-->
जे.एन.यु.च्या नथीतून डाव्यांवर वार

जे.एन.यु.च्या नथीतून डाव्यांवर वार

संपादकीय पान मंगळवार दि. १६ फेब्रुवारी २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
जे.एन.यु.च्या नथीतून डाव्यांवर वार
गेल्या आठवड्यात दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या (जे.एन.यू) आवारात देशविरोधी दिल्या गेलेल्या घोषणांचे निमित्त करुन केंद्रातील सरकारने कडक पावले उचलली व विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांच्यावर थेट देशद्रोहाचा आरोप करुन त्याला अटक करण्यात आली. वरकरणी पाहता देशविरोधी दिल्या गेलेल्या या घोषणा निषेधार्थ आहेतच. मात्र यानंतर आलेल्या बातम्या पाहता सरकारने वस्तुस्थिती न तपासता केवळ डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखाली असलेल्या विद्यार्थी संघटनांना झोडपण्याच्या हेतूने कारवाई केली असेच खेदाने म्हणावे लागेल. संसदेवर हल्ला करणार्‍या अफजल गुरुच्या फाशी दिल्याच्या दिवसाचे निमित्त करुन भारतविरोधी घोषणा दिल्या गेल्या. ज्यावेळी कन्हैया कुमारे यांचे भाषण चालू होते त्यावेळी या घोषणा दिल्या गेल्या. मात्र या घोषणा कन्हैया कुमार यानेच दिल्याचे जाहीर करुन त्याच्यावर कारवाई करण्यात आली. आता कन्हैया कुमारचे भाषण व्हायरल झाले आहे त्यात तसे काहीच दिसत नाही. उलट असे सांगितले जात आहे की, त्याचे भाषण सुरु असताना पाठीमागून देशविरोधी घोषणा झाल्या व त्या अ.भा.वि.प.च्या विद्यार्थ्यंनीच दिल्या असे समजते. कारण आता जो व्हिडिओ सर्वत्र व्हायलर झाला आहे त्यात अ.भा.वि.प.चे विद्यार्थी पाठूमागून घोषणा देत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे डाव्या विद्यार्थी संघटनांना बदनाम करण्याचा डाव आखलेला होता. अर्थातच हे सर्व पूर्वनियोजितच असावे यात काहीच शंका नाही. काही बाहेरचे तरुण येथे कार्यक्रम सुरु असताना आले व त्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या असे कन्हैया यांचे म्हणणे आहे. हा कार्यक्रम पाहाणार्‍या विद्यापीठातील प्राध्यापकांचेही असेच मत आहे. मात्र कोणतीही चौकशी न करता गृहमंत्री राजनाथसिंग यांनी कठोर कारवाई करण्याचे जाहीर केले. त्यापाठोपाठ मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी देखील कुणाला या प्रकरणी माफ केले जाणार नाही, असे घोषीत केले. तातडीने पोलिसांना आदेश सुटले व अटका झाल्या. जर खरोखरीच जे.एन.यू.मध्ये देशविरोधी घोषणा झाल्या असतील ते निषेधार्यच आहे, याला जबाबदार असणार्‍यांना शिक्षा ही झालीच पाहिजे, यात काहीच शंका नाही. मात्र सरकारने या घटनेचे निमित्त करुन जे.एन.यू.च्या नथीततून डाव्यांवर तीर मारण्याचा डाव केला आहे हे स्पष्टच दिसले. कन्हैया कुमारला झालेली अटक याचा देशातूनच नव्हे तर जे.एन.यू.च्या बुध्दीवंतांकडून निषेध झाला आहे. सरकारने केवळ आकसाने कारवाई केल्याचे सर्वांचेच मत आहे. जे.एन.य्ू. हे विद्यापीठ प्रामुख्याने डाव्या चळवळीचे एक प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. गेली कित्येक वर्षे येथे डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखालील विद्यार्थी संघटनांचा चांगलाच दबदबा आहे. सध्याच्या काळात डाव्या चळवळीतील अनेक नेत्यांचे उगमस्थान हे जे.एन.यू. तून झाले आहे. अगदीच थोडक्यात सांगावयाचे तर डाव्या पक्षांच्या नेत्यांना घडविणारी ही शाळाच असे जे.एन.यू.ला संबोधिले जाते. असे असले तरी गेल्या काही वर्षात येथे भाजपाप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने चंचूप्रवेश केला आहे. सध्या केंद्रात त्यांची सत्ता असल्यामुळे या संघटनेला आणखीनच बळ लाभले आहे. जे.एन.यू.तील निवडणुका या नेहमीच गाजतात व विद्यार्थ्थांच्या या निवडणुका असल्या तरीही देशातील ज्या प्रकारे सार्वत्रिक निवडणुका लढविल्या जातात त्याधर्तीवर येथील निवडणुकांचे वारे असते. देशाला बुध्दीमंताचे एक फळी या विद्यापीठाने दिली आहे. प्रामुख्याने या विद्यार्थ्यांवर डाव्यांचा पगडा असला तरीही येथे विविध चळवळी, विषयांवर चर्चा-वाद होतात व पक्षीय राजकारणाच्या पलिकडे हे सर्व होत असते. याच चर्चेतून भविष्यात काही चांगले घडू शकते, एक चांगली तरुण पिढी घडू शकते यावर या विद्यापीठाचा विश्‍वास आहे. संघ व भाजपाला जर खरोखरीच देशप्रेमाचा उमाळा असता तर त्यांनी जम्मू-काश्मिरमध्ये खुले आम पाकिस्तानचा झेंडा फडकाविणार्‍यांवर कारवाई करावी. एकीकडे महात्मा गांधींच्या विचारांचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे महात्मा गांधींचे हत्यारे असलेल्या नथुराम गोडसेंची पुजा करावयाची अशी दुहेरी भूमीका भाजपा व संघ वठवित आहे. महात्मा गांधीच्या हत्यांर्‍यांचे गोडवे गाणाऱे हे राष्ट्रविघातक नाहीत का? परंतु त्यांच्या मात्र कारवाई नाही आणि जे.एन.यु.च्या विद्यार्थ्यांवर कोणतीही चौकशी न करता अटक करणे ही बाब खटकणारी आहे. सध्याचे जे.एन.यू.तील प्रकरण, हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांची आत्महत्या, पुण्यातील एफ.टी.आय. ही सर्व प्रकरणे पाहता सरकार विद्यापीठांमध्ये हस्तक्षेप करुन हिंदुत्वाचा आपला अजेंडा राबवू पाहता आहे. यातूनच ही सर्व अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र हे सरकारच्या आंगलटी येणार यात काहीच शंका नाही.
---------------------------------------------------------------------    

0 Response to "जे.एन.यु.च्या नथीतून डाव्यांवर वार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel