-->
कर्नाटकचा संग्राम

कर्नाटकचा संग्राम

शनिवार दि. 12 मे 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
कर्नाटकचा संग्राम
कर्नाटक या दक्षिणेतील प्रगत राज्यात आज विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. गेले वर्षभर कर्नाटकाची निवडणूक गाजत होती. ही निवडणूक कॉग्रेस व भाजपा या दोघांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. कॉग्रेसच्या ताब्यात असलेले हे देशातील आता सर्वात माठे राज्य असल्याने ते टिकविणे त्यांना आवश्यक होते. तसेच गेल्या काही वर्षात पंजाब वगळता कॉग्रेसला संपूर्ण राज्यात विजयश्री अशी खेचून आणता आलेली नाही. गुजरातसारख्या राज्यात त्यांच्या हातून विजय सटकला होता. त्यामुळे त्यांना कर्नाटक राज्य टिकविणे अत्यावश्यक ठरलेे आहे. तर भाजपासाठी देशातील 22 राज्ये जिंकल्यावर दक्षिणेतील हे महत्वाचे राज्य जिंकणे प्रतिष्ठेचे ठरणार आहे. त्याचबरोबर जेमतेम एक वर्षावर आता मध्यवर्ती निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यासाठीची ही निवडणूक ही राजकीय पक्षांसाठी रंगीत तालीमच ठरेल. गेल्या महिन्याभरात कर्नाटकातील निवडणुकातील प्रचार अगदी शिगेला पोहोचला होता. त्यातच शेवटचे दहा दिवस तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी प्रचार करुन या संग्रामात रंगत आणली. या प्रचाराच्या रणधुमाळीत दोन्ही पक्षांनी परस्परांवर चिखलफेक केली. त्यात भाजपाने प्रामुख्याने नरेंद्र मोदींनी इतिहासाची मोडतोड करीत खोटे आरोप कॉग्रेसवर केले. कॉग्रेसचा प्रचार जरी आक्रमक असला तरी वास्तवापासून दूर जाणारा नव्हता. तसे पाहता कर्नाटक हा कित्येक वर्षे कॉग्रेसचा बालेक्किल्ला राहिला आहे. 1977 मध्ये देशभरात काँग्रेसचा पराभव होत असताना कर्नाटकात मात्र पक्षाला 28 पैकी 26 जागा मिळाल्या. नंतर 1983 मध्ये राज्यात काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला. नंतर 1998-99 नंतर राज्यात काँग्रेस-भाजप-जनता दल अशी तिरंगी स्पर्धा दिसू लागली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही तिरंगी लढतच दिसणार आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा जनता दल (सेक्यु.) हा तसा मुख्य दावेदार पक्ष मानला जात नसला तरी सत्तेच्या किल्या त्यांच्या हाती जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पक्षाची मते भाजप व काँग्रेस वाटून घेतील असाही होरा आहे. भाजप व काँग्रेसमध्ये खरा सामना रंगेल, असे चित्र असले तरी काही अंदाजानुसार कॉग्रेस सर्वात मोठा पक्ष होईल व कोणालाच एकहाती सत्ता मिळणार नाही. 2008मध्ये भाजपने येदियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला धूळ चारली होती. या विजयाने भाजपच्या बड्या नेत्यांमध्ये आंध्र, तामिळनाडू, केरळ अशी राज्ये पादाक्रांत करण्यास अडचणी येणार नाहीत, असा आत्मविश्‍वास निर्माण झाला होता. पण 2013 मध्ये येदियुरप्पा यांच्या भ्रष्ट कारभारामुळे कानडी मतदारांनी काँग्रेसला पुन्हा संधी दिली. केंद्रातील काँग्रेसप्रणीत यूपीए आघाडी भ्रष्टाचाराच्या विविध आरोपांमुळे, केजरीवाल-अण्णा-बेदी यांच्या लोकपाल आंदोलनामुळे पुरती घायाळ झाली असताना, राष्ट्रीय पातळीवर घराणेशाहीमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न मांडणार्‍या नरेंद्र मोदी यांचा उदय झाला, त्यांच्या गुजरात मॉडेलची चर्चा सर्वदूर पोहोचली असताना सामान्य कानडी मतदारांनी मात्र भाजपला नाकारून धक्का दिला होता. या धक्क्याने भाजपची दक्षिण दिग्विजय मोहीम जवळपास बासनात गुंडाळली गेली. आता गेल्या चार वर्षांत परिस्थीती बदलली आहे, देशाच्या बहुतांश राज्यांतून काँग्रेसची सत्ता गेली आहे. भाजपने हे राज्य जिंकल्यास त्यांच्या आगामी पुढील वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी त्यांना बळ लाभेल. याचा परिणाम म्हणून लोकसभा निवडणुकांत अन्य दक्षिण राज्यांत भाजप प्रबळ प्रादेशिक पक्षांना हाताशी धरू शकते. भाजपाने त्यासाठीच ही निवडणूक काहीही करुन जिंकण्याचा मनोदय जाहीर केला आहे. हिंदुंचे धार्मिक धृवीकरण करुन आपल्या पदरात कशी मते पडतील हे पाहिले आहे. भाजपचे कडवे हिंदुत्व रोखण्यासाठी व त्यांची लिंगायत व्होट बँक फोडण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी लिंगायत समाजाच्या स्वतंत्र धर्माच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. तसेच कन्नड अस्मितांना चुचकारण्यासाठी स्वत:च्या राज्याचा स्वतंत्र झेंडाही त्यांनी फडकावला आहे. सिद्धरामय्या यांच्या या दोन राजकीय चाली भाजपच्या सकल हिंदुत्व अजेंड्याच्या दृष्टीने अडचणीच्या ठरल्याने भाजप आक्रमक झाला आहे. त्यावर उतारा म्हणून भाजपने कडव्या हिंदुत्वाचा प्रचार करण्यासाठी योगी आदित्यनाथ यांना राज्यात ठिकठिकाणी फिरवले होते. त्यांच्या दौर्‍याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्याचबरोबर टिपू सुलतान या लोकप्रिय राजाच्या धर्माचा वापर करुन राजकारण करण्याचा धंदा भाजपाने केला. त्यातून हिंदू मते आपल्याबाजने एकवटतील असा अंदाज होता. सध्या अजूनतरी भाजपाचा हा डाव फसलेला दिसत आहे. सिद्धरामय्या यांची प्रतिमा स्वच्छ आहे. राज्यातील काँग्रेस गटातटात विभागली असताना सिद्धरामय्या यांनी पक्षात एकी आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात पक्षात संघर्ष उफाळलेला दिसला नाही. त्यामुळेच यावेळी तिकीट वाटपात कॉग्रेसमध्ये फारशी गटबाजी झालेली नाही. कित्येक वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदाचा पूर्ण कालावधी उपभोगलेले मुख्यमंत्री म्हणून त्यांची गणणा केली गेली आहे. त्या उलट भाजपामध्ये येदियुरप्पा यांना पक्षातून निलंबित केल्यानंतर भाजपची सूत्रे अनंत कुमार यांच्याकडे दिली होती. त्यांना धडा शिकवण्यासाठी येदियुरप्पा यांनी स्वत:चा स्वतंत्र पक्ष काढला. त्याचा भाजपला 2013 च्या विधानसभा निवडणुकांत फटका बसला. हीच पुनरावृत्ती होऊ नये म्हणून 2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी येदियुरप्पा यांचे वाजतगाजत पक्षात स्वागत केले होते. आता येदियुरप्पा यांचे नाणे चालते का ते बघायचे? कर्नाटकचा हा संग्राम आता संपला आहे. जनता आता नेमके कोणाच्या बाजुने मत नोंदविते त्यावर भविष्यातील राजकारणाची दिशा ठरणार आहे.
------------------------------------------------------

0 Response to "कर्नाटकचा संग्राम"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel