-->
संपादकीय पान गुरुवार दि. १५ मे २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
पंतप्रधानांना निरोप
---------------------------
विद्यमान पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग यांनी आपल्या कार्यलयातील कर्मचार्‍यांचा व पक्षातील नेत्यांचा निरोप घेऊन आपण आता निवृत्ती घेतल्याचे जाहीर केले. सध्या कॉँग्रेस पराभवाच्या छायेत आहे. मात्र पंतप्रधानांनी यापूर्वीच निवडणुकांनंतर आपण कॉँग्रेस सत्तेत असो वा नसो आपण काही पंतप्रधानपदी नसणार असे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी आपल्या पदावरुन मुक्ती घेतली आहे. सध्या कॉँग्रेस पक्षाच्या डोळ्यापुढे पराभव दिसत नसता तर मनमोहनसिंग यांच्या निवृत्तीला विशेष महत्व प्राप्त झाले असते. मात्र सध्याच्या स्थितीत त्यांनी निवृत्ती काहीशी झाकोळली गेली असे म्हणणे योग्य ठरेल. डॉ. मनमोहनसिंग यांनी पंतप्रधानपदी सलग दहा वर्षे राहून पंडित नेहरु व इंदिरा गांधी यांच्यानंतरचा सर्वाधिक कालावधी या पदावर राहाण्याचा विक्रम केला आहे. त्यांच्या या कालावधीत कॉँग्रेसच्या राजवटीत अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली मात्र त्यात थेट डॉ. सिंग यांचा कधीच सहभाग नव्हता. त्यांचे विरोधकही ही बाब मान्य करतात. भाजपाचे नेते अरुण जेटली यांनी पंतप्रधानांची सचोटी, अभ्यासू वृत्ती, अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांचा जागतिक स्तरावर असलेला दबदबा यांचा मुक्तकंठाने गौरव केला आहे. एका विरोधी पक्षाच्या नेत्याने डॉ. सिंग यांचे कौतुक करणे याला महत्व आहे. दहा वर्षापूर्वी म्हणजे २००४ साली सत्तेत असलेल्या भाजपाने इंडिया शायनिंगचा गवगवा केला होता. मात्र त्यावेळी पुन्हाच भाजपाच सत्तेत येणार अशी गणिते मांडली जात होती. अशा वेळी कॉँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. त्यावेळी डाव्या पक्षांनी कॉँग्रेसला सत्तेचा टेकू दिला आणि यु.पी.ए.चा जन्म झाला. खरे तर त्यावेळी सोनिया गांधी याच पंतप्रधान होणार होत्या. मात्र त्यांच्या विदेशी जन्माच्या प्रश्‍नावरुन काहूर उठल्याने त्यांनी आपहून त्यातून माघार घेतली आणि पंतप्रधानपदी डॉ. मनमोहनसिंग यांचे नाव जाहीर झाले. हा खरे तर सर्वांनाच धक्का होता. त्यावेळी प्रवण मुखर्जींपासून अनेक लायक व इच्छुक उमेदवार होते. परंतु त्या सर्वांना डावलून सोनिया गांधींनी मनमोहनसिंग यांचे नाव सुचविले. त्यापूर्वी अर्थमंत्री म्हणूनही त्यांची कारकिर्द गाजली होती. गाजली या अर्थाने की, त्यांनी आपल्या अर्थमंत्रीपदाच्या काळात आर्थिक उदारीकरणाची प्रक्रिया सुरु केली होती. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर व वर्ल्ड बँकेत काम केलेले असल्याने त्यांची प्रतिमा ही अमेरिकेचे एजंट अशीच होती. मात्र त्या वेळी आपल्या अर्थव्यवस्थेत जी शिथीलता आली होती त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी उदारीकरणाची गरजच होती. असे हे एकेकाळचे अर्थमंत्री असलेले डॉ. सिंग पंतप्रधानपदी रुजू झाले आणि ते ही वर्ल्ड बँकेचे एजंट म्हणून ओळखले गेलेले असताना त्यांच्या नेतृत्वाला डाव्या पक्षांनी पाठिंबा द्यावा या सर्व घटना अनपेक्षितच होत्या. डॉ. सिंग यांना त्यांची स्वच्छ प्रतिमा मोठ्या प्रमाणात उपयोगी पडली. सोनिया गांधींनाही आपल्या विश्‍वासातील व आपल्या चरणी निष्ठा वाहाणारा माणूस पंतप्रधानपदावर बसवायचा होता. डॉ. सिंग हे त्याच चपखल बसत होते. डॉ. सिंग यांची अभ्यासू वृत्ती, अर्थशास्त्रातील त्याचे ज्ञान, शांत स्वभाव हा त्याच्या जोडीला उपयोगी पडला. आजवर देशाच्या पंतप्रधानपदी एखादी राजकीय व्यक्ती बसत होती. ही परंपरा मोडीत निघून बिगर राजकीय, अर्थतज्ज्ञ असलेली व्यक्ती विराजमान झाली. डॉ. सिंग यांच्या स्वभावात कधीच राजकारण भिनलेले नसल्याने ते केवळ सरकारी पातळीवरील घडामोडी पाहू लागले व राजकीय घडामोडींचे केंद्र हे सोनिया गांधी झाल्या. डाव्यांनी अणूकराराच्या प्रश्‍नावरुन कॉँग्रेसच्या आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. मात्र समाजवादी पक्षाच्या सहकार्याने ते सरकार टिकले आणि २००९ साली पुन्हा निवडून आलेही. त्यावेळी मात्र सरकारने शेतकर्‍यांना केलेली कर्जमाफी व ग्रामीण भागातील लोकांना किमान १०० दिवस काम देणारी रोजगार हमीची योजना यावर ते पुन्हा निवडून आले. खरे तर कॉँग्रेेसला पुन्हा निवडून येण्याची अपेक्षाच नव्हती. परंतु त्यांचा पुन्हा सत्तेचा २००९ साली बोनस मिळाला आणि डॉ. सिंग पुन्हा पंतप्रधानपदी रुजू होणे क्रमप्राप्त होते. कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील ही दुसरी टर्म मात्र अगदीच फोल ठरली. एक तर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. करोडो रुपयांचे हे आरोप होत असताना पंतप्रधान मात्र निश्‍चल होते. डॉ. सिंग यांचा यात सहभाग नसला तरी त्यांचे मंत्रिमंडळातील जे सहकारी भ्रष्टाचार करीत होते त्याच्यावर त्यांचा वचक नसल्याने अप्रत्यक्षरित्या त्यांच्यावर त्याची जबाबदारी पडणे स्वाभाविक होते. दोन वर्षांपूर्वी ज्यावेळी अण्णांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुरस्कृत (हे नंतर उघड झाले) आंदोलन झाले त्यावेळी तर सरकार पूर्णपणे हतबल झाले होते. सरकार या देशात आहे किंवा नाही याची शक्यता वाटावी इतपत परिस्थिती होती. हे डॉ. सिंग यांचे अपयश होते. अण्णांच्या झालेल्या या आंदोलनातून कॉँग्रेसच्या पराभवाची बिजे रोवली होती. कारण त्यानंतर पुढे एका वर्षात झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसचा पूर्णपणे सफाया झाला होता. त्यानंतर लगेचच होणार्‍या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस सुरुवातीपासूनच हतबल झालेल्या स्थितीत होती. असो.परंतु पंतप्रधान मनमोहनसिंग यांची दहा वर्षांची कारकिर्द यश आणि अपयश यांच्या हिंदोळ्यावर आदळत होती. डॉ. सिंंग यांनी देशाला खूप काही दिले असे काही सांगता येणार नाही. मात्र स्थिर सरकार दिले हीच काय ती जमेची बाजू. मनमोहनसिंग यांनी आपले नाव मात्र देशाच्या इतिहासात सलग दोन वेळा पंतप्रधान होण्याचा मान मिळविणारे म्हणून कोरले, ही त्यांची वैयक्तीक जमेची बाजू.
----------------------------------------      

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel