-->
संपादकीय पान-चिंतन--१४ ऑक्टो २०१३ 
--------------------------
शंभरी पार झालेल्यांचा मोठा क्लब
-------------------------
आपला देश हा तरुणांचा देश म्हणून संपूर्ण जगात ओळखला जातो. आपली ही ओळख जशी आपण मोठ्या अभिमानाने सांगतो तसेच आपल्याकडे सर्वाधिक वयोवृध्द ज्यांनी वयाची शंभर पार केली आहे ते ही राहातात. आपल्याकडे शंभरी पार केेलेल्यांची संख्या जगातील कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे. त्यामुळे शंभरी पार केलेल्या ज्येष्ठांचा सर्वात मोठा क्लब आपल्या देशात आहे असे म्हटल्यास वावगे ठरु नये. ही संख्या सुमारे सहा लाखांच्यावर आहे. अर्थात या ज्येष्ठांचे अनेकदा नेमके वय सांगता येणार नाही अशी स्थिती आहे. कारण एक तर ग्रामीण भागात राहिलेल्या ज्येष्ठांना त्यांची नेमकी जन्म तारीखही आठवतच असते असे नाही. पूर्वीच्या काळी जन्म हा घरातच होत असल्याने त्याची नोंदही होत नसे. त्यामुळे अनेकांचे नेमके वय सांगणे कठीण झाले आहे. बरे त्याकाळी वय सरसकटच सांगितले जाई. त्यामुळे सद्या जे नव्वदीच्या पुढे आहेत ते आपले वय शंभर असल्याचे सांगतात. मात्र असे असले तरीही आपल्या देशात शंभरी पार केलेल्यांची संख्या जास्त आहे हे खरे. आपल्याखालोखाल चीन व जपान या देशात शंभरी पार केलेले ज्येष्ठ आहेत.
संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालानुसार, वृध्दांची ही संख्या झपाट्याने वाढतच जाणार आहे. उत्तरप्रदेश या आपल्याकडील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यात शंभरी पार केलेले ज्येष्ठ सर्वाधिक आढळले आहेत. त्याखालोखाल बिहार, आंध्रप्रदेश, झारखंड, कर्नाटकात शंभरी पार केलेले वृध्द मोठ्या संख्येने राहातात. तर केरळ, गुजरात, दिल्ली, तामीळनाडू या राज्यात त्यांची तुलनात्मक संख्या कमी आहे. आपल्याकडे शहरी भागात चांगल्या वैद्यकीय सुविधा असतानाही आश्‍चर्याची बाब म्हणजे शहरात शताब्दी पार केलेले कमी जण आहेत. तर ग्रामीण भागात त्यांची संख्या जास्त आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे अनेक वैद्यकीय सुविधा प्राप्त झाल्यावर लोकांच्या जीवनमानात सुधारणा झाली आहे. तर मृत्यूच्या सरासरी दरात कपात होऊन एकूणच लोकांचे आर्युमान सुधारले आहे. अशा वेळी शताब्दी गाठलेल्यांचा क्लब वाढतच जाणार आहे.
आपल्याकडे गेल्या दोन दशकात एकत्र कुटुंब पध्दती संपुष्टात आली आहे. याचे जास्त प्रमाण शहरात आहे. अजूनही ग्रामीण भागात एकत्र कुटुंब पध्दती अस्तित्वात आहे. त्यामुळे शहरांपेक्षा ग्रामीण भागात शंभरी पार केलेल्यांची संख्या जास्त आढळते. एकदा माणूस ज्येष्ठत्वाकडे झुकला की त्याला कुणाचा ना कुणाचा तरी आधार लागतो. मग तो जवळच्या नातेवाईकांचा असो किंवा वृध्दाश्रमातील सहकार्‍यांचा असो. त्यातून त्यांची भावनिकदृष्ट्या नाळ जुळते आणि जगण्यातला आनंद व्दीगुणीत होतो. आपल्याकडे अजूनही ग्रामीण भागात लोकांचा परस्परांशी संपर्क तुटलेला नाही, जो शहरात तुटलेला असतो. मुंबई-पुण्यासारख्या महानगरातील ब्लॉक संस्कृतीने प्रत्येकाला चार खोल्यांमध्ये बंदिस्थ करुन टाकले आहे. त्यामुळे माणसाशी  परस्परांशी संबंध-जवळीक-आपलेपणा संपुष्टात आला आहे. तरुणपणी या बाबींची आपल्याला एकवेळ गरज भासत नाही. परंतु एकदा माणूस साठीच्या पलिकडे गेला की त्याला माणसाचा आधार लागतो. जो आधार अजूनही ग्रामीण भागात मिळतो. त्यामुळे ग्रामीण भागात शंभरी गाठलेल्यांची संख्या जास्त आहे. आपल्याकडे शंभरी गाठलेल्यांचा क्लब मोठा आहे परंतु त्यांचा सांभाळ करण्याचीही जबाबदारी आपल्यावर मोठी आहे याचे आपण सर्वांनी म्हणजे सरकारपासून ते समाजातील प्रत्येकाने बाळगली पाहिजे. ज्येष्ठांचा हा क्लब आपल्याला बोज वाटता कामा नये, तर त्याची जबादारी समजून आपण वागले पाहिजे.
--------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel