-->
अपेक्षा कुलगुरुंकडून...

अपेक्षा कुलगुरुंकडून...

बुधवार दि. 02 मे 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
अपेक्षा कुलगुरुंकडून... 
तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर डॉ. सुहास पेडणेकर यांच्या रूपाने मुंबई विद्यापीठाला अखेर पूर्णवेळ आणि पात्र कुलगुरू मिळाला, असे म्हणावयास हरकत नाही.सध्याची विद्यापीठाची निर्नायकी अवस्था संपून विद्यार्थ्यांचे नष्टचर्य एकदाचे संपेल, अशी आशा सधाया तरी बाळगायला हरकत नाही. सध्या मुंबई विद्यापीठाची अवस्था पोकळ वाश्यासारखी झाली आहे. केवळ मुंबई विद्यापीठ हे नावच मोठे आहे, त्याव्यतिरिक्त सध्या मुंबई विद्यापीठाची अवस्था व दर्जाही पूर्ण रसातळाला गेला आहे. अशा स्थितीत सध्या विद्यमान नवनियुक्त कुलगुरुंकडून विद्यार्थ्यांच्या व त्या जोडीला पालकांकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. सध्याच्या स्थितीत सकारात्मक बदल घडवून विद्यापीठाला पूर्ववैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी काळाने डॉ. पेडणेकर यांच्यावर टाकली आहे, असेच म्हणावे लागेल. त्यांच्या नियुक्तीने कित्येक वर्षांनी मुंबई विद्यापीठाला आपल्याच पठडी तयार झालेले एक प्राचार्य आता कुलगुरू म्हणून लाभले आहेत. या विद्यापीठाची खडान खडा माहिती डॉ. पेडणेकर यांना आहे. येथे होणार्‍या प्रत्येक बाबींचे ते गेले कित्येक वर्षाचे साक्षीदार आहेत. त्यामुळे भविष्यात विद्यापीठाची गाडी रुळावर येण्यासाठी काय केले पाहिजे व काय करु नये याचा त्यांचा गृहपाठ अगोदरच तयार झालेला आहे. याच विद्यापीठाच्या आवारात त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. येथेच त्यांनी रसायनशास्त्राच्या क्षेत्रातील विशेष संशोधन केले आणि अध्ययनदेखील. ज्या विद्यापीठाच्या छत्रछायेत त्यांनी विद्यार्थिदशा अनुभवली, तेथेच उणीपुरी तीन दशके त्यांनी विद्यादानही केले. गेली तब्बल 43 वर्षे त्यांचे मुंबई विद्यापीठाशी अतूट नाते निर्माण झाले आहे. स्टिव्हन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजीचे ते सन्माननीय पोस्ट डॉक्टरेट फेलो ठरले होते. अनेक आंतरराष्ट्रीय विद्वतसभा व चर्चासत्रांमधून त्यांनी शोधनिबंध सादर केले असून, आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे निबंध प्रसिद्ध झाले आहेत. दादरच्या राम नारायण रुईया महाविद्यालयाचे प्राचार्यपद भूषविताना त्यांनी आपल्या संस्थेचा नावलौकिक वाढवला आणि स्वायत्ततेचा दर्जाही त्या संस्थेस मिळाला. कित्येक विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रबंधांसाठी त्यांनी मार्गदर्शन केले आहे, आणि अजूनही करत आहेत. विद्यार्थ्यांचे आणि प्राध्यापकांचे हित आणि अहित या दोन्हींचे भान असलेल्या डॉ. पेडणेकरांच्या नियुक्तीमुळे विद्यापीठ पुन्हा नावारूपाला येईल, अशी आशा आहे, ती यामुळेच. मुंबई विद्यापीठाची जी काही गुणात्मक पडझड गेल्या काळात झाली, त्याचे एकप्रकारे डॉ. पेडणेकर हे साक्षीदारच होते. नाईलाज म्हणून त्यांना हे सर्व बघून घ्यावे लागले. एकेकाळी बुद्धिमंतांचा वावर राहिलेले हे देशातील सर्वात जुने विद्यापीठ सध्या लौकिक गमावून बसले आहे. परीक्षांचे निकालही वेळेवर लावण्याचा आत्मविश्‍वास या विद्यापीठाच्या प्रशासनात राहिला नसल्याने विद्यार्थी अन्य विद्यापीठांकडे वळू लागले आहेत. एकेकाळी सातासमुद्रापार गाजलेले हे विद्यापीठ आज मोठ्या अपेक्षेने डॉ. पेडणेकरांकडे पाहात आहे. विद्यापीठाच्या नोकरशाहीच्या मानगुटीवर बसून त्यांना कामे करुन घ्यावी लागणार आहेत. सध्या त्यांच्यापुढे असलेले सर्वात मोठे आव्हान म्हणजे, नुकत्याच आटपलेल्या परीक्षांचे निकाल वेळेत लावणे. अर्थात यासाठी त्यांच्याकडे हातात वेळ कमी असला तरी त्यांची पहिली कसोटी इथेच लागेल, यात काही शंका नाही. विद्ायपीठातील जो भोंगळ कारभार निर्माण झाला आहे तो मिटविण्यासाठी त्यांना पावले उचलावी लागतील. विद्यापीठाचे अभ्यासक्रम व निकालांचे वेळापत्रक एकदा मार्गी लागले की त्यांना विद्यापीठाच्या दर्ज्याकडे आपला मोर्चा वळवावा लागेल. सध्या विद्यापीठात अनेक कालबाह्य झालेले अभ्यासक्रम बदलून सध्याच्या गरजेनुसार लागणारे अभ्यासक्रम सुरु करावे लागतील. आपल्याकडे अजूनही विद्यापीठे उद्योगधंद्यांना कोणत्या गरजा आहेत त्या तपासून त्यानुसार अभ्यासक्रमाची आखणी करीत नाहीत. त्यामुळे बेकार कुणी राहू शकत नाही. आता नव्याने विचार करताना उद्योगांच्या गरजेनुसार आवश्यक असणारे अभ्यसक्रम तयार करावे लागतील. त्याचबरोबर विद्यापीठाचा पसारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यावर उपाय म्हणून कोकणातील चार जिल्ह्यांसाठी म्हणून एक कोकण विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव सरकारला देणेे किंवा सध्याच्या विद्यापीठाचे विकेंद्रीकरण करुन स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे संबंधीतांना अधिकार बहाल करणे. सध्या मुंबई विद्यापीठाचे विकेंद्रीकरण मर्यादीत स्वरुपात असले तरी त्याला जास्त प्रमाणात चालना देऊन प्रत्येक निर्णय हे स्थानिक पातळीवर घेऊन त्याची अंमलबजावणी तेथेच गेली जावी. त्यासाठी विभागीय केंद्रांना जादा अधिकार देण्याची गरज आहे. तसेच नवीन अभ्यासक्रम आखताना कोकणातील विद्यार्थ्यांसाठी समुद्र, मच्छिमारी, पर्यटन, बंदर, आयत-निर्यात यावरील अभ्यासक्रमांचा विचार झाला पाहिजे. यातून तेथील स्थानिक लोकांना रोजगाराची दालने खुली होतील. यासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. मुंबई विद्यापीठ हे देशातील सर्वात जुने व नामवंत विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. गेल्या काही वर्षात त्याची अधोगती झाली असली तरीही या विद्यापीठाने जागतिक स्तारावर जाण्यासाठी आपला रोड मॅप तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यकात भासल्यास विदेशी विद्यापीठाशी सहकार्य करार करण्याचा विचार करण्यात यावा. त्याचबरोबर विदेशात विद्यापीठात ज्या प्रकारे संशोधनात भर दिला जातो, तसा खास विभाग स्थापन करुन संशोधनावर भर दिला पाहिजे. यासाठी उद्योगांचे वित्तसहाय्य लाभू शकते. सध्या कुलगुरुंकडून अपेक्षा मोठ्या आहेत. रसातळाला गेलेल्या या विद्यापीठात सध्या केलेली प्रत्येक सुधारणा स्वागतार्ह ठरु शकते. डॉ. पेडणेकरांना प्रशासनाचा चांगला अनुभव पाठिशी असल्यामुळे ते यात यशस्वी होतील असा विश्‍वास वाटतो.
------------------------------------------------------------------ 

0 Response to "अपेक्षा कुलगुरुंकडून... "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel