-->
एडस् दिनाच्या निमित्ताने

एडस् दिनाच्या निमित्ताने

संपादकीय पान मंगळवार दि. ०१ डिसेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
एडस् दिनाच्या निमित्ताने
आज १ डिसेंबर हा दिवस जगभरात एडस् दिवस म्हणून पाळला जातो. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे यंदाचे हा दिवस पाळण्यास सुरुवात होऊन तब्बल तीन दशके लोटली आहेत. स्वातंत्र्यानंतर आपण अनेक रोगांचा मुकाबला यशस्वीरित्या केला. प्लेग हा रोग आपण हद्दपार केला. त्यापूर्वी प्लेगची साथ एकदा सुरु झाली की, लोक मोठ्या संख्येने मरायचे. अशा या दुर्धर रोगावर आपण मोठी मात केली. त्यानंतर पोलियो या रोगालाही आपण बायबाय केले. त्यासाठी आपल्याला जागतिक पातळीवर सहकार्य लाभले. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अर्थसहाय्यातून आपण प्रभावीपणे उपाययोजना राबवून हा रोग संपुष्टात आणला. त्यानंतर एडस् या रोगाचे मोठे आव्हान सुमारे तीन दशकांपूर्वी आपल्यासमोर उभे राहिले. त्यावर आपण पूर्णपणे मात करु शकलो नसलो तरी त्यावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. एच.आय.व्ही/एडस् या रोगाने ९०च्या दशकात जगात थैमान घातले. सुरुवातीच्या काळात या रोगाचे नेमके स्वरुपचे समजू शकले नव्हते. मात्र नंतर संशोधनानंतर त्याचा शोध लागला. मात्र पाश्‍चिमात्य जगाने यावर कितीही संशोधन केले असले तरी या रोगावर शंभर टक्के गुणकारी असे औषध शोधण्यास अद्याप तरी अपयश आले आहे. त्यासाठी अजूनही काही काळ निश्‍चितच जाईल. सध्या आपण मर्यादीत स्वरुपात का होईना एडस् बाबत जनजागृती करुन या रोगावर नियंत्रण कसे मिळवू शकतो, हे पाहणे जरुरीचे आहे. अनैतिक शरीर संबंध तसेच समलिंगी संभोगातून एडस्‌चा फैलाव होतो. प्रामुख्याने वेश्यांच्या माध्यमातून या रोगाचा फैलाव जास्त झपाट्याने होतो. आजही जगात भारतात जगातील तिसर्‍या क्रमांकाचे मोठ्या संख्येने रुग्ण आढळतात. २०१३ साली भारतात सुमारे २१ लाख एडस्‌चे रुग्ण होते. २०१३ साली एडस्‌व्दारे सुमारे १.३ लाख लोक मरण पावले. आज या रोगाची बाधा झालेल्या रुग्णांपैकी ५१ टक्के आशियातील रुग्ण मरण पावतात. असे असले तरीही आपल्याकडे एडस्‌ग्रस्त लोकांची संख्या १९ टक्क्यांनी घसरली आहे व मृत्यूचे प्रमाण ३८ टक्क्यांनी घसरले आहे. ही आकडेवारी समाधानकारक दिसत असली तरीही याव्दारे मरणार्‍यांची संख्या पाहता ही आकडेवारी धोक्याची घंटा वाजविते. यासंबंध जनजागृती करणे ही काळाची गरज झाली आहे. केवळ देशातूनच नव्हे तर जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात निधी एडस्‌च्या जनजागृतीवर खर्च केला जातो. मुंबईसारख्या महानगरात तर गेल्या वर्षी सुमारे २५ कोटी रुपये एडस्‌वरील जनजागृतीसाठी खर्च केले गेले. त्यासाठी वेश्यावस्ती, ट्रक चालक, निर्वासितांच्या वस्त्या या एडस्‌च्या प्रसाराच्या जास्त धोकादायक स्थले असल्याचे समजले जाते. त्याठिकाणी एडस्‌विषयी जनजागृती करणे आवश्यक ठरते. प्रत्येक गर्भवती महिलेची आता यासंबंधी चाचणी करुन तिला एडस् आढळल्यास त्यावर उपाय केले जातात. त्यामुळे या रोगाचा फैलाव कमी होण्यास मदत होऊ शकते. रायगड जिल्ह्यातही गेल्या एक दशकातील आकडेवारी पाहता एडस्‌च्या रोग्यांची संख्या झपाट्याने कमी होत गेली आहे. २००२ साली १३८ जणांची चाचणी करण्यात आली होती त्यातील ५८ जणांना या रोगाची लागण झाल्याचे आढळले. म्हणजे रोगाची लागण झालेली टक्केवारी ४२ टक्के होती. तर आता २०१४ साली ४८७७३ जणांच्या केलेल्या तपासणीत ४३७ जणांना या रोगाची लागण झाल्याचे सिध्द झाले. म्हणजे जेमतेम एक टक्के लोकांना एडस् झाल्याचे सिध्द झाले. गेल्या दशकात जिल्ह्यात एडस्‌ची चाचणी करणार्‍यांची संख्या जशी झपाट्याने वाढली तशी रुग्णांची संख्या वाढली. मात्र एकूण तपासणी व लागण यांचा विचार करता हे प्रमाण अतिशय कमी भरते. याचा अर्थ एडस् संबंधी जनजागृती वाढली आहे. त्याचबरोबर २००९ साली ४० गरोदर महिलांना या रोगाची लागण झाली होती. आता मात्र २०१४ साली हे प्रमाण घसरुन १५वर खाली आले. जागतिक पातळीवर उद्योगपती बिल गेटस् यांनी एडस्‌च्या जनजागृतीसाठी अब्जावधी डॉलर देऊन एक महत्वाचे पाऊल उचलले होते. आता कपठे तीन दशकानंतर त्यांचे चांगले दृश्य परिणाम दिसू लागले आहेत. परंतु अजूनही हे काम अपूर्णच आहे. पूर्णपणे एडस् हद्दपार होईल तो या भूतलावरील सुदिन असेल. परंतु त्यासाठी अजून काही वर्षे वाट पहावी लागणार आहे.
-------------------------------------------------------

0 Response to "एडस् दिनाच्या निमित्ताने"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel