-->
वीजेची लोणकढी थाप!

वीजेची लोणकढी थाप!

गुरुवार दि. 03 मे 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
वीजेची लोणकढी थाप!
पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या व्यक्तीने तरी किमान खरे बोलावे व लोकसभेत घेतलेल्या शपथेला जागावे अशी अपेक्षा असते. मात्र आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याला अपवाद असावेत. कारण आपण चार वर्षांपूर्वी जनतेला दिलेली आश्‍वासने पूर्ण करीत आहोत हे भासविण्यासाठी आता त्यांना थापांचा आधार घ्यावा लागत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नुकतेच पंतप्रधानांनी देशातील गावांना शंभर टक्के वीज पुरविली असल्याचा दावा केला. नरेंद्र मोदींचा हा दावा शंभर नव्हे तर एक हजार टक्के खोटा आहे. गेल्या चार वर्षात सरकारने फारशी कामे केलीच नाहीत, मात्र जी काही कामे केली त्याची आकडेवारी फुगवून त्या कामाच्या खर्चापेक्षा जाहीरातबाजीवर जास्त खर्च केला. सरकारच्या या जाहीरातबाजीमुळे कामे फार मोठी केल्याचे भासते. मात्र प्रत्यक्षात जनतेची काहीच कामे होत नाहीत हे सत्य आहे. वीजेच्या शंभर टक्के पुरवढ्याच्या बाबतीत अशीच गोम आहे. सरकारने गावातील वीजपुरवठा शंभर टक्के केल्याचे दाखवायचे होते त्यासटी युक्ती काढण्यात आली. ज्या गावात अद्याप वीज पोहोचलेली नाही तेथील किमान 10 टक्के घरे, सरकारी कार्यालये, शाळा येथे वीज जोडणी जरी दिली तरी त्या गावात शंभर टक्के वीजपुरवठा झाला असे सरकार जाहीर करते. केंद्र सरकारने तशी मार्गदर्शक तत्वेच तयार केली आहे. त्यामुळे ठिकठिकाणच्या गावांचे 100 टक्के विद्युतीकरण झपाट्याने झाले. गेल्या चार वर्षात विद्युतीकरण झालेल्या 19 हजार 727 गावंमध्ये फक्त आठ टक्के गावातील घरांमध्ये वीज पोहोचली आहे. शिल्लक राहिलेल्या 98 टक्के गावातील बहुतांशी घरात अंधारच आहे. देशातील 25 राज्यातील तब्बल सात कोटी घरांमध्ये वीजच नाही, असे केंद्र सरकार एकीकडे आपल्याच कागदपत्रांव्दारे जाहीर करते, तर दुसरीकडे शंभर टक्के विद्युतीकरण झाल्याची थाप मारली जाते. गंमतीचा भाग म्हणजे सरकारने नुकतीच सौभाग्य योजना वीज नसलेल्या गावंसाठी सुरु केली आहे. जर सगळीकडे वीज पोहोचली आहे तर सौभाग्य योजना सुरु करण्याचे कारणच काय, असा सवाल उपस्थित होतो. नरेंद्रभाईंच्या थापेनुसार, सरकारने तर एक हजार दिवसांमध्ये 18 हजार 452 गावांमध्ये वीज पोहोचविण्याचे काम 12 दिवस अगोदरच पूर्ण झाले, त्यामुळे आमची वचनपूर्वी झाली आहे. प्रत्यक्षात तिकडे गावात मात्र कुट्ट काळोख आहे. महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्याततब्बल 19 लाख कुटुंबे असूनही अंधारात आहेत, अशी आकडेवारी आहे. महाराष्ट्राची ही गत तर बिहार, उत्तरप्रदेशासारख्या राज्यात तर किती लोक अंधारात असतील त्याचा अंदाज येतो. आजही राज्यातील 700 वाड्यांमध्ये लाईटच नाही. गावातील 10 टक्के लाईट पेटले की, गावाचे विद्युतीकरण झाले असे सरकार म्हणत असले तरीही आज अनेक गावात दहा टक्केही वीज लागलेली नाही. तर गेल्या महिन्यांपर्यंत 192 गावांमध्ये विजेचे खांबही आले नव्हते. हे वास्तव महाराष्ट्राचे आहे. राज्यात 40 हजारहून अधिक गावे, खेडी आणि पाडे आहेत. त्यातील 1 कोटी 83 लाख घरांमध्ये महावितरणने आतापर्यंत अधिकृतरित्या वीज पोहोचविलेली आहे. तर अडीज लाख लोक वीजेच्या प्रतिक्षेत आहेत. म्हणजे, ज्यांची वीजेसाठी अर्ज केलेला आहे, पण त्यांना वीज मिळालेली नाह असे ते ग्राहक आहेत. ज्या आदिवासी पाड्यावर वीज पोहोचलेली नाही त्यांच्यासाठी सरकारने सौरउर्जेची सौभाग्य योजना सुरु केली आहे. महाराष्ट्रातील काही भागात ही योजना ग्रामीण भागातील जनतेला फायदेशीर ठरु शकते. मोदींनी विद्युतीकरण पूर्ण केल्याचा दावा केल्यावर लगेचच केंद्रीय उर्जा मंत्री पीयूष गोयल यांनी नासाने काढलेला 2016 सालच्या फोटाचा हवाला दिला. या फोटोत देश संपूर्णपणे उजळलेला दिसत होता. गंमत म्हणजे, या फोटोचा पुरावा दाखवत गोयल यांनी स्वत:ची पाठ थोपटली व मोदींचेही अभिनंदन केले. ही घटना म्हणजे सर्वात मोठा विनोदच म्हणावा लागेल. नासाने पाठविलेल्या फोटोवरुन जर सरकार आपल्या देशातील विद्युतीकरणाचा हवाला देत असेल तर या सरकारला काय म्हणावे? राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर मध्यंतरी मोठा विनोदच केला होता, त्यांच्या सांगण्यानुसार लवकरच राज्यात वीजेचे एवढे उत्पादन होणार आहे की, शेेतकरी ज्याप्रमाणे भाजी विकतात, त्याप्रमाणे वीज विकायला उभे राहावे लागेल. त्यावेळी विजेला ग्राहक मिळतीलच असे नाही, हा मंत्रीमहोदयांचा विनोद म्हणून समाजयला हरकत नाही. कारण आपल्या राज्यात अजूनही वीजेची मागणी व पुरवठा यात बरीच मोठी तफावत आहे. ही तफावत जर संपवायची असले तर राज्यात मोठे वीज निर्मीतीचे प्रकल्प उभारावे लागतील. परंतु जैतापूरचा प्रकल्प वगळता सध्या फारशी कुठे वीज प्रकल्पांची उभारणी होत नाही. अशा वेळी राज्यात वीज पुरवठा अतिरिक्त होण्याचे स्वप्न पाहणे म्हणजे शेखचिल्लीची स्वप्ने पाहण्याचा प्रकार आहे. आजही आपल्याकडे राज्यात मोठ्या प्रमाणात वीजेचे लोडशेडींग सुरु आहे. अनेक औद्योगिक प्रकल्पांनाही आपण गरजेएवढी वीज पुरवू शकत नाही. पंतप्रधानांनी वीजेची लोणकढी थाप मारली. मात्र त्यामुळे सध्याच्या भर उनात वीज पोहोचून काही दिलासा मिळणार नाही. पंतप्रधानांची ही थाप पचणारी नाही. कारण जे लोक काळोखात आपले आयुष्य जगत आहेत ते आपला हिसका पुढच्या वेळी मतदान करताना दाखवतील, हे नक्की.
-------------------------------------------------------- 

Related Posts

0 Response to "वीजेची लोणकढी थाप!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel