-->
जीएसटी नेमके कधी?

जीएसटी नेमके कधी?

संपादकीय पान सोमवार दि. 23 जानेवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
जीएसटी नेमके कधी?
केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून जीएसटीची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली होती. मात्र ही तारीख आता पुढे ढकलून 1 जुलै रोजी करण्यात आली आहे.  पश्‍चिम बंगाल व तामिळनाडूचा जीएसटीला विरोध लक्षात घेता 1 जुलै 17 रोजी तरी जीएसटी लागू होईल की नाही याबाबत संभ्रम कायम आहे. या पार्श्‍वभूमीवर संसदेत येत्या 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार्‍या केंद्रीय अर्थसंकल्पात आगामी आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये अप्रत्यक्ष करांचे दर काय असावेत? त्याद्वारे सरकारला नेमके किती उत्पन्न मिळणार आहे? याबाबत चित्र स्पष्ट नाही. अशा स्थितीत महसुली उत्पन्नात अप्रत्यक्ष करांचा अंदाज अर्थसंकल्पात करणे अर्थमंत्र्यांना बरेच जड जाणार आहे. केंद्र सरकारच्या महसुली उत्पन्नात अप्रत्यक्ष करांचा वाटा 45 टक्क्यांहून अधिक असतो. त्यात अबकारी कर, आयात कर व सेवा करच्या स्वरूपात गोळा होणारी रक्कम असते. राजकीय हेतू डोळ्यापुढे ठेवून यंदा अर्थसंकल्प महिनाभर आधी मांडण्याचे सरकारने ठरवल्याने वर्षभरात मिळणारे करांचे उत्पन्न व अर्थव्यवस्थेच्या आर्थिक विकासाच्या आकडेवारीबाबत ठोस अंदाज बांधण्यासाठी सरकारकडे आजमितिला पुरेशी माहिती उपलब्ध नाही. साहजिकच अर्थसंकल्पात अप्रत्यक्ष करांचे दर व त्याच्या संभाव्य उत्पन्नाबाबत सरकार कोणता फॉर्म्युला वापरणार, याबाबतही संभ्रमच आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, केंद्राने जीएसटी लागू होणार, असे गृहित धरून, अर्थसंकल्पात अप्रत्यक्ष करांचे दर निश्‍चित केले, तर देशभर असा स्पष्ट संकेत जाईल की किमान सप्टेंबर 17 पूर्वी जीएसटी लागू करण्यासाठी सरकार कटिबध्द आहे. मात्र असे न घडल्यास नव्या आर्थिक वर्षात जीएसटी लागू होणार नाही, असा नकारात्मक संदेश सर्वत्र जाईल. जर सरकारला ही नवीन करप्रणाली लागू करताना जर अडचणी येत असतील तर त्यांनी घाईघाईने याची अंमलबजावणी करणे टाळावे. त्यासाठी पुरेसा वेळ घेणे गरजेचे आहे. अन्यथा नोटाबंदीसारखीच स्थिती या वेळी होण्याचा धोका आहे.
-------------------------------------------------

0 Response to "जीएसटी नेमके कधी?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel