-->
कापसाच्या लागवडीत वाढ

कापसाच्या लागवडीत वाढ

गुरुवार दि. 14 सप्टेंबर 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
कापसाच्या लागवडीत वाढ
भारतात यंदा कापूस लागवडीखालील क्षेत्रात मागील वर्षापेक्षा 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जागतिक पातळीवरील विचार करता कापसाचे लागवड क्षेत्र संपूर्ण जगातच वाढले आहे. तोच कल आपल्याकडेही दिसतो. आतापर्यंत आपल्याकडे 12.1 दशलक्ष हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. देशात सरासरी कापूस लागवडीचे क्षेत्र 11.31 दशलक्ष हेक्टर आहे. देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक महाराष्ट्रात यंदा 10.6 टक्के जास्त लागवड झाली आहे. 4.2 दशलक्ष हेक्टरवर लागवड झाली आहे. दुसर्‍या क्रमांकाच्या कापूस उत्पादक गुजरातमध्येही 10.5 टक्के जास्त लागवड झाली. या राज्यात कापसाखालील क्षेत्र 2.6 दशलक्ष हक्टरवर गेले आहे; तर तिसर्‍या क्रमांकाच्या तेलंगणात 1.86 दशलक्ष हेक्टरवर लागवड झाली. यंदा सरकारने 35.50 दशलक्ष गाठी उत्पादनाचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवले आहे. मागील वर्षी 32.58 दशलक्ष गाठी उत्पादनाचे उद्दिष्ट होते. त्यात यंदा सरकारने वाढ केली. जगातील कापूस पीकक्षेत्रात वाढ झाल्याने यामुळे यंदा जगातील कापूस उत्पादन वाढून ते 25.14 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याच अंदाज आहे. जगात यंदा कापसाचा वापर 25.12 दशलक्ष टन राहील. जगातील कापसाचा शिल्लक साठा 18.56 दशलक्ष टन राहणार आहे. चीनमधील कापूस साठ्यात 16 टक्क्यांनी घट होऊन तो 8.9 दशलक्ष टन राहील. चीनमधील कापूस विक्रीचा जागतिक स्तरावरील कापसाच्या किमतीवर परिणाम होतो. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस आयात केली जाते. जगातील एकूण साठ्यापैकी अर्धा कापूस साठा चीनमध्ये करून ठेवला जातो. यंदा जगातील कापूस लागवड क्षेत्र नऊ टक्क्यांनी वाढून 31.9 दशलक्ष हेक्टरपर्यंत पोचले आहे. तर यंदा प्रतिहेक्टरी उत्पादन 789 हेक्टरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. भारत, अमेरिका व चीन या प्रमुख कापूस उत्पादक देशातील उत्पादन यंदा वाढणार आहे. अशा वेळी कापसाचे दर हे चढते राहणार नाहीत. त्याचा तोटा शेतकर्‍यांना होणार आहे. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी हा प्रामुख्याने कापूस उत्पादक आहे. त्यामुळे कापसाला चांगला दर मिळाला नाही तर आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याचा धोक आहे. भविष्यातील या बाबींचा विचार करुन सरकारने आतापासूनच त्याचे नियोजन करण्याची गरज आहे.
------------------------------------------------------------

0 Response to "कापसाच्या लागवडीत वाढ"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel