-->
कर्नाटकी नाट्य

कर्नाटकी नाट्य

बुधवार दि. 09 मे 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
कर्नाटकी नाट्य
कार्नटकातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आल्याने प्रत्येकावर आरोपांच्या फैरी झोडण्याची संधी कॉग्रेस व भाजपा हे दोन्ही पक्ष सध्या सोडत नाहीत. कर्नाटकाची निवडणूक ही दोन्ही पक्षांसाठी पुढील वर्षात येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीची रंगित तालीम ठरणार आहे. या निकालांवर दोन्ही पक्षांची भऴिष्यातील राजकीय आखणी सुरु होईल. सर्वात महत्वाचे म्हणजे, कर्नाटकात कॉग्रेसला सत्ता कायम राखणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे. तर भाजपाला सत्ता काबीज करणे हे प्रतिष्ठेचे आहे. कारण दक्षिणेतील या राज्यात भाजपाची दहा वर्षापूर्वी असलेली सत्ता कॉग्रेसने हिसकावून घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: कर्नाटकात गेले चार दिवस तळ ठोकून आहेत. कर्नाटक निवडणुकीच्या प्रचाराला आता रंग चढला असून या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने कुत्र्यांकडून देशभक्ती शिकावी, अशी खोचक टीका काँग्रेसवर जमखंडी येथील प्रचार सभेत बोलताना केल्याने पंतप्रधानांवर टिकेची झोड उठणे स्वाबाविक आहे. उत्तर कर्नाटक प्रांतात आढळणार्‍या मुधोळ प्रजातीच्या शिकारी कुत्र्यांचा नुकताच भारताच्या लष्करामध्ये समावेश करण्यात आला आहे. भारतीय लष्करामध्ये अशाप्रकारे समावेश करण्यात आलेली मुधोळ या भारतीय कुत्र्यांची पहिलीच प्रजाती आहे. मोदी म्हणाले, ज्यांना देशभक्तीच्या नावाने त्रास होतो, देशभक्तीच्या चर्चेविरोधात आहेत किंवा ज्यांना देशभक्ती आवडत नाही, त्यांना मी सांगतो, की तुम्हाला दुसर्‍याकडून शिकायचे नाही तर नका शिकू. मग ते तुमचे पूर्वज असो किंवा काँग्रेस. मात्र, बागलकोटच्या मुधोल कुत्र्यांकडून तरी शिकण्याचा प्रयत्न करा, अशी टीका त्यांनी यावेळी विरोधकांवर केली. पंतप्रधानांसारख्या व्यक्तीने आपल्या पदाचा मान राखत प्रचार केला पाहिजे पण मोदी ते देखील पाहत नाहीत. कोणत्याही थराला जाऊन तेथे आरोप करीत ते सुटले आहेत. अर्थात त्यामुळे त्यांची प्रतिमा मलिन होत आहे. मात्र काहीही करुन सत्ता काबीज करावयाची हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. कॉग्रेसच्या प्रचाराची धुरा पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांच्याकडे आहे, तर यावेळी यात प्रचारासाठी सोनिया गांधी देखील उतरणार असल्याची बातमी आली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी आपली सर्व शक्ती यावेळी पणाला लावली आहे. त्यामुळे आजवर गेल्या चार वर्षात कॉग्रेस कधी दिसली नाही ऐवढी आक्रमक या निवडणुकीत दिसली आहे. शहाणपणाची मक्तेदारी फक्त आपल्याकडेच आहे, असा समज करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमानी धोरणे राबवून अर्थव्यवस्थेचे गैरव्यवस्थापन केल्याने देशावर आर्थिक संकट ओढवले आहे, अशी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केलेली टिका रास्तच होती. त्यावरुन आता पुन्हा भाजपा आक्रमक होणार आहे. मात्र डॉ. मनमोहनसिंग यांनी जे वक्तव्य केले आहे ते काही चुकीचे नाही. नोटा बंदी व त्यानंतर घाईघाईने आणलेला जी.एस.टी. यामुळे अर्थव्यवस्थेचे पार वाटोळे झाले आहे. आमचे इरादे साफ असल्याचे मोदी सरकार सांगते, पण त्यांच्या निर्णयांना व धोरणांना तर्कसंगती नाही़ नेमके काय घडते, याचे विश्‍लेषण करण्याची तयारी नसल्याने देशाचे मोठे नुकसान होत आहे. देश सध्या बिकट कालखंडातून जात आहे. शेतकरी संकटात आहेत, तरुण पिढीला नोकर्‍यांच्या संधी नाहीत आणि अर्थव्यवस्थेचा विकास क्षमतेहून कमी दराने होत आहे. हे टाळता येण्यासारखे होते तरी टाळले गेले नाही. सर्व आव्हानांना खंबीरपणे सामोरे जाण्याऐवजी चुका व त्रुटी दाखविणाजयांची तोंडे बंद करण्याची सरकारची वृत्ती आहे. सरकारच्या आर्थिक धोरणांचा जनतेच्या जीवनावर मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे सरकारने लहर व मर्जीनुसार काम न करता काळजीपूर्वक धोरणे राबविणे गरजेचे असते. हे सरकार अर्थव्यवस्था जोमात असल्याचे फसवे चित्र रंगविते. यापूर्वीच्य सरकारच्या काळात जगभरात प्रतिकूल परिस्थिती असूनही विकासदर सरासरी 7 टक्के राहिला होता व एकदा तर तो 8 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. मोदींनी पातळी सोडून प्रचार केल्याने पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेस कमीपणा आल्याची टीकाही डॉ. मनमोहन सिंग यांनी केली होती. महाराष्ट्राला लागून असलेल्या कर्नाटकातील सीमाभागात विधानसभा निवडणुकीचे वातावरण दिसत असले तरी येथील प्रचार थंडच आहे. अनेक वादग्रस्त मुद्यांना येथे पूर्णपणे बगल देण्यात आली आहे. यावेळी देखील सीमाभागातील मराठी भाषिकांची समिती आपले वचर्स्व कायम टिकवेल असे दिसते. येथील प्रचार हा मराठीतच अजूनही होेतो, हे एक आणखी त्याचे वैशिष्ट्य. सीमा भागातील प्रमुख शहर असलेल्या बेळगावमध्येही कुठेही फार मोठ्या प्रमाणात प्रचार झालेला दिसत नाही. राहूल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे त्यांचे नेतृत्व सिध्द करण्यासाठी आलेली एक चांगली संधी आहे. गुजरातमध्ये त्यांनी आपल्या नेतृत्वाची चांगली चुणूक दाखविली होती, मात्र त्यांना नशिबाने साथ दिली नाही. आता इथे कर्नाटकात पुन्हा एकदा त्यांची कसोटी लागणार आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकेल, पण त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल, असा निष्कर्ष बहुतांशी जनमत चाचणीत निघाला आहे. जनता दल (सेक्युलर)च्या मदतीशिवाय कोणालाही सरकार बनविता येणार नाही, याचा अर्थ सत्तेच्या चाव्या माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या हाती येणार आहेत. अर्थात या सर्व बाबी निकालानंतरच्या झाल्या. आता निकाल अंतिम टप्प्यात आला असताना निवडणुकांना रंग मात्र चढला आहे, हे सध्याचे वास्तव आहे.
-------------------------------------------------------

0 Response to "कर्नाटकी नाट्य"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel