-->
साधूंच्या उलट्या बोंबा

साधूंच्या उलट्या बोंबा

शुक्रवार दि. 15 सप्टेंबर 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
साधूंच्या उलट्या बोंबा
अखिल भारतीय आखाडा परिषद ही देशातील साधुसंतांची सर्वोच्च संघटना असल्याचा दावा त्यांच्यातर्फेच केला जातो. अर्थात याला काही अधिकृत दुजोरा नाही. ज्याप्रमाणे शिरोमणी गुरुव्दारा प्रबंधक समिती ही शीखांची धार्मिक संघटना आहे, त्याधर्तीवर आखाडा परिषदेला बिल्कूल स्थान नाही. या संघटनेत देशातील 14 प्रमुख आखाडे आहेत, त्यांनी आपली परिषद स्थापन केली आहे. खरे तर नव्वदीच्या दशकात भाजपाने हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरल्यावर ही आखाडा परिषद प्रकाशझोतत आली. त्यापूर्वी तिचे अस्तित्वही मर्यादीतच होते. रामजन्मभूमी आंदोलनात सकल हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपने या आखाड्यांना राजकारणात ओढले आणि या आखाड्यांची स्वत:ची अशी राजकीय ताकद निर्माण होत गेली. तोपर्यंत या आखाड्याचे स्वरुप हे पूर्णपणे धार्मिकच होते. साधु-संतत्वाचा मार्ग स्वीकारूनही या आखाड्यातील संतांना सत्तेचा व मायेचा मोह काही सोडवता आलेला नाही हे अनेक घटनांवरुन आपल्याला दिसले आहे. नुकतीच या आखाडा परिषदेने देशातील 14 भोंदूबाबांची एक यादी जाहीर केली असून या भोंदूबाबांवर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अर्थात आखाडा परिषदेने अशा प्रकारची घोषणा करणे म्हणजे साधूंच्या उलट्या बोंबा असेच म्हणावे लागेल. या चौदा जणांच्या यादीतील चार जण तर सध्या जेलची हवा खात आहेत. ज्यावेळी गेल्या चार वर्षात या बाबा-बुवांना अटका झाल्या त्यावेळी हे आखाडे का गप्प होते? त्याहून सर्वात महत्वाचे म्हणजे आखाड्यांनी जाहीर केलेली यादी ही एक हिमनगाचे एक टोक म्हटले पाहिजे कारण यातील अन्य बाबा-बुवाही बोगस आहेत. त्याशिवाय अनेक बाबा हे लोकांच्या भावनेला हात घालून त्यांची राजरोसपणे फसवणूक करीत आहेत, त्यांच्याबाबतीत मात्र त्यांनी जाणूनबुजून मौन राखले आहे. लोकांच्या भावनेला हात घालून त्यांचा गैरफायदा घेणार्‍यात यातील आखाड्यातील काही साधू असण्याचाही शक्यता नाकारता येत नाही. त्याहून सर्वात महत्वाचा प्रश्‍न म्हणजे असा प्रकारच्या बुवांची नावे जाहीर करण्याचा अधिकार या आखाड्यांनाच दिला कोणी हा सवाल देखील आहेच. सध्या देशात या बाबा-बुवांचे साम्राज्य व प्रभाव एवढे पसरले आहे की, यातील खरे किती आहेत हे शोधावे लागेल. उलट तेच तपासणे सोपे आहे. कारण बहुतांशी बाबा बोगसच आहेत. टी.व्ही.वर यातील अनेक बाबा जाहीरपणे लोकांना अंधश्रध्येचे बळी ठरवून बँकेत पैसे जमा करण्याचे आवाहन करीत असतात. त्यांच्याविरोधात कोणी शासकीय यंत्रणा का उभी राहात नाही हा देखील सवाल आहे. अशा बोगस, बनावट बाबांची सध्या चलती आहे. कारण लोकांच्या भावनेला हात घालून ते त्यांच्या जीवाशी खेळत असतात. समाजातील आया-बहिणींची इज्जर सर्रासपणे लुटत असतात. नंतर आसाराम बापू असो किंवा राम रहिम असो त्यांचे कारनामे प्रसिद्द होतात. मात्र गेली कित्येक वर्षे या सर्व बाबी बिनबोभाटपणे सुरु होत्या. काही बाबतीत तर लोकांचा त्यांना उघडपणे पाठिंबाच होता असे म्हणता येईल. अनेक अंधश्रध्दांच्या विरोधात लढणार्‍या डॉ. दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या जातात आणि गेल्या चार वर्षात त्यांचे मारेकरी सापडत नाहीत, ही एककीकडे खेदजनक बाब असताना दुसरीकडे मात्र बोगस बाबांचे पेव फुटले आहे. या अशा भोंदूबाबांची सध्याच्या समाजातील लोकप्रियता, त्यांचे हजारोंच्या संख्येतील भक्तगण व त्यांची स्वत:ची तयार झालेली जहागिरी आखाडा परिषदेच्या डोळ्यात खुपत असावी. आखाडा परिषदेतील साधूंचे कारनामे या भोंदूबाबांच्या तुलनेत कमी असले तरी विविध आखाड्यांचेही स्वत:चे सुभे, जहागिर्‍या अशी आर्थिक सत्तास्थाने प्रबळ आहेत. प्रत्येक आखाड्याच्या स्वत:च्या शेकडो एकर जमिनी आहेत, त्यांचे स्वत:चे कायदेकानून, नियम आहेत. एखाद्या आखाड्याचा प्रमुख महंत बनणे हे म्हणजे एखादा लोकप्रतिनिधी होण्यासारखे असते. आपल्या समर्थकांना भुलवणे व दांडगाईने आखाड्याचा कारभार हाती घेणे याच्या अनेक कथा आहेत. अशी पार्श्‍वभूमी असताना आखाडा परिषदेने 14 भोंदूबाबांवर सरकारने कारवाई करावी ही मागणी केली आहे. यामागचे आणखी एक कारण म्हणजे बाबांचे फेव वाढल्यामुळे आखाड्याचे जे महत्व कमी होत चालले आहे, त्याचीही त्यांना चिंता असावी. आपल्याकडे श्रद्धा व अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा पुसली आहे. त्याचा फायदा अनेकवेळा घेतला जातो. यातून बाबा-बुवांचा उदयोग फैलावला आहे. या उद्योगात आर्थिक व राजकीय हितसंबंधांचे एक जाळे तयार झाल्याने त्याचाच फायदा त्यांना मिळतोच. धर्मसत्तेवर आपला अंकुश असावा, अशी आखाड्यांची छुपी भूमिका आहे. याला भाजपाने गेल्या दोन दशकात खत पाणी घातले आहे व कऑग्रेसनेही आपल्या हाती सत्ता असताना त्यांच्यावर वचक ठेवला नाही. समाजाला त्याच्या आर्थिक, मानसिक उन्नतीसाठी स्थितिशील नव्हे तर क्रियाशील बनवणे हे आधुनिक समाजाचे लक्षण असते. आधुनिक संतांकडून तशा कामाची अपेक्षा आहे. आखाडा परिषद वा भोंदूबाबा हे काही समाजाच्या आध्यात्मिक प्रगतीचे मार्गदर्शक नाही. त्यांच्याकडून जनतेचे भले नव्हे तर नुकसानच झाले आहे, हे विसरता येणार नाही. गेल्या काही वर्षात आपल्याकडे आर्थिक सुबत्ता आली त्याचबरोबर लोकांमध्ये अस्थर्य देखील आले. त्यातून फावले या बाबा व बुवांचे. आपल्याकडे आर्थिक सुबत्तेबरोबर समाजमन उंचावले असते, आपल्या समाजातील लोकांचा वैचारिक, सामाजिक स्थर उंचावला असता तसेच समानता आली असती तर या बाबा-बुवांचे फावले नसते. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. सध्याचे अनुभव लक्षात घेऊन त्यांच्यापासून चार हात राहणे दूरच चांगले ठरणार आहे.
---------------------------------------------------------------

0 Response to "साधूंच्या उलट्या बोंबा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel