-->
संपादकीय पान--चिंतन--१६ ऑक्टोबर २०१३साठी
---------------------
गुंतवणूकदारांच्या गीतेला यंदाचे नोबेल
--------------------
शेअर बाजार म्हटला म्हणजे आपल्याला सट्टा असेच वाटते. मात्र हे शंभरटक्के खरे नाही. शेअर बाजारात सट्टा हा असतोच, मात्र त्यातही योग्य अभ्यास करुन जर गुंतवणुकीचे नियोजन केले तर तुम्ही सट्ट्यापासून दूर राहूनही भांडवलवृध्दी करु शकता. अभ्यासाच्या आधारे हेच म्हणणे सिध्द करुन दाखविणार्‍या तिघा अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांना यंदाचे प्रतिष्ठेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे. युजिन फॅमा, लार्स पीटर हॅनसन व रॉबर्ट जे. शीलर असे हे तिघे अर्थशास्त्रज्ञ आहेत. यातील पॅमा हे बोस्टन विद्यापीठात तर हॅनसन हे शिकागो विद्यापीठात व शीलर हे येल विद्यापीठात प्राध्यापक आहेत. या तिघांनी मिळून मालमत्ता किंमतीचे विश्ेषण हे संशोधन केले आहे.
अमेरिकेतील भांडवलशाही सध्या अनेक अडचणींचा सामना करीत आहे. तेथील भांडवल बाजाराने गेले तीन वर्षे काही डोके वर काढलेले नाही. अशा पार्श्‍वभूमीवर या मालमत्ता किंमतीच्या विश्‍लेषणाला नोबेल मिळावे हा काही निव्वळ योगोयोग नाही. अर्थात अर्थशास्त्रावरील नोबेल पारितोषिकात अमेरिकेचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. परंतु या वर्षी खास करुन अमेरिकी अर्थव्यवस्था अडचणीत असताना शेअर बाजारातील संशोधनाला हे पारितोषिक मिळणे याला विशेष महत्व आहे. तसे पाहता शेअर बाजार हा एकूणच अस्थिरतेचा खेळ आहे. एखाद्या कंपनीचा शेअर वधारतो त्यामागे काही ठोस कारणच असेल असे नाही. सकाळी एखाद्या कंपनीचा शेअर वधारला तर तो नंतर बाजार संपतेवेळी घसरुही शकतो. अनेकदा बाजारात सट्टेबाज सक्रिय असल्याने त्यांच्या कलावर बाजाराची दिशा अवलंबून असते. परंतु ही स्थिती कायमच असते असे नाही. कधीही नेमकी उलटीही असू शकते. परंतु या तिघा अर्थसास्त्रज्ञांनी यातून सुवर्णमध्य काढून एक नवा सिध्दांत मांडला आहे आणि त्याचे जगातील गुंतवणूकदारांनी कौतुक केले आहे. त्यांच्या मते, शेअर बाजारात तुम्ही जर दीर्घकाली गुंतवणूक केलीत व त्याचे योग्य नियोजन केलेत तर तुम्हाला काही प्रमाणात निश्‍चित लाभ मिळू शकतो. खरोखरीच शेअर बाजारात निश्‍चित लाभ मिळू शकतो का ? असा अनेकांच्या मनात प्रश्‍न निर्माण होईल. परंतु प्रयोग व प्रदीर्घ काळ केलेले संशोधन यातून या तिघा शास्त्रज्ञांनी सिध्द करुन दाखविले आहे. समभाग, रोखे व मालमत्तांच्या किंमती किती खाली वा वर जातील याचे काही स्थूल आखाडे असतात. बाजार वर जाणे व कोसळणे ही प्रक्रिया समजली तर तुम्ही फार मोठ्या आर्थिक संकटात पडणार नाहीत याची हमी मिळू शकते. रोखे, समभाग यांच्या किंमतीचा अंदाज अल्पकाळासाठी बांधणे कठीण असले तरीही दीर्घकाळासाठी हा अंदाज बांधता येऊ शकतो हे या तिघा शास्त्रज्ञांनी दाखवून दिले आहे. एकाद्या कंपनीच्या समभागाच्या किंमतीबाबतचा अती आशावाद किंवा इतर मानसशास्त्रीय घटक यात महत्वाचे ठरतात. हीतसंघर्ष, संस्थांत्मक मर्यादा, जोखीमीबाबतचा दृष्टीकोन व गुंतवणुकीचा कालावधी अशा अनेक घटकांव्दारे तुम्ही तुमच्या मालमत्ताची भांडवलवृध्दी करु शकता. अर्थात शेअर बाजारातील यशस्वी गुंतवणूकदार हा नेहमीच दीर्घकालीन गुंतवणूक करणारा ठरला आहे. अल्पकालीन सट्टा खेळणार्‍याच्या भांडवली लाभावर अनेक मर्यादा येतात. त्यामुळे या तिघांनी मांडलेली ही शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी गीताच आहे. अशा या गीतेला  आता नोबेल पुरस्कार बहाल झाला आहे. अमेरिकेतील भांडवलशाहीचा डोलारा अनेक घटकांवर अवलंबून आहे, त्यातील भांडवली बाजार हा एक महत्वाचा टेकू. या टेकूला अधिक मजबूत करणारे ठोकताळे या अर्थशास्त्रज्ञांनी मांडले आहेत.
-----------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel