-->
संपादकीय पान--अग्रलेख--१५ ऑक्टोबर २०१३
-------------------------
समाजवादी ऋषीतुल्य व्यक्तिमत्व
-------------------
वनराईचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मोहन धारिया यांच्या निधनाने देशातील एक समाजवादी ऋषीतुल्य व्यक्तीमत्व आपल्यातून निघून गेले आहे. अगदी अलीकडेपर्यंंत वयाच्या ८८ वर्षी देखील ते आपल्या समाजसेवेत सक्रिय होते. परंतु गेल्या महिन्याभरात त्यांची प्रकृती बिघडली होती. शेवटी त्यांची कर्मभूमी असलेल्या पुण्यात प्रणज्योत मालविली. एक स्वातंत्र्यसैनिक, एकेकाळचा कॉँग्रसेचा सच्चा कार्यकर्ता, आणीबाणीत इंदिरा गांधीना विरोध केल्यामुळे गाजलेले, व्यापार मंत्रीपद ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद अशी पदे भूषविलेले असे एक महान व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. डॉ. धारिया यांची कर्मभूमी पुणे असली तरीही ते मुळचे रायगड जिल्ह्यातले. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील नाटे हे त्यांचे जन्मगाव. येथे प्राथमिक शिक्षण झाल्यावर ते पुण्यात आले. तेथे त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यावेळी १९४२ साली स्वातंत्र्याची चळवळ जोरात होती. सुरुवातीपासूनच समाजकारणाची आवड असल्याने धारीया स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले. महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरित झाले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करुन त्यातले उच्च शिक्षण त्यांना करावयाचे होते त्यामुळे त्यांनी तसा प्रवेशही घेतला होता. परंतु शिक्षण सोडून स्वातंत्र्यांच्या लढ्यात झोकून देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. स्वातंत्र्यानंतर त्यांनी कॉँग्रेस पक्षाचे काम करण्यास सुरुवात केली. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरुंनी त्यांचा उल्लेख एक कुशल संघटक असा केला होता. धारिया कॉँग्रेसचे पदाधिकारी असले तरीही प्रजा समाजवादी पक्षाशी त्यांचे जवळचे संबंध होते. त्यांचा तसा मूळ पिंड समाजवादी विचारांचाच होता. त्यामुळे त्यांची कॉँग्रसेमध्ये राहून घुसमट होत असे. असे असले तरीही त्यांनी प्रदीर्घ काळ कॉँग्रेस पक्ष सोडला नाही. कॉँग्रेसमध्ये राहून आपला समाजवादाचा प्रचार कसा करावयाचा हे मोहन धारिया व अशोक मेहता याना बरोबर माहिती होते. कारण स्वांतत्र्यपूर्व काळापासून त्यांनी कॉँग्रेसचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम केले होते. दरम्यानच्या काळात ते काही वर्षे मुंबईत आले आणि त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली. मुंबईच्या उच्चन्यालयात आपली वकिलीही सुरु केली. त्याचबरोबर ते कॉँग्रेसच्या मुंबई प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कार्यरत झाले. ही जबाबदारी त्यांनी १९६२ ते ६७ या काळात पेलली. कॉँग्रेस पक्षातील एक स्पष्टवक्ता म्हणून त्यांची ओळख सर्वांना होती. कॉँग्रेसने भांडवलदारांच्या बाजूने झुकू नये असे त्यांना सतत वाटे आणि त्याचा ते कॉँग्रसेमध्ये प्रचार व प्रसार करीत. कॉँग्रेसमधील तरुण तुर्क गटात त्यांचा समावेश होता. यातून ते काही काळ इंंदिरा गांधींच्या अगदी जवळचे गणले जात. अनेक बाबतीत त्याचे पक्षात मतभेद होत असत. असे असेल तरी त्यांनी पक्ष कधी सोडला नाही. मात्र १९७५ साली इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लादली आणि बंडखोर धारियांना काही राहवले नाही. त्यांनी ही कृती म्हणजे देशातील लोकशाहीचा अंत आहे व देश हुकूमशाहीच्या दिशेने चालला असल्याची जाहीर टीका करुन पक्षाला रामराम केले. चंद्रशेखर व मोहन धारिया यांना अटक झाली. एका केंद्रीय मंत्र्याला अटक व्हावी हे थोडे विचित्रच होते. आणीबाणी उठली आणि धारियांसह अनेक नेत्यांची सुटका झाली. जनता पक्ष स्थापन झाला. इंदिरा गांधींना पराभूत करण्यात जनता पक्षाचा महत्वाचा वाटा होता. नव्याने स्थापन झालेल्या जनता राजवटीत धारिया व्यापार मंत्री झाले. त्यानंतर एका वर्षातच देशात खाद्य तेलाची मोठी टंचाई निर्माण झाली. परंतु धारिया यांनी मोठ्या प्रमाणावर पाम ऑईल खरेदी करुन या टंचाईवर मात केली. यातून धारिया लोकप्रिय झाले. हा प्रयोग सफल झाल्यावर धारियांनी स्वस्तात जागितक बाजारातून तेल आणावयाचे व नंतर तेजी-मंदीचा फायदा उचलत देशातील जनतेला ते स्वस्तात द्यायचे असे त्यांनी केले. परंतु त्यांच्या या कामामुळे त्यावेळी पंतप्रधान मोरारजी देसाईंचे असलेले मित्र धीरुभाई अंबानी वैतागले आणि मोरारजींकडे त्यांची तक्रार केली. यातून त्यांचे व मोरारजींचे फिसकटे असतानाच सरकार पडले. अन्यथा धारिया राजीनामा देऊन बाहेर पडणार होते. १९७७ साली ते पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. मात्र त्यानंतर ते पुण्यातून पडल्याने त्यांनी पक्षीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. राजकारण सोडून सामाजिक कामे करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचण्याचे ठरविले. तिशीतले काही तरुण तयार करुन त्यांनी वनराई ही संस्था स्थापन केली. १९९० मध्ये धारियांचे स्नेही व व्यक्तीगत मित्र चंद्रशेखर हे पंतप्रधान झाले आणि त्यंानी नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. चंद्रशेखर यांचे सरकार कोसळल्यावर ते पुन्हा पुण्याला परतले आणि त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतले. गेल्या वीस वर्षात ते राजकारणातून निवृत्त झाले असले तरीही समाजवादी चळवळीशी त्यांची बांधिलकी काही संपली नव्हती. मध्यंतरी साधना हे साप्ताहिक नव्या जोमाने सुरु करण्याचा प्रश्‍न आला त्यावेळी त्यांनी सर्वोतोपरी मदत केली. पुण्यात व महाराष्ट्रात जे समाजवादी बांधिलकीला मानणारे लोक, कार्यकर्ते, नेते आहेत त्यांचीशी त्यांचा या वयातही जवळचा संबंध होता. आज देशात समाजवादाची पिछेहाट होत असताना धर्मांद शक्ती डोके वर काढीत आहेत, अशा वेळी धारिया यांच्यांसारख्या ऋषितुल्य व्यक्तीमत्वाची समाजाला गरज होती. त्यांचा जाण्याने समाजवादी चळवळीची एक मोठी हानी झाली आहे. सध्याच्या राजकारण्यांनी आदर्श ठेवावा व त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी असे त्यांचे व्यक्तीमत्व होते.
---------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel