-->
लोकसंख्यावाढीची चिंता

लोकसंख्यावाढीची चिंता

सोमवार दि. 19 ऑगस्ट 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
लोकसंख्यावाढीची चिंता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी स्वातंञ्यदिनी केलेल्या भाषणात मांडलेला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकसंख्यावाढीचा प्रश्‍न. आज आपल्याकडे विकास झपाट्याने न होण्याची जी अनेक कारणे आहेत त्यात लोकसंख्यावाढीचा मुद्दा महत्वाचा आहे. सध्या आपली लोकसंख्या सव्वाशे कोटींवर पोहोचली असून येत्या सात वर्षात आपण चीनला मागे टाकून जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचणार आहोत. आपली ही लोकसंख्येची गती रोखण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. आज आपल्याकडे या जनतेला द्यायला अन्नधान्य जरुर आहे. कारण हरित क्रांतीनंतर आपण अन्धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो आहोत. माञ या जनतेला केवळ अन्नधान्य देण्याने प्रश्‍न सुटणारे नाहीत. तर त्यासाठी प्रत्येकाचा जीवनस्तर उंचावयास हवा. तसे करावयाचे असेल तर लोकसंख्या वाढीच्या या महास्फोटाला आवर घालावा लागेल. लोकसंख्यावाढीला जर आळा घालायचा असेल तर जनतेत शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे. जो समाज आपल्याकडे सुशिक्षित होत गेला त्याने लोकसंख्या नियंञणात ठेवली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, मुस्लिम समाज. हा समाज आता बर्‍यापैकी सुशिक्षीत होत असल्यामुळे त्यांची प्रजननाचे प्रमाण तब्बल 22 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यातुलनेत हिंदुंची प्रजननाचे प्रमाण केवळ 17 टक्क्यांनी कमी आहे. जैन, बौध्द यांच्यातही हे प्रमाण तब्बल 22 टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यामुळे केवळ मुस्लिम आपली लोकसंख्या वाढविण्यासाठी मुले काढतात ही स्थिती आता राहिलेली नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे त्यांच्यात वाढलेले शिक्षणाचे प्रमाण. हा सकारात्मक बदल शिक्षणाने केल्याचे दिसत असल्याने आपल्याला देशात शंभर टक्के साक्षरता साध्य करावी लागेल. 75 साली आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुञ संजय गांधी यांनी लोकसंख्या कमी करण्यासाठी सक्तीची नसबंदी करण्याचे सञ आरंभले होते. माञ याला मोठा विरोध झाला. संजय गांधी यांचा यामागे हेतू कितीही चांगला असला तरीही प्रत्येक गोष्ट सक्तीने साध्य होत नसते. त्यामुळे त्यांच्या या प्रयोगावर टिकाच झाली. चीनने देखील आपल्या देशातील वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी एक मूलाच्या सक्तीचा प्रयोग 90 च्या दशकापासून राबविण्यास सुरु केला. परंतु त्याचे काही वाईट सामाजिक परिणाम दिसू लागल्याने ही सक्ती त्यांनी आता काही प्रमाणात शिथिल केली आहे. त्यामुळे सक्तीने असे प्रयोग यशस्वी होत नाहीत आणि झालेच तर त्याचे काही सामाजिक परिणामही पहायला मिळतात. लोकंसख्यावाढीला आळा घालण्यासाठी त्यासंबंधीचे प्रबोधनही करण्याची सर्वात मोठी गरज असते. बरे याचा विचार हा धर्मनिरपेक्ष वृत्तीने करण्याची आवश्यकता असते. कोणत्याही एका धर्माला टार्गेट ठेऊनही हे करता कामा नये. त्यातून वातावरण गढूळ होण्याचा धोका असतो. त्याचबरोबर लोकसंख्यावाढीचा धर्माशी संबंध जोडता कामा नये. खासदार साक्षी महाराज वारंवार हिदुंची लोकसंख्या वाढण्यासाठी त्या धर्मियांनी जास्त मुले जन्माला घालावीत असे अतिरेकी आवाहन करीत असतात. या वाचाळ नेत्यांनाही सत्ताधारी भाजपाने आवर घातला पाहिजे. लोकसंख्यावाढीचा जसा धोका आहे त्याप्रमाणे पुरुष व स्ञियातील व्यस्त होत जाणारे प्रमाण हा देखील चिंतेचा विषय आगामी काळात होणार आहे. उत्तराखंड, हरयाणा, दिल्ली, राजस्तान, गुजरात या राज्यात मुलींचे प्रमाण झपाट्याने घसरले आहे. त्यामुळे या राज्यात विविध असमतोलाचे प्रश्‍न उपस्थित होत आहेत. आपल्याकडे राष्टीय पातळीवर प्रत्येक हजारी महिलांचे प्रमाण 929 एवढे घसरले आहे. त्यातुलनेत जगातील हे प्रमाण 980 आहे. आता हा धोका दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. कारण आय.व्ही.एफ. तंञजानाने केलेल्या गर्भधारणेत आता लिंग ठरविता येणार आहे. त्यामुळे नजिकच्या काळात मुलींचे प्रमाण आणखी घसरल्यास आश्‍चर्य वाटता कामा नये. लोकसंख्यावाढीच्या स्फोटाला आळा घालताना हे सर्व प्रश्‍न विचारात घ्यावे लागणार आहेत. 2060 सालापर्यंत भारताची लोकसंख्या 165 कोटींच्यापुढे जाण्याचा अंदाज आहे. तसे झाल्यास भारतापुढे अनेक आव्हाने आ वासून उभी राहातील. एकीकडे युरोपासारख्या विकसीत देशांत लोकसंख्या वाढविण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत असते. कारण तिथल्या लोकसंख्यावाढीचा वेग अल्प आहे. तर आपल्याला लोकसंख्येच्या वाढीला आळा घालावा लागत आहे. अशा प्रकारे आपल्याला जगातील ही दोन टोक पहायला मिळतात. भविष्यात जर आपल्याला विकास झपाट्याने करावयाचा असेल तर लोकसंख्येला आळा घालावाच लागे. त्यासाठी साक्षरता वाढली पाहिजे. तसेच मुले आणि मुलींमध्ये समानता आली पाहिजे. ही समानता आपल्याकडे कागदावर आहे. परंतु ती जनमानसात रुजल्याशिवाय त्याचे दृष्य परिणाम दिसणार नाहीत. लोकसंख्यावाढीला आळा घालत असताना या सर्व बाबी समांतर चालल्या पाहिजेत तरच हे उदिष्ट साध्य होऊ शकते. गेल्या काही वर्षात आपल्याकडे जननक्षमता घसरत चालली आहे ही सकारात्मक बाब आहे. माञ नियोजनात्मक आखणी करुन आपण लोकसंख्यावाढीचा हा धोका सौम्य करु शकतो. केवळ भाषणाने नाही तर त्यासाठी पध्दतशीर प्रयत्नांची आवश्यकता आहे.
-----------------------------------

0 Response to "लोकसंख्यावाढीची चिंता"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel