्या मागे आहे. तेथील लोकांचे प्रश्‍न सोडविणे महत्वाचे आहे. केवळ नक्षलवाद्यांना दोष देऊन चालणार नाही हे मोदींनी लक्षात घेणे जरुररीचे आहे.
------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel