-->
युती अखेर तुटणार

युती अखेर तुटणार

संपादकीय पान मंगळवार दि. 24 जानेवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
युती अखेर तुटणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपाच्या युतीचे गुर्‍हाळ आता संपल्यात जमा असून बहुदा ही युती तुटण्याच्या बेतात आहे. विधानसभेसाठी सुध्दा ही युती तुटली होती. आता देखील त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. शिवसेनेकडून दिलेला 60 जागांचा प्रस्ताव भाजपाने धुडकावून लावला, तर भाजपाच्या वतीने मागितलेल्या 114 जागा देणे शक्य नसल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले. दोन्ही पक्षांनी एकमेकांना दिलेल्या आकडयातील अंतर खूप मोठे असल्याने आता ही युती तुटली असल्याचा संदेश दोन्ही पक्षांनी आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. खरे तर भाजपाने ही युती तुटावी यासाठीच सुरुवातीपासून प्रयत्न केले होते. भाजपाला मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी आपल्या पक्षाचा नेता बसवायचा आहे. अशा वेळी युती तोडणे त्यंना भाग आहे. कारण शिवसेना महापालिकेत मोठा भाऊ आहे व भाजपाला कमी जागा देणार हे पहिल्यापासूनच स्पष्ट बाब होती. केंद्र, राज्य आणि महापालिकेमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे. सत्तेची फळे चाखत असताना दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर कडाडून टीका करीत होते. त्यामुळे या वेळी दोन्ही पक्ष वेगळे लढणार हे जवळपास निश्‍चित झाले होते. गेले वर्षभर किरीट सोमय्या व आशिष शेलार यांना पुढे करुन शिवसेनेवर आगपाखड करण्यास भाजपाने सुरुवात केली होती. असे असले तरीही निवडणुका जाहीर झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या वतीने युती करण्याबाबत वाटाघाटींची औपचारिकता पार पाडली. दोन्ही पक्षांत बैठकीच्या आजवर एकंदर तीन फेर्‍या झाल्या. शनिवारी सायंकाळी झालेल्या बैठकीमध्ये शिवसेनेने 60 जागांचा प्रस्ताव भाजपाला दिला. मागच्या निवडणुकीत भाजपाला 63 जागा देण्यात आल्या होत्या. यावेळी आमची शक्ती वाढली असल्याने जागा वाढवून मिळाल्या पाहिजेत, अशा प्रकारे भाजपाकडून दबाव आणला जात होता. त्यासाठी 2014 च्या निवडणुकीत भाजपाच्या निवडून आलेल्या आमदारांच्या संख्येचे गणित मांडण्यात येत होते. शिवसेनेवरील दबाव वाढून त्यांनी जास्त जागा द्याव्यात यासाठी भाजपाच्या 227 जागांसाठी 512 उमेदवारांची यादी तयार असल्याचे आशीष शेलार यांनी जाहीर केले होते. तरीही कोणत्याही दबावाला बळी न पडता शिवसेनेने भाजपाला मागच्या पेक्षा तीन जागा कमी देण्याचा प्रस्ताव देऊन एक प्रकारे भाजपाची थट्टाच केली होती. भाजपाने 114 जागांचा प्रस्ताव दिल्यानंतर कोणतीही चर्चा पुढे सरकण्याची चिन्हे नसल्याने दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी बैठक गुंडाळली. दोन्ही पक्षांनी एकमेकांना दिलेल्या आकडयांतील अंतर कमी होण्याची शक्यता नसल्याने आता वरिष्ठ नेते युती तुटल्याची औपचारिक घोषणा करतील, असे दिसते. भाजपा आपल्याकडून ही युती तुटली असे न दाखविता शिवसेनेच्या आडमुठे धोरणामुळे युती तुटल्याचे दाखवित आहे. निदान त्यांच्या तरी तसा प्रयत्न राहाणार आहे. केंद्रात व राज्यात सत्ता आल्यापासून भाजपाला शिवसेना आता बोजा वाटू लागली आहे. कारण केंद्रापासून ते पंचायत राज पर्यंत त्यांना एकहाती सत्ता हवी आहे. मात्र युती तुटल्यामुळे शिवसेना व भाजप या दोघांनाही याचा फटका सहन करावा लागणार आहे हे नक्की.

0 Response to "युती अखेर तुटणार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel