-->
भुजबळ सुटले, पुढे काय?

भुजबळ सुटले, पुढे काय?

सोमवार दि. 07 मे 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
भुजबळ सुटले, पुढे काय?
राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची अखेर जामीनावर तब्बल दोन वर्षानंतर सुटका झाली आहे. गेल्या महिन्यात भुजबळ सुटतील अशी दोनवेळा स्थिती निर्माण झाली होती परंतु त्यांची सुटका व्हायला अखेर मे महिना उजाडला. भुजबळांना अटक झालेल्या पी.एम.एल.ए. या कायद्यातील कलम 45 न्यायालयाने कालबाह्य ठरविल्याने त्यांची सुटका होणे शक्य झाले आहे. महाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स या प्रकरणात काळा पैसा प्रतिबंधक कारवाई अंतर्गत त्यांच्यावर सक्तवसुली संचनलायाकडून कारवाई करण्यात आली होती. राजकारणात उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेले भुजबळ हे दोन वर्षे जेलची हवा खातील असे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हते. ज्या सेलचे उद्दघाटन त्यांच्या हस्ते झाले होते त्या जेलमध्य्े त्यांना रहावे लागला ऐवढा दुदैवविलास अन्य कुणाच्याही बाबतीत झालेला नसावा. पण भुजबळांच्या कपाळी हे दुदैव आले. एकेकाळी मुलुख मैदान तोफ म्हणून भाषणे गाजविणे भुजबळ जेलमधील वास्तव्यात पूर्णपणे खंगले होते. सत्ता असताना सतत त्यांच्या भोवती फिरणारे त्यांच्या भोवती आता नव्हते. फारच मोजक्या राजकारण्यांनी भुजबळांना तुरुंगात भेट घेऊन आपली मैत्री सदैव टिकणारी आहे, असे सांगितले होते. परंतु आर्थिकदृष्ट्या भुजबळ संपले होते. सर्व बँकांची त्यांची खाती सील झालेली असल्यामुळे घरच्याभोवतीची आर्थिक अडचणी होत्या. त्यातच त्यांची प्रकृती तुरुंगात काही साथ देत नव्हती. बाहेर रुग्णालयात आले तरी ते आजारपणाचे नाटक करीत असल्याचा आरोप होई. मध्यंतरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळांना काही झाल्यास त्याची जबाबदारी सरकारवर असेल असा इशारा दिला होता. भुजबळ यांनी आता सत्तरी ओलांडली आहे. त्यांना जामीन मिळाला त्यावेळी देखील भुजबळ रुग्णालयातच होते. आता बहुदा जामीन मिळाल्याने सरकारी रुग्मालयातून खासगी रुग्णालयात ते जातील. त्यांची प्रकृती सुधारल्यावर ते कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकाराणात तळागाळात काम करुन नेता बनणार्‍यांची संख्या फार कमी आहे. भुजबळ हे त्यातील एक नेते आहेत. अगदी शून्यातून भुजबळ उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले आहेत. आता देशातील राजकारणाचा बाज पूर्णपमे बदलला आहे. वडिल, भाऊ, काका यांच्या पुण्याईवर अनेक तरुण आमदार, खासदार बनून थेट विधानसभा, लोकसभेत पोहोचतात. पण छगन भुजबळ मात्र अशा राजकारणाला अपवाद आहेत. सर्वसामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास आहे. समाजाच्या तळागाळात पोहोचून भुजबळांनी स्वत: ओळख बनवली. मात्र त्यांच्या पुढच्या पिढीला मात्र भुजबळांच्या तयार राजकारणाचा पाया मिळाला. त्यातूनच त्यांचा मुलगा व ुतण्या सध्या राजकारणात पाय रोऊन आहेत. सध्या ओबीसी समाजाचे नेते अशी छगन भुजबळ यांनी ओळख प्रस्थापित केली असली तरी त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेपासून झाली. शिवसेनेत त्यांना कोणत्याही जातीचा शिक्का नव्हता. बाळासाहेबांचे एकेकाळचे निष्ठावान पाईक अशी त्यांची ओळख होती. राजकारणात येण्यापूर्वी छगन भुजबळ भायखळा मार्केटमध्ये भाजी विक्रेते होते. मॅकेनिकल इंजिनियरींगमध्ये पदवी घेतलेल्या भुजबळांनी आपला भाजीचा व्यवसाय हा आपल्या उच्चशिक्षणानंतरही केला. त्यानंतर 1960 च्या दशकात त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. अल्पावधीत त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विश्‍वास संपादन केला व या विश्‍वासाला पात्र ठरत ते शिवसेनेच्या वरच्या फळीच्या नेत्यांमध्ये कधी पोहोचले हे समजले देखील नाही. त्यावेळी शिवसेना ही मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन झालेली एक संघटना होती. त्यांच्याकडे जबरदस्त भाषण करण्याची कला अवगत होती, धडाडीचे नेतृत्व करण्याची कुवत होती. शाखाप्रमुख म्हणून शिवसेनेला त्यावेळी जे नेते पाहिजे होते त्यात भुजबळ चपखल बसणारे होते. त्याकाळी तरुणांना त्यांनी आपल्या भोवती मोठ्या प्रमाणात आकर्षित केले होते. याचे फळ म्हणून शिवसेनेने त्यांना पहिल्यांदा मुंबईचा महापौर बनवले. 1973 ते 1984 या काळात मुंबई महापालिकेत शिवसेना विरोधी पक्षात होती त्यावेळी भुजबळ महापालिकेत शिवसेनेची मुलखमैदानी तोफ म्हणून ओळखले गेले होते. 1985 साली ते पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर माझगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून विधानसभेवर गेले. छगन 1991 साली शिवसेना नेतृत्वाबरोबर मतभेद झाल्यानंतर भुजबळांनी 25 वर्ष असलेली शिवसेनेची साथ सोडून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
शरद पवारांनी 1999 साली काँग्रेसपासून फारकत घेऊन स्वत:चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी ते पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. 1999 साली राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार आले. त्यावेळी पहिल्यांदा भुजबळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. 18 ऑक्टोंबर 1999 ते 24 डिसेंबर 2003 या काळात ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. याच काळात त्यांच्यावर बनावट स्टॅम्प पेपर घोटाळयाचे आरोप झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी डिसेंबर 2003 मध्ये एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयावर हल्ला केला. त्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 2004 मध्ये पुन्हा राज्यात सत्तेवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आले. त्यावेळी भुजबळांकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. 2008 मध्ये त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्री बनवण्यात आले. 2009 साली तिसर्‍यांदा राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आले. त्यावेळी भुजबळ उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. एकूणच भुजबळांची राजकीय कारकिर्द ही नेहमीच चढता आलेख असलेली राहिली आहे. परंतु त्यांना अटक झाल्यावर त्यांच्याभोवतीचे सर्व कवचकुंडले निखळून पडली. आता भुजबळ सुटल्यावर नेमके काय करणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीतच राहाणार की, भाजपात जाणार की राजकीय सन्यास घेणार, की ओबीसींचे नेते म्हणून राहून राजकारणापासून दूर राहाणार या सर्व प्रश्‍नांची उत्तरे काळाच्या ओघात मिळतील.
-------------------------------------------------

0 Response to "भुजबळ सुटले, पुढे काय?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel