-->
रिफायनरी- मते व मतांतरे...

रिफायनरी- मते व मतांतरे...

रविवार दि. 06 मे 2018 च्या अंकासाठी चिंतन- 
------------------------------------------------
रिफायनरी- मते व मतांतरे... 
-----------------------------------
गेल्या आठवड्यात प्रसिध्द झालेल्या कोकणाचे चित्र पालटणारा प्रकल्प या आमच्या लेखावर अपेक्षेनुसार, भरपूर प्रतिक्रिया आल्या. सोशल मिडीयावरही हा लेख मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यावर आलेल्या अनेक प्रतिक्रिया या कोकणातील या नियोजित प्रकल्पाला विरोध करणार्‍या होत्या. तर काही जणांना असे वाटते की, हा प्रकल्प झाला तर येथील जमिनी गेलेल्या शेतकर्‍यांचे हित जपले गेले पाहिजे. तर काहींचे असे म्हमणे की, यामुळे प्रदूषणाला मर्यादीत ठेवण्याची हमी दिली गेली पाहिजे. या लेखाव्दारे अशा प्रकारे विचारमंथन व्हावे व जनतेची तसेच या विषयातील तज्ज्ञांची मते व्यक्त होतील असे अपेक्षित होते. त्यातील काही निवडक मते आम्ही मांडत आहोत...   
-----------------------------------
छान लिहिला आहे , पण ज्या कोकणवासीयांनांबाबत लिहिले आहेस त्यांना काहीच पालटू नये असे वाटत आहे, एखाद्या नामवंत शास्त्रज्ञाचा लेख आला तरी कोकणवासीय आपले मत बदलतील असे वाटत नाही. असो, तू हे धाडस केलेस म्हणून तूझे अभिनंदन -विजय काळे, ज्येष्ठ पत्रकार
-------------------------------------
आम्ही रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल समर्थन करित आहोत आणि कृपया आम्ही आंधळे समर्थन नाही. आम्ही या प्रकल्पाची जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि अजूनही चालू आहे. आपला दैनिक कृषिवल मधील आपला अभ्यासपूर्ण लेख वाचल्यावर आमचा प्रकल्पाविषयी सकारात्मक विचार वाढला. आपले आम्ही अभिनंदन आणि आभार मानतो. आमच्या माहिती प्रमाणे नुकतेच रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल विरोधक हे काँग्रेस अध्यक्ष श्री राहुल गांधी यांना श्री. अशोक चव्हाण यांच्या सोबत दिल्लीला जाऊन भेटले आणि त्यांनी सुद्धा प्रकल्पाला विरोध केला. यांच्या सरकारच्या काळात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला मान्यता दिली आणि आम्ही त्याचे समर्थन केले कारण आम्ही कोकणाच्या विकासाला नेहमीच अग्रक्रम दिला आणि देत राहू. विकासाच्या आड राजकारण आणू नये ही हाथ जोडून विनम्र विनंती. प्रकल्प विरोधी राजकीय पक्षांना खरोखर विरोध करायचा असेल तर खालील आकडेवारी त्यांच्या माहितीसाठी आपल्या मार्फत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न. शिवसेनेचे 63 आमदार आहेत, काँग्रेस राष्ट्रवादीचे 89 आमदार आहेत, मनसेचा 1 आमदार आहे. एकूण-153 आमदार विरोध असणार्‍या पक्षांचे आहेत...145 ला बहुमत आहे.. या सर्वांचा रिफायनरीला विरोध आहे. मग रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प विरोधक पक्ष विधानसभेत ठराव आणून का रद्द केला जात नाही? सरकार वर अविश्‍वास ठराव आणा ऐकत नसतील तर जनमत करा? केवळ कोकणात येऊन भाषण देऊन आणि दौरे करून काय फायदा? राजकारण चालले आहे. कोकणी माणसाला गृहीत धरले जाते आहे. कोणी मध्यम मार्ग काढून कोकणचा विकास कसा होईल हे सांगतच नाही. जर लोकशाही पद्धतीमध्ये लोकप्रतिनिधी हे लोकांचे प्रतिनिधी असतील तर त्यांनी लोकांचे प्रश्‍न सभागृहात सोडवले पाहिजेत ना? रस्त्यावरची लढाई हवी कशाला?
-सतीश पाठक, कोकण मित्र मंच
--------------------------------
लेख वाचला, छान अभ्यासपूर्ण आहे. बरेच वेळा अशा कारखान्याच्या विरोधातच स्थानिकांची शक्ती खर्च होते. आणि महत्वाचे मुद्दे तसेच रहातात.
कारखाने पूर्ण होतात आणि काही वर्षांनी ते परीणाम दिसून येतात. भूगर्भातून खनिज तेल वा वायू येताना अनेक प्रकारची घातक रसायने व वायू उत्सर्जित होतात. ती कोणती ? या रसायनांचा मानवी व आजूबाजूच्या परीसरात घातक परीणाम होतो का ? असेल तर, या घातक वायूंची विल्हेवाट लावण्यासाठी कंपनी कोणती उपाययोजना करणार आहे. पारंपारिक विल्हेवाट म्हणजे एकतर जाळणे किंवा समुद्रात सोडणे. परंतु हल्ली या घातक रसायनांची विल्हेवाट लावण्याची आधुनिक उपाययोजना उपलब्ध असते. त्या सर्व उपाययोजना कंपनी करणार का ? करणार असेल तर त्याची तांत्रिक माहिती मिळणे जरूरी आहे. त्यासाठी वेगळी सयंत्र लावावी लागतात. नुसते प्रदुषण टाळण्याचे उपाय आम्ही करू यावर विश्‍वास ठेवणे कठीण असते. कारखाना चालविण्यासाठी कंपनी पाणी आणि विजेची वेगळी व्यवस्था करणार का? की तेही एम.आय.डी.सी. व एम.एस.ई.बी.वर अवलंबून रहाणार? कंपनीच्या नोकरभर्तीचे आयोजन कसे असणार? टेक्निकल व नॉन-टेक्निकल दोन्हीही. कारण अशा कंपनीची एकदा बाऊंड्री वॉल झाली की, त्यांचे स्थानिकांपेक्षा -ऑल इंडियाचे प्रेम उफाळून येते. आणि अशा वेळी अगोदरची सारी आश्‍वासने हवेत जातात. पुढच्या लेखात हे सारे मुद्दे विचारात घ्यावे ही विनंती. - आनंद कोळगावकर, अलिबाग
--------------------------
कोकणचा कॅलिफोर्ऩिया करण्याच्या केवळ भंपक बाता आतापर्यंतचे सगळे राज्यकर्ते मारत आले. आज जे विनाशकारी ग्रीन रिफायनरीचा उदोउदो करीत आहेत तेच एन्रॉनच्या वेळी तो प्रकल्प अरबी समुद्रात बुडवण्याचे विधान तत्कालिन उपमुख्यमंत्री कै. गोपीनाथ मुंडे यांनी केले. या प्रकल्पाची परिस्थिती काय आहे. त्यानंतर पुढे या कंपनीचे काय झाले हा इतिहास आहे. या अगोदर रत्नागिरीत स्टरलाईट आणण्याचा प्रयत्न झाला. लोट्याच्या माळावर अनेक रासायनिक प्रकल्प आले. रायगडमध्ये अनेक प्रकल्प आले. या सार्‍या प्रकल्पांनी कोकणच्या पाणी, हवा, माती याची काय वाट लावली याचा कधी कुणी विचार केला नाही. करीत नाही. सगळ्या बुद्धीवंतांनी झापडे लावून नाणारच्या प्रकल्पाचे समर्थन चालविले आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाप्रमाणे या प्रकल्पाची भलामण कोकणातले काही मुठभर समविचारी, व्यावसायिक आणि ज्यांना याचा विविध मार्गांनी सध्य आणि नंतरच्या काळात लाभ उठवायचा आहे अशा व्यक्ती आणि संस्था करीत आहेत. सगळे जण फायद्याचा विचार करून आपआपली मते मांडत आहेत. जगातल्या सर्वात मोठ्या पाच रिफायनरीज या दक्षिण आफ्रिकेत आहेत. रिफायनरीत कच्चे खनिज तेल कोल, नॅचरल गॅस ( यात पेट्रोल, डिझेल, पॅराफिन, केरोसिन याचा समावेश आहे) हे सगळे शुद्धिकरण होताना मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते आणि कमालीची रासायनिक प्रक्रिया होते. यातूनच हवा, पाणी, माती मोठ्या प्रमाणात प्रदूषित होते. रिफायनरीच्या उपकरण, यंत्रणेतून 100 प्रदूषके गळती आणि विविध कारणांनी बाहेर पडून हवा दूषित होते. मोठ्या प्रमाणात तेलजन्य कचरा निर्माण होत असल्याने माती प्रदूषित होते. हवा प्रदूषित होते त्यातून पर्जन्यावर परिणाम होतो. जमिनीतील भूमिगत पाणी खराब होते. म्हणजे जेवढे फायदे या प्रकल्पाचे सांगितले जात आहेत त्यापेक्षा कैक पटीने या प्रकल्पाचे दुष्परिणाम कोकणवर होणार आहेत. त्याचे कोणाला सोयर सूतक नाही. कोकणातले मानवी जीवन नासवण्याचे काम हा प्रकल्प करणार आहे. कोकण हा निसर्ग संपन्न आहे. त्याकडे मोठी जैवविविधता आहे. येथे कोणत्याही ऋतुत जा वातावरण मस्त, आल्हाददायक असते. कडक उन्हाळ्यातसुद्धा येथील उन्हाच्या झळा गारवा देतात. कोकणच्या निसर्ग संपन्नेची उदारणे देता येतील तेवढी कमी आहेत. त्या सगळ्याचा विचार करून एकच गोष्ट आहे ती म्हणजे विकासाच्या फालतू कल्पना मांडण्यापेक्षा आहे त्या साधनसंपत्तीत कोकणी माणूस सुखी आहे. त्याला अशा विनाशकारी कारखाऩ्याची गरज नाही. स्थानिक परिस्थिवर आधारित कोकणचा विकास आराखडा का तयार होत नाही. कारण तसे केले तर राज्यातल्या इतर विभागांपेक्षा कोकण पुढे जाईल. कोकणचा त्यातून लाभ हा सामान्य माणसाला होणारा आहे. तो धनदांडग्यांना नको आहे. सामान्य कोकणी माणूस पुढे गेला आणि कोकण पुढे जाणे एका विशिष्ट लॉबीला नको आहे. केवळ मतांसाठी सगळ्या पक्षांनी कोकणच्या विकासाच्या बाता मारल्या. पॅकेजेस जाहीर करतात. प्रत्यक्ष ती कधी कोकणापर्यंत आलीच नाहीत. एकूण या विषयावर बोलणे आणि लिहिण्यासारखे खूप आहे. सच्चा कोकणी माणसाने कोकणी माणूस कोकणच्या विनाशाचा कधीच विचार करणार नाही. कोकणी माणसाचे अलिकडेच मी एक निरीक्षण केलेय ते म्हणजे तो आपले वजन अशा अहितासाठी खर्ची घालतो. राज्यकर्त्यांना वा सामान्यांना कोकणच्या विकासाचे महत्त्व आपण पटवून देताना पर्यावरण, जैवविविधता या सार्‍याचा विचार केला पाहिजे. ओसाड आहे आहे म्हणून कुणीही पावले टाकावी. तेथील निसर्गाची कुस नासवावी का? आज शहरात गुदमरणारा चाकरमानी गावाकडे वळत आहे. त्याचे आयुष्य अजून कमी करायचे का? इस्त्राईल सारख्या देशात मृत समुद्रावर जागतिक दर्जाचे पर्यटन उभे राहते कोकण तर एकदमच समृद्ध, मग हे आपल्या का होत नाही.
- विनायक सुतार.
छान! सरकार प्रकल्पाची सकारात्मक बाजू मांडण्यास कमी पडतेय असे लेख वाचल्यानंतर वाटते. -संजय मलमे, संपादक, पुण्यनगरी
------------------
कोकणचे चित्र पालटेल की नाही माहीत नाही, मात्र गरीब गुजराती शेतकर्‍यांचे नशीब नक्कीच पालटणार आहे...कवडीमोल किमतीत आधीच खरेदी केलेल्या जमिनींना चार-पाच पट भाव मिळणार आहे... जे समृद्धी प्रकल्पात पाहायला मिळाले तेच नाणारमध्येही दिसले... राज्यातील शेतकर्‍यांच्या हाती धत्तुरा... भूमाफियांची टोळी फॉर्मात आहे एवढे नक्की... -जगदीश भुवड, पत्रकार
रिफायनरी प्रकल्पामुळे प्रकल्पग्रस्त आता कोण आहेत? गेल्या सहा-आठ महिन्यात जमीन खरेदी - विक्रीचे किती व्यावहार झाले आहेत? मुळ कोकणवाशी शेतकर्‍याना काय मिळाले व पुढे काय मिळणार? जे काय मिळणार त्याची हमी काय? की पाने पुसली जाणार! अन हो जमीन संपादित करताना मूळ शेतकर्‍याची
परवानगी बंधनकारक केली जाईल का? कारण जमीनीचे व्यवहार शेती म्हणून झाले आहेत. प्रकल्पासाठी नाहीत. लेख छान आहे. -राहूल गायकवाड.
---------------------------
नाणार प्रकल्प हवा आहे त्यांनी उरणला आलेल्या जे.एन.पी.टी.प्रकल्प बाधित प्रकल्पग्रस्त स्थानिकांच्या मुलाखती घाव्यात म्हणजे कळेल -शेखर पाटील.
------------------------------

0 Response to "रिफायनरी- मते व मतांतरे... "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel