-->
मान्सूनची परतीची वाट?

मान्सूनची परतीची वाट?

गुरुवार दि. 14 सप्टेंबर 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
मान्सूनची परतीची वाट?
दरवर्षीप्रमाणे यंदाही मान्सून सप्टेंबर महिन्यांच्या मध्यानंतर परतीच्या वाटेवर लागेल असे दिसते. यंदा पाऊस बहुतांशी भागात चांगला पडला आहे. उत्तरेतील व ईशान्येकडील काही राज्यात तर पूरस्थिती निर्माण झाली होती. मुंबईत विक्रमी पाऊस पडल्याने मुंबईचे जनजीवन ठप्प झाले होते. संपूर्ण कोकणात समाधानकारक पाऊस पडला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा सरासरी पाऊस अपेक्षित होता व कोकणात सरासरीपेक्षा पाच टक्के पाऊस जादा पडेल अशी अपेक्षा होती. अद्याप त्यासंबंधीचे आकडेवारी प्रसिध्द होण्यास काळ लागेल परंतु पावसाने आपले उद्ष्टि दवळपास गाठले आहे असे म्हणावयास काही हरकत नाही असे दिसते. सध्या राजस्थानच्या पश्‍चिम भागात अजूनही पाऊस पडत आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या परतीचा प्रवास छोडासा उशिराने होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. येत्या पाच ते सहा दिवसांत तरी मॉन्सूनच्या परतीचा प्रवास होण्याची शक्यता कमी आहे. पुढील आठवड्यात, सोमवार नंतर या भागातील पाऊस थांबल्यानंतर मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. देशात साधारणपणे एक सप्टेंबर रोजी परतीचा प्रवास होण्याचा अंदाज असतो. दरवर्षी सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापासून परतीचा प्रवास सुरु होतो. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कोकणासह देशाच्या वायव्य भागात कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. ही स्थिती अजून पाच ते सहा दिवस राहील. मध्यप्रदेश, छत्तीसगड, त्रिपुरा, उत्तराखंड, गुजरात, झारखंड या भागांतही पाऊस पडत आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या परतीला अनुकूल स्थिती अजून तरी तयार झालेली नाही. परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर वार्‍याची दिशा बदलून ती उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. त्या वेळी राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाना या भागांतील पाऊस थांबतो. त्या वेळी उत्तरेकडील हवेचा दाब वाढलेला असतो. तर दक्षिणेकडील हवेचा दाब कमी असतो. त्याच वेळी ईशान्येकडील हवेचा दाब जास्त असल्याने वारे ईशान्येकडून बाष्प घेऊन दक्षिणेकडे येतात. टप्याटप्याने हे वारे दक्षिणेकडे सरकल्याने मॉन्सूनचा परतीचा पाऊस सुरू होतो. महाराष्ट्राच्या पूर्व भागाकडील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र या भागांत परतीचा पाऊस चांगला पडतो. कोकणात हा पाऊस कमी होतो. दक्षिणेकडील तमिळनाडूच्या भागात हा परतीचा पाऊस नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरपर्यंत सुरू असतो. गेल्या दहा वर्षांतील पावसाचा परतीचा प्रवास लक्षात घेतला असता, 2013 मध्ये नऊ सप्टेंबर रोजी परतीचा प्रवास सुरू झाला होता. त्यानंतर 2015 मध्येही चार सप्टेंबर रोजी परतीचा प्रवास सुरू झाला होता. यंदा 18 सप्टेंबरनंतर पोषक हवामान झाल्यास परतीचा प्रवास सुरू होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला आहे. यंदा मात्र पाऊस चांगला दिलासा देऊन परतीचा मार्ग गाठणार आहे, हे नक्की.

0 Response to "मान्सूनची परतीची वाट?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel