-->
संपादकीय पान सोमवार दि. ११ मे २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
ब्रिटनमध्ये जैसे थे!
आपण ज्या देशाकडून लोकशाही घेऊन ती आपल्याकडे रुजवली त्या ब्रिटनमध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय वंशांच्या नागरिकांचा प्रभाव राहावा हा एक मोठा योगायोग म्हटला पाहिजे. केवळ योगायोग नव्हे तर भारत ब्रिटनचे जे जुने संबंध आहेत ते कशा प्रकारे वृध्दींगत होत आहेत त्याचे ते एक द्योतक ठरावे. त्याचबरोबर भारताची अर्थव्यवस्था ज्या गतीने धावत आहे त्यापेक्षा कित्येक पटीने ब्रिटनची अर्थव्यवस्था मंदावली आहे, हा एक काव्यगत न्यायच म्हटला पाहिजे. या पार्श्‍वभूमीवर ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांच्या हुजूर पक्षाला ब्रिटनच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले असून, निकाल त्रिशंकू लागतील हे निवडणूकपूर्व संकेत धुळीस मिळवत तो सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. यावेळी ब्रिटनच्या निवडणुकीत त्रिशंकू स्थिती असेल असे अंदाज व्यक्त केले होते. परंतु या अंदाजांना हरताळ लावत हुजूर पक्षाला गेल्या कित्येक वर्षात प्रथमच स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे. या निवडणूक निकालांनी आघाडीचे राजकारण संपुष्टात आणले आहे. कॅमेरुन यांच्या पक्षाला ३२७ जागा मिळाल्या असून, ६५० जागांच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये त्यांनी निम्म्या जागांचा म्हणजेच साधारण बहुमताचा आकडा थोडक्यात पार केला आहे. ब्रिटनपासून स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्‍या स्कॉटिश नॅशनॅलिस्ट पक्षाला आश्चर्यजनक विजय मिळाला असून, ५९पैकी ५६ जागा मिळाल्या आहेत. २०१०च्या निवडणुकीत फक्त ६ जागा मिळवणार्‍या या पक्षाने मोठीच उडी मारली आहे. पण मजूर पक्षाची पार निराशा झाली आहे. ब्रिटनमध्ये हुजूर व मजूर हे दोन मुख्य पक्ष असेल तरी लहान पक्षांचेही अस्तित्व आहे. यातील यावेळी लहान पक्ष म्हणून ओळखल्या गेलेल्या स्कॉटिश नॅशनल पक्षाला यावेळी उत्तम पण अनपेक्षित असे यश लाभले आहे. २०११च्या जनगणणेनुसार ब्रिटनची लोकसंख्या सुमारे ५.३० कोटी एवढी होती. त्यातील ३० लाखाहून जास्त लोकसंख्या विदेशी नागरिकांची आहे. भारतीय वंशांचे सुमारे ११ लाख लोक आहेत. त्यामुळे भारतीय मतदारांचा कुणाला कौल असेल हे महत्वाचे ठरते. आजवर अनेकदा तेथील भारतीयांनी मजूर पक्षाला मतदान करणे पसंत केले होते. मात्र गेल्या दशकात हे मतदान हुजूर पक्षाच्या दिशेने वळले आहे. यावेळी देखील हुजूर पक्षाला मतदान करण्याकडे मूळ भारतीय वंशांचा कल होता. भारतीय मतांचे हे महत्व ओळखून यावेळी हुजूर पक्षाने प्रचारात भारतीय भाषांतील गाण्याचा प्रयोग केला होता. तसेच अभिषेक बच्चन, ऐश्‍वर्या बच्चन यांनाही प्रचारात उतरविले होते. भारतीय वंशांच्या नागरिकांचे बॉलिवूड प्रेम लक्षात घेऊन ते कॅच करण्यासाठी एक नामी युक्ती हुजूर पक्षाने योजली होती. त्यात त्यांना यश आले असे म्हणता येईल. इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायणमूर्ती यांचे जावई रिषी सुनक हे ३४व्या वर्षी खासदार झाले आहेत. हुजूर पक्षाच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढविली होती. ब्रिटन हा देश स्कॉटलंड, इंग्लंड, उत्तर आयर्लंड यांचा मिळून तयार झाला आहे. युरोपात सध्या मंदीचे ढग असल्याने त्यातून ब्रिटन काही सुटलेला नाही. मात्र अन्य युरोपियन देशांच्या तुलनेत ब्रिटनची अर्थव्यवस्था सुधारण्याच्या मार्गावर आहे. स्कॉटलंड हा देश म्हणून ब्रिटनपासून विभक्त होणार की हा देश एकसंघ राहाणार हा विषय सध्या चर्चेत मोठ्या प्रमाणात होता. परंतु आता स्कॉटिश नॅशलन पक्षाला जास्त जागा मिळाल्याने ब्रिटनचे एकसंघत्व एकत्र राहाणे सध्यातरी कठीण दिसते. स्कॉटलंडच्या प्रश्‍नी यापूर्वी घेतलेल्या जनमत चाचण्यात ब्रिटनपासून वेगळे न होण्याचा कल मिळाला होता. आता मात्र स्कॉटिश नॅशनल पक्षाला लोकांनी उचलून धरल्याने लोकांचा कल स्कॉटलंड वेगळे करण्याचा दिसतो. अर्थात या प्रश्‍नी ब्रिटनमध्ये बराच खल आगामी काळात होऊ शकतो. त्यानंतर याबाबत निर्णय होईल. यावेळच्या निवडणुकीत अनेक प्रश्‍न चर्चेत आले होते. जसा स्कॉटलंडचा प्रश्‍न होता तसेच एकेकाळी जगात साम्राज्य असणार्‍या या देशाची आर्थिक तूट पाच टक्क्यांवर गेली आहे. यावर सध्याचे कॅमरुन सरकार फारसे काही करु शकले नाही. मात्र त्यांना पुन्हा एकदा संधी देऊन ही अर्थव्यस्था मार्गी लावण्याची संधी निर्माम करुन दिली आहे. त्याचबरोबर जनतेच्या आर्थिक स्वातंत्र्याचा मुद्दा इथे निवडणुकीत चर्चेत होता. विदेशी नागरिकांचा प्रामुख्याने नव्याने येणार्‍या जनतेच्या रोजगाराची समस्या आहे. त्यामुळे ब्रिटनने विदेशी विद्यार्थ्यंना शिक्षण झाल्यावर नागरिकत्व देण्याचे नाकारले होते. कारण यामुळे स्थानिकांच्या अस्तितत्वाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. आता मात्र स्कॉटिश नॅशनल पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात भारतीय विद्यार्थ्याने शिक्षण पूर्ण केल्यावर त्याला दोन वर्षे तेथे राहाण्याचा व्हिसा देण्याचे आश्‍वासन दिले होते. आता त्यांना हे आश्‍वासन पूर्ण करावे लागणार आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांचा ओघ वाढेल, यात काही शंका नाही. या निवडणुकीतून मजूर पक्षाला लोकांनी स्पष्टपणे नाकारले आहे. हुजूर पक्षाला अनेक आर्थिक सुधारणा ज्या त्यांच्या गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत करता आल्या नाहीत त्या आता करण्याची संधी चालून आली आहे. ब्रिटनमध्ये भांडवलशाही चांगलीच रुजली आहे. त्यापेक्षाही तेथील लोक व्यक्तीगत स्वातंत्र्याच्या प्रश्‍नाला जास्त महत्व देतात. कॅमेरुन याची आता खर्‍या अर्थाने कसोटी सुरु झाली आहे. कारण युरोपातील आर्थिक संकटावर त्यांना मात करावयाची आहे. तसेच देश एकसंघ ठेवण्याचीही किमया करावी लागणार आहे.
-----------------------------------------------------------  

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel