-->
डान्स बार नकोच

डान्स बार नकोच

संपादकीय पान सोमवार दि. ३० नोव्हेंेबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
डान्स बार नकोच
सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा डान्स बार सुरु करण्यास परवानगी देण्याचा आपला निकाल कायम ठेवला असला तरीही डान्स बार संस्कृती आपल्याला नकोच आहे. ज्या डान्सबारनी अनेकांचे संसार उद्धस्त केले व अनेक माता-भगीनींना उघड्यावर आणले ते डान्सबार आता पुन्हा सुरु झाल्यास यापूर्वीच्या घटनांची पुनरावृत्तीच होणार आहे. गेले दहा वर्षे डान्स बार बंद होते त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या जीवनात काही फरक पडला नाही, असे डान्स बार पुन्हा सुरु करणे म्हणजे आपल्याच हातानी आपला घात करण्यासारखे आहे. या डान्सबारमध्ये काम करणार्‍या नर्तिकांचा रोजगार त्यामुळे संपुष्टात आला व अशा प्रकारे कोणाचाही रोजगार संपविण्याचा अधिकार आपल्याला नाही, असे प्रांजळ मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. न्यायालयाचा हा निर्णय मानवी दृष्टीकोनातून कितीही योग्य वाटत असला तरीही काही जणांच्या रोजगारापोटी इतरांचे जे संसार उद्धस्त झाले त्याचा अगोदर विचार करावयास हवा. अर्थात आता डान्सबारना परवानगी देताना न्यायालयाने त्यात अश्लीलता नको, विभत्स हावभाव नको असे म्हटले आहे. परंतु जिकडे महिलेला उपभोगवस्तू म्हणून पाहिले जाते त्या ठिकाणी महिलांकडे विभस्त नजरेने पाहू नकात असे सांगणे म्हणजे गाढवापुढे गीता वाचण्यासारखे आहे. यापूर्वी डान्सबारवरील नृत्यांगनांवर लाखो-करोडो रुपये उधळले गेले. उधळणार्‍यांनी आपल्या व कुटुंबाच्या भविष्याचा कोणताही विचार केला नाही. बाईवर पैसे उधळणे ही एक नशा व पुरुषार्थ समजून हे पैसे उधळले गेले. अर्थातच आपल्याकडील ही संस्कृती किंवा विचार गेल्या दहा वर्षाच्या बंदीच्या काळात काही बदललेला नाही. त्यामुळे कितीही निर्बँध घालून डान्सबार सुरु झाले तरी त्यात अश्लीलता ही असणारच, त्यात पैसे हे उधळले जाणारच. शेवटी यातून पुन्हा अनेकांचे संसार रस्त्यावर येण्याचा धोका आहेच. अशा स्थितीत न्यायलयाचा अवमान होणार नाही हे पाहून राज्य सरकारने हे बार कसे पुन्हा होणार नाहीत ते पहाणे यातच त्यांची खरी कसोटी ठरणार आहे. बारमध्ये कोणत्याही प्रकारचे मद्यपान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असेही न्यायालयाने सुचविले आहे. हे देखील हास्यास्पदच ठरणार आहे. एकीकडे बार म्हणावयाचे आणि तिथे मद्य पुरवायचे नाही, असा विरोधाभास ठरणार आहे. तेथे मद्य पुरविले जाणार नाही, अश्लील हावभाव होत नाहीत, रात्री दहा नंतर हे बंद राहिल हे सर्व पोलिसांनी पाहणे म्हणजे त्यांचा हाप्ता वाढविण्याचा प्रकार ठरणार आहे. या डान्सबारची परवना फी वार्षिक ५० लाख रुपये करण्याचाही विचार सुरु आहे. म्हणजे जास्त पैसे खर्च करणारेच येथे जातील असा एक विचार सरकारमध्ये सुरु आहे. अर्थात यामुळे फारसा काही फरक पडणार नाही. कारण जो नर्तिकांवर पैसे उधळण्याच्या मनस्थितीतला माणूस आहे तो त्यासाठी जादा प्रवेश फी निश्चितच देईल. न्यायालयाच्या आदेशानुसार नर्तिका व कर्मचार्‍यांना सदर हॉटेलने कायम स्वरुपी कर्मचारी करावे, त्यामुळे त्यांना कामगार कायद्याअंतर्गत सर्व लाभ मिळतील व त्यांच्या आयुष्यात स्थैर्य येईल. सध्या सर्वच क्षेत्रात कामगारांच्या कायद्यांची ज्या प्रकारे पायमल्ली होत आहे व त्याबाबतीत सरकारही एवढे उदासीन आहे हे सर्व पाहता हॉटेलमधील या नर्तिका व कर्मचार्‍यांसाठी हे कायदे कडकपणे पाळले जाण्याशी शक्यता दूरच आहे. न्यायालय जर डान्सबारबाबत एवढे आग्रही आहे तर त्याबरोबर त्यांना वेश्याव्यवसायही अधिकृत करावा लागले. कारण हे सर्व डान्सबार वेश्याव्यवसायाचे अड्डे किंवा पिकअप पॉईंटस होते. तेथून सर्सास या नर्तिकांना घेऊन जाता येत होते. तसेच काही डान्सबारमध्ये तर रुम्स ठेवून तेथेच वेश्याव्यवसाय चालत असे. त्यामुळे न्यायालयाने केवळ डान्सबारला परवानगी देऊन भागणार नाही तर वेश्याव्यवसायाचे परवाने द्यावे लागणार आहेत. त्याची तयारी व मानसिकता आपल्याकडे सरकारची व नागरिकांची आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. कारण जगात अनेक ठिकाणी वेश्याव्यवसाय अधिकृत आहे व वेश्यांना अधिकृत परवाने दिले जातात,
त्यांची नियमीत वैद्यकीय तपासणी केली जाते. आपल्याकडे नृत्य हा प्रकार परंपरांगत चालत आलेला आहे. नृत्याला राजाश्रयही लाभला होता. नृत्यांगना व वेश्या यांच्यात फरक होता. त्याकाळच्या नृत्यात मादकता असली तरीही विभत्स हावभाव नव्हते. नृत्याकडे एक कला म्हणून पाहिले गेले होते. तमाशा या नृत्यप्राकारातही मादकता होती, त्यात सौंदर्य होते, परंतु अश्लिलता नव्हती. मात्र गेल्या काही वर्षात डान्सबारनी आपल्याकडील ही संस्कृतीच पार बदलून टाकली. त्यातून विभत्सतेचे दर्शन तर होतेच शिवाय अनेकांचे संसार उद्धस्त झाले व हे थांबविण्यासाठीच बंदी घालण्यात आली. यापुढेही ती कायम रहावी.
----------------------------------------------------------

0 Response to "डान्स बार नकोच"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel