-->
संपादकीय पान-चिंतन--१५ ऑक्टोबर २०१३ साठी
--------------------------
पवारसाहेब, घोटाळेखोरांना किती पाठीशी घालणार?
-------------------------
देशाचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या रायगड जिल्ह्याच्या धावत्या दौर्‍यात उद्घाटनांचा सपाटा लावला होता. पवारसाहेब आपल्या भाषणात काय बोलणार? याकडे सगळ्याच महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. कारण दोन दिवसांपूर्वीच समाजसेवक अण्णा हजारेंनी सहकारी साखर कारखान्यांच्या खरेदी-विक्री व्यवहारातील भ्रष्टाचारावर टीकेची झोड उठविली होती. परंतु पवारांनी घोटाळेखोरांची बाजू घेत अण्णांची अशा प्रकारे घोटाळ्याचा आरोप करणे ही त्यांची फॅशनच असल्याचे म्हटले. पवारांचे हे विधान म्हणजे उघडउघडपणे घोटाळे करण्याची बाजू घेणे आणि त्यांची पाठराखण करण्याचा प्रकार आहे. अण्णांची जर घोटाळ्याचा आरोप करण्याची फॅशन असेल तर राष्ट्रवादीची घोटाळे करण्याची फॅशन आहे, असेच पवारसाहेबांना म्हणायचे आहे काय? अण्णांनी केलेले आरोप ही फॅशन आहे असे आपण एकवेळ शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे गृहीत धरले तरीही अण्णांनी केलेले आरोप किती गंभीर आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. जे साखर कारखाने बँकांकडे गहाण होते ते बँकांनी विकणे आपण समजू शकतो. परंतु उत्तम चालत असलेले साखर कारखाने एकाद्या वर्षातच मुद्दाम तोट्यात आणून विकण्याचा प्रकार हा निव्वळ भ्रष्टाचार आहे. सहकार क्षेत्रातील मुरब्बी असलेल्या शरद पावारांना याची काहीच माहिती नाही असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल. सहकारी साखर कारख्यान्यांत सध्या जो भ्रष्टाचार चालू आहे तो म्हणजे सहकाराच्या नावाने चाललेला स्वाहाकार आहे. हे जाणते व मुरब्बी राजकारणी असलेल्या शरदरावांच्या लक्षात येत नाही असे समजणे चुकीचे ठरेल. याचाच अर्थ स्पष्ट आहे की, पवारसाहेबांना आरोपी कोण आहेत त्याची पूर्ण कल्पना आहे. परंतु ते आरोपींच्या चुकांवर पांघरुण घालून त्यांच्याच खांद्याला खांदा लावून पक्ष चालवित आहेत. अशा प्रकारे या आरोपींच्या गुन्ह्यांवर कितीही पांघरुण घातले तरी जनतेला मात्र हे वास्तव समजते. साखर कारखान्यांच्या या घोटाळ्याप्रमाणे जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांच्यावर करोडो रुपयांचा सिंचनात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याबाबत तर न्यायालयानेही तटकरे यांना व सरकारलाही वेळोवेळी फटकारले आहे. मंत्र्याविरुध्द चौकशी ही धीमेगतीनेच होणार त्यामुळे खरे तर मंत्र्यांने राजीनामा द्यावा अशी अपेक्षा होती. परंतु हे तटकरे महाशय आपल्या खुर्चीला चिकटून आहेत. अर्थातच ते पवारांच्या आशिर्वादानेच. या घोट्याळ्याची चौकशी धीमेगतीने होत असल्याने पुढील तीन महिन्यात याचा अहवाल देण्यास न्यायालयाने गेल्या आठवड्यातच सरकारला बजावले आहे. अशा प्रकारे न्यायालयाने आदेश दिल्यावर सरकारला आता या प्रकरणी चौकशीला गती देणे भाग पडणार आहे. सिंचन घोटाळ्यातला हा आरोपी पवारांच्या मांडीला मांडी लावून कोकण दौर्‍यात बसतो, याचा अर्थ काय समजायचा? पवारसाहेब लोकांच्या लाजेखातर तरी या कार्यक्रमात जाहीरपणे तटकरे यांना चिमटे काढतील, अशी असलेली अपेक्षाही फोल ठरली. सिंचन घोटाळ्यांच्या बरोबरीने पेण अर्बन बँकेच्या दिवाळखोरीमुळे जे हजारो नागरिक देशोधडीला लागले त्यांनाही पवारांकडून काही दिलासा मिळाला नाही. केवळ हीच नव्हे तर जिल्ह्यातल्या सर्व बुडीत बँका राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या. त्याबाबतही आपण केंद्रात काम करतो स्थानिक प्रश्‍नांची आपल्याला कल्पना नाही असे सोयीचे उत्तर देऊन पवारांनी बँक बुडविणार्‍यांनाही पाठीशी घातले. सर्वसामान्य लोकांची आयुष्यीच पुंजी लुटणार्‍या या आरोपींना कडक शिक्षा व्हायला पाहिजे. परंतु पवारांनी या सर्वांनाच संरक्षण दिले आहे. परंतु जनता दुधखुळी नाही. त्यांना यातील राजकारण बरोबर समजते आणि येत्या निवडणुकीत ते याचा हिसका दाखविल्याशिवाय राहाणार नाहीत.
---------------------------  

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel