-->
मानसिक विकारांचे संकट

मानसिक विकारांचे संकट

रविवार दि. 13 मे 2018 च्या अंकासाठी चिंतन- 
------------------------------------------------
मानसिक विकारांचे संकट
-----------------------------------
एन्ट्रो- गेल्या तीन दशकात प्रामुख्याने आर्थिक उदारीकरणाचे युग सुरु झाल्यापासून मानसिक रोगांचे प्रमाण वाढले आहे. देशवासियांची ढासळती मानसिकता ही प्रामुख्याने जीवघेणी स्पर्धा, एकमेकांबद्दल असुया, बदललेली खाद्यसंस्कृती आणि सोशल मिडायाच्या प्रसारामुळे कमी झालेले नातेसंबंध अशा अनेक कारणांमुळे झाली आहे, असे मानसोपचारतज्ज्ञांचे मत आहे. सर्वात खेदाची व आश्‍चर्याची बाब म्हणजे, भारतात शेतकर्‍यांच्या दरवर्षी जेवढ्या आत्महत्या होतात तेवढ्याच विद्यार्थ्यांच्याही होतात. परंतु आपल्याकडे शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर चर्चा होताना दिसते मात्र विद्यार्थ्यांच्या आत्महत्या फारशा प्रकाशझोतात येत नाहीत...
-----------------------------------
सध्या आपल्या देशात मानसिक विकार सर्वात झपाट्याने वाढत चाललेला रोग आहे. एकेकाळी आपल्याकडे डायबेटिसचे प्रमाण जनतेत वाढत चालले होते. परंतु डायबेटिसचे प्रमाण वाढते असतानाच गेल्या काही वर्षात मानसिक रोगांनी उचल खाल्ली आहे व ही सर्वात चिंतेची बाब ठरावी. आपल्याकडे देशात मनोविकार असलेल्यांची संख्या जपानच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. एकेकाळी जपानमध्ये या रोग्यांची संख्या जास्त होती. आपण आता जपानलाही मागे टाकले आहे, ही दुदैवी बाब ठरावी. स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे मानसिक रोग जवळपास अस्तित्वातच नसल्यासारखा होता. मात्र गेल्या तीन दशकात प्रामुख्याने आर्थिक उदारीकरणाचे युग सुरु झाल्यापासून मानसिक रोगांचे प्रमाण वाढले आहे. देशवासियांची ढासळती मानसिकता ही प्रामुख्याने जीवघेणी स्पर्धा, एकमेकांबद्दल असुया, बदललेली खाद्यसंस्कृती आणि सोशल मिडायाच्या प्रसारामुळे कमी झालेले नातेसंबंध अशा अनेक कारणांमुळे झाली आहे, असे मानसोपचारतज्ज्ञांचे मत आहे. सर्वात खेदाची व आश्‍चर्याची बाब म्हणजे, भारतात शेतकर्‍यांच्या दरवर्षी जेवढ्या आत्महत्या होतात तेवढ्याच विद्यार्थ्यांच्याही होतात. परंतु आपल्याकडे शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर चर्चा होताना दिसते मात्र विद्यार्थ्यांच्या आत्महत्या फारशा प्रकाशझोतात येत नाहीत. देशात सरासरीने प्रत्येक तासाला एक विद्यार्थ्याने आत्महत्या केलेली असते. दहावी-बारावीच्या परीक्षेत नापास झाले किंवा अपेक्षेपेक्षा कमी मार्क पडले (अगदी 90 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळणारे विद्यार्थीही आत्महत्या करताना दिसतात) म्हणून जशा आत्महत्या केल्या गेल्या आहेत तशाच त्या कोवळ्या वयात होणारे प्रेमभंग, आई-वडिलांनी किरकोळ अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत या नैराश्यातूनही आत्महत्या होत आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांविषयी देखील अनेकांचे संशोधन चालू असून त्यामागचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरु आहे. कारण सरकारने शेतकर्‍यांच्या आत्महत्या होऊ नयेत यासाठी विविध पॅकेज दिली असली तरी आत्महत्येचे संख्या काही कमी झालेली नाही. कदाचित या शासकिय योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहोचत तरी नसाव्यात किंवा नेमक्या आत्महत्येचे कारण काही वेळगे काय आहे, याचा शोध घेतला जात नसावा. विद्यार्थ्यांकडून केल्या जाणार्‍या हत्या आणि अगदी बलात्कारांचे वाढते प्रमाणही चिंताजनक ठरले आहे. यामागे केवळ मनोविकार आहे असे नव्हे, तर लहान वयात लैंगिक शिक्षण योग्य दिले जात नसल्यामुळेही हे होत आहे. सध्या आपल्याकडे इंटरनेट व सोशल मिडियामुळे मुलांना वयात येण्याच्या अगोदरच चुकीचे ज्ञान मिळते व त्यातूनही अनेक लैंगिक गुन्हे होतात. प्रत्येक मनोविकार झालेली व्यक्ती हिंसक मार्गाला जातेच असे नाही. परंतु त्याचा ओढा हिंसेकडे वाढू शकतो. समाजातील वाढती असहिष्णुता ही देखील याच सामाजिक मानसिक अनारोग्याचेच एक लक्षण असते. मानसिक विकार एकंदरीत जीवनाकडेच निराशावादी दृष्टीने पाहायला लावतात आणि त्यातून मानसिक अनारोग्याने ग्रस्त समाज तयार होत जातो. आज भारताची त्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू आहे, ही दुदैवी बाब आहे. अगदी विकसीत देशातील जनता सर्वच सुखी असेल असे नाही. अगदी अमेरिकेत देखील मानसिक विकार वाढलेले दिसतात. मात्र भूतानसारखा लहान व फारसे मोठे आर्थिक उत्पन्न नसणारा देशही सुखी-समाधानी देशांच्या यादीत पहिला येतो. त्यामुळे केवळ आर्थिक सुबत्तेमुळे मानसिक विकार होत नाहीत असे म्हणणे चुकीचे आहे. आपल्या देशात गेल्या दोन दशकात अंधश्रद्दा वाढीस लागली आहे. यातील देवावर विश्‍वास ठेवणार्‍यांची संख्या वाढलेली आहे, देवळात वाढलेली गर्दी, तेथील वाढलेले देणग्यांचे प्रमाण यात अंधश्रध्देच्या मुद्याची सरमिसळ करणे योग्य ठरणार नाही. पंरतु बाबा-बुवांचे यात बरेच फावले आहे. लोकांना सध्याच्या धकाधकीच्या जिवनात कुठेतरी आधार पाहिजे असतो व तो आधार त्यांना बाबा-बुवा देतात, असे आपल्याला सर्वसाधारणपणे दिसते. राम-रहिम, आसाराम बापू यांनी केलेले गुन्हे पाहिले, त्यांना झालेल्या शिक्षा पाहिल्या तरी त्यांचे शिष्यगण त्यांच्यापासून दुरावत नाहीत, त्यामुळे आपल्याकडील अंधश्रध्दा किती थराला गेली आहे ते आढळते. हा एक प्रकारचा मनोविकारच म्हणावा लागेल. गेल्या तीन दशकात आर्थिक उदारीकरमानंतर आपल्या जीवनशैलीत आमुलाग्र बदल झाला. सर्वच जण स्पर्धेत ढकलले गेल्याने स्वत:पुरताच विचार करण्याची प्रवृत्ती वाढीस लागली. मार्क हेच आपल्या बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे हे एवढे ठसवले गेल्याने त्याच मानसिक दबावाखालीच प्रत्येक विद्यार्थी वाढत जातो. त्याच्या जन्मजात स्वतंत्र मानसिकतेला पंगू केले जाते. बरे त्यात पालकांचा दबाव एवढा जबरदस्त असतो की, विद्यार्थी त्याकाली पूर्णपणे दबला जातो. त्याची स्वतंत्र विचार करण्यची कुवतच संपते. याचा कधीतरी स्फोट होतो व त्यातून ताणतणाव निर्माण होतात. एखाद्या लहानसा बाबतीत जरी पराभव झाला तरी आपल्या आयुष्यात आता काही शिल्लक राहिलेले नाही अशी भावना निर्माण होऊन त्यातून आत्महत्येस प्रवृत होणे हे क्रमाने होते. सोशल मिडियामुळे माणसे प्रामुख्याने तरुण पिढी जनसंपर्कातून तुटली आहे. सोशल मिडिया हे व्हर्चुअल जगच त्यांना खरे वाटू लागले आहे. नातेसंबंध, मित्रमैत्रीणी यापासून हे तरुण दूर जाऊ लागले आहेत.वास्तवाशी नाळ तुटायची तेथेच सुरुवात होते. यातून जीवनातले प्रश्‍न सोडवण्यासाठी लागणारा संयम, सोशीकता आणि वास्तवदर्शीपणा कमी होत होत तो अधिकाधिक चुकाच करत जाण्याची संभावना त्यामुळे वाढत जाते. मोबाईलवरील गेम्समुळे तर तरुण पिढी एकांडी शिलेदार बनली आहेत. यातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. बदललेल्या आणि त्यातही चुकीच्या आहार पद्धतीही मानसिक अनारोग्यात भर घालत असतात. आपला आहार आणि आपले मानसशास्त्र यात अतूट नाते आहे, व याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. मानसिक विकार झाला म्हणजे एखादा वेडाच झाला अशी आपल्याकडे ठाम समजूत झालेली आहे. त्यामुळे त्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडेही जायला लोक घाबरत आसतात. याविषयी असलेले अज्ञान त्याला कारणीभूत आहे. आपल्याकडे भारतात आज मनोविकारग्रस्तांची पसरलेली साथ पाहता आम्हाला ती नुसती रोखून चालणार नाही तर आपले नागरिक मानसिकदृष्ट्या अधिकाधिक सकारात्मक सुदृढ कसे होतील हे पाहावे लागेल. त्यासाठी राष्ट्रीय अभियानाची आवश्यकता आहे. त्याखेरीज देशाची ज्ञानात्मक व आर्थिक प्रगतीही शक्य होणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे!
---------------------------------------------------------

0 Response to "मानसिक विकारांचे संकट"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel