-->
कॉँग्रेसला अच्छे दिन !

कॉँग्रेसला अच्छे दिन !

बुधवार दि. 12 डिसेंबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
कॉँग्रेसला अच्छे दिन !
पाच राज्यांच्या विधानसभांचे निकाल काहीसे अपेक्षीत व अनपेक्षीत असेच लागले आहेत. राजस्थानमध्ये कॉँग्रेसचे पुनरागमन होणार असे सर्व निवडणूकपूर्व चाचणी निकाल दर्शवीत होते. मध्यप्रदेशातही काटें की टक्कर अपेक्षीत होती तशीच झाली आहे. मात्र छत्तीसगढ मधील सर्वांचेच अंदाज खोटे ठरवून जनतेने तब्बल तीन निवडणुकांनंतर कॉग्रेसच्या बाजुने कौल दिला आहे. हा निकाल मात्र अनपेक्षीतच होता. येथील भाजपाचे असलेले जाळे व मुख्यमंत्री रमणसिंग यांची लोकप्रियता पुन्हा सत्ता खेचून आणेल असे बोलले गेले होते. परंतु हे सर्व अंदाज खोटे ठरवित दोन तृतियांश बहुमत पटकावून कॉँग्रेसचे सत्तेत दमदार पुनरागमन झाले आहे. कॉँग्रेसचे या निकालाच्या निमित्ताने कमबॅक झाले असून कॉँग्रेसच्या अच्छे दिनची सुरुवात झाली आहे व भाजपाचे आता बुरे दिन सुरु होतील असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे. आजवर असे म्हटले जात होते की, भाजपाला पर्याय कॉँग्रेस देऊ शकत नाही, परंतु हे खोटे आहे. कॉँग्रेसच एक समर्थ पर्याय देऊ शकते असे हा निकाल सांगतो. त्याचबरोबर बेधुंध झालेल्या हिंदुत्ववाद्यांना आता आवर घातला जाऊ शकतो, असा विश्‍वास जनतेत या निकालाच्या निमित्ताने येईल. या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर बुलंदशहरातील हिंसाचार, राम मंदिराच्या नामाचा सुरु केलेला जप यामुळे हिंदुंच्या मतांचे धृवीकरण होईल व त्याचा फायदा भाजपाला या राज्यात होईल हे सर्व अंदाज जनतेने खोटे ठरविले आहेत. राजस्थानात गेली सहा निवडणुका सत्तेची आदलाबदल होत आली आहे. तेथील जनता आपल्या प्रश्‍नांबाबत तेवढी सजग आहे. अपेक्षा पूर्ण होत नाही असे पाच वर्षात दिसताच सत्ताधार्‍यांना घरी बसविले जाते. यावेळी देखील तसेच होणार हा अंदाज खरा ठरला. राजस्थानात भाजपाचा व मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संपर्क पूर्णपणे तुटला होता. राज्य सरकारने दिलेली अनेक आश्‍वासने पाळली नव्हती तसेच वृत्तपत्र स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला होता. सत्तेचा माज तेथील सत्ताधार्‍यांना गेल्या पाच वर्षात आला होता व त्याचे फळ ते आता भोगत आहेत. कॉँग्रेससाठी या राज्यातील विजय महत्वपूर्ण होता. कारण उत्तरेतील एक महत्वाचे राज्य त्यांच्या पदरात पडले आहे. मध्यप्रदेश हा भाग म्हणजे भारताचे ह्ृदय असे म्हटले जाते. येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे फार मोठे जाळे आहे व याला छेद देणे कॉँग्रेसला तब्बल तीन निवडणुका जमले नव्हते. आता निसटते बहुमत मिळाले असले तरी कॉँग्रेसची ही कामगिरी कौतुकास्पद ठरावी. कॉग्रेसची या राज्यातील संघटना पूर्णपणे ढेपाळली होती. नेत्यांमध्ये गटबाजी होती. परंतु या सर्व नेत्यांना एकत्र आणत राहूल गांधींनी येथे मोठी मेहनत घेतली. कॉँग्रेसच्या सुस्तवलेल्या या पक्षसंघटनेला जागे करण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे. छत्तीसगढ हा भाजपाच्या बालेकिल्लाही कॉँग्रेसने तब्बल तीन निवडणुकांनंतर भेदला आहे. येथील यश हे अनपेक्षीत असेच आहे. येथील सर्व अंदाज खोटे ठरले. येथे पुन्हा भाजपाच सत्तेत येणार असे ठामपणाने बोलले जात होते. परंतु येथेे कॉँग्रेसने आश्‍चर्यकारकरित्या दोन तृतीयांश बहुमत मिळविले. येथील शेतकर्‍यांच्या धान पिकाच्या संदर्भात भाजपाच्या सरकारने फसवणूक केली होती. त्यांना अपेक्षीत दर दिला नाही, तो राग शेतकरी आपल्या मनात ठेऊन होते. मतपेटीतून हा राग व्यक्त झाला. मात्र हा राग शिडात भरण्याचे काम कॉँग्रेस नेतृत्वाने केले. मिझोराममध्ये कॉँग्रेसला पुन्हा यश लाभले नाही. तेथे मिझो नॅशनल फ्रंट सत्तेत आला आहे. तेलंगणा या देशातील सर्वात तरुण असलेल्या राज्यात टी.आर.एस.ने एक हाती सत्ता खेचली आहे. त्यांचे हे यश अपेक्षीतच होते. कॉँग्रसेने पाच पैकी तीन राज्ये आपल्या खिशात टाकून 2018 सालचा समारोप जोरदार केला आहे. एकूणच पाच राज्यातील विधानसभांचे निकाल पाहता कॉँग्रेसला अच्छे दिन येण्यास प्रारंभ झाला आहे, असे म्हणता येईल. अर्थातच याचे सर्व श्रेय कॉँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनाच जाते. गेल्याच वर्षी याच दिवशी त्यांनी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली होती. त्यावेळी पक्ष अतिशय संकटातून वाटचाल करीत होता. मात्र गेल्या वर्षात राहूल गांधी यांनी खूप मेहनत घेऊन पक्षाला जीवदान दिले आहे. आता एक वर्षानंतर त्यांना फळ मिळण्यास सुरुवात झाली आहे. आजचा कॉँग्रेसचा विजय हा पक्षाला व कॉँग्रेसजनांना तसेच सर्वधर्मसमभाव मानणार्‍यांचा एक मोठा विजय ठरावा. कारण साडेचार वर्षापूर्वी भाजपाने सत्तेत आल्यावर माज करीत कॉँग्रेसला संपविण्याचा व कॉँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा केली होती. परंतु ही घोषणा भारतीय जनतेला मान्य नाही असेच आजच्या निकालावरुन दिसते. अन्यथा त्यांनी आजचा विजय कॉँग्रेस पक्षाला दाखविला नसता. आपल्याकडे लोकशाहीत एका प्रबळ विरोधी पक्षाला एक महत्वाचे स्थान दिले आहे. प्रत्येकाला आपली विचारधारा बाळगण्याचा अधिकार देखील घटनेने दिला आहे. संपूर्ण भारत भगवा होऊच शकत नाही. सत्तेत असणार्‍याने विरोधी पक्ष संपविण्याची घोषणा करणे हेच मुळात लोकशाही विरोधी होते. यातून भाजपाची मानसिकता समजते. आता भारतीय जनता पक्षाचे फासे फिरु लागले आहेत, असेच या निकालावरुन म्हणावे लागेल. यापूर्वी गेल्या वर्षीच पंजाबमध्ये कॉँग्रेसने सत्ता काबीज केली होती. परंतु तसे पाहता हे राज्य लहान होते, त्यामुळे कॉँग्रेसचा विजय झाकोळला गेला होता. गुजरात राज्य मात्र कॉँग्रेसच्या हातून जरासाठी निसटले. किमान 20 आमदार हे 500 मतांच्या फरकाने पराभूत झाल्याने कॉँग्रेसला पराभव स्वीकारवा लागला. गुजरात भाजपासाठी व मोदी-शहा या जोडगोळीसाठी हा मोठा धक्का होता. खरे तर हा भाजपाचा विजयातला पराभवच होता. यातून धडा घेता आता कॉँग्रसने या पाच राज्यांसाठी व्यूहरचना आखली होती. ही व्यूहरचना म्हणजे, भाजपाच्या धोरणांवर टीका करणे व शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेकार तरुणांच्या मनातील असंतोष व्यक्त करणे. कुठेही वैयक्तीक पातळीवर करण्यात आली नाही. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विधवेच्या संदर्भात अगदी हिन विचार मांडून आपल्या वैचारिक दारिद्रयाचे दर्शन दिले. आज देशातील जनता अशा प्रकारचा विधवेचा अपमान सहन करीत नाही, हे निकाल सांगतात. सर्वात महत्वाचे म्हणजे, ज्या राहूल गांधींना पप्पू म्हणून संबोधले, हिणवले त्याच्याच नेतृत्वाखाली भाजपाला या राज्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. मोदीं-शहांना खरी भीती वाटते ती गांधी घराण्याचीच, हे यावरुन लक्षात येते. त्याच भीतीपोटी ते सतत राहूल गांधींना टार्गेट करीत होते. सोशल मिडियावर सर्वाधिक ट्रोलिंग राहूल गांंधींनाच ठरवून केले जात होते. असे असले तरीही राहूल गांधी कुठेही ढळले नाहीत, त्यांनी आपला विचार, आपल्या मनातील राग व्यक्त केला नाही. यातूनच त्यांचे परिपक्वपणा दिसला. पाच वर्षापूर्वीचे राहूल व आताचे राहूल याच बराच फरक झाला आहे. या विजयानंतर त्यांच्या नेतृत्वावर शिक्केमोर्तब पाच राज्यातील जनतेने म्हणजे 22 कोटी जनतेने केले आहे. या पाच राज्यातील 22 कोटी मतदारांना भाजपाच्या सरकारने काही ना काही तरी दिले आहे, असे मोठ्या गर्वाने शहा सांगत फिरत होते. परंतु या त्यांच्या योजना केवळ कागदावरच राहिल्या आहेत, केवळ त्याची जाहीरातबाजीच झाली आहे, हे जनतेने आता मताच्या कौलातून सांगितले आहे. आता या विजयानंतर कॉँग्रेस पक्षाला एक नवचैतन्य येणार यात काही शंका नाही. गेल्या लोकसभेच्या पराभवानंतर कॉँग्रेस पक्ष नैराश्येच्या गर्तेतून बाहेर पडत नव्हता. आता पक्षाला यातून बाहेर पडण्यास मोठी मदत होऊ शकेल, असे दिसते. भाजपाने गेल्या काही वर्षात आक्रमक प्रचार, अवाढव्य पैसा खर्च करुन जाहीरातबाजी, चॅनल्स ताब्यात घेणे, वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करणे हे प्रकार सर्रास केले होते. सरकारी योजनाबाबत असो किंवा कोणत्याही इतिहासातील संदर्भ याबाबत जोमाने खोटे बोलत केवळ आपलाच विचार रेटणे हे प्रकार ते किळसवाणे होते. कोणत्याही विरोधकाला डोके वर काढता येणार नाही याची सर्व खात्री भाजपा बाळगीत असे. देशातील प्रत्येक महत्वाच्या संस्था त्यांनी आपल्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताब्याखाली आणल्या आहेत. निवडणूक आयोग ही किती स्वायत्त संस्था असली तरीही तिचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले होते. परंतु अशा प्रकारे हुकूमशाही करण्याच्या प्रत्येक बाबीला मर्यादा असतात. आपल्याकेड लोकशाहीची पाळेमुळे एवढी जबरदस्त मुरलेली आहेत की, जनता कितीही सत्ताधार्‍यांबरोबर आपण आहोत असे बाहेरुन दाखवत असली तरीही दर पाच वर्षानंतर त्यांना सत्ताभ्रष्ट करण्याचा हिसका दाखविते. ही आपली लोकशाहीची ताकद आहे. प्रत्येक वेळी मते विकत घेता येत नाहीत, किंवा लोकांना भूलथापा घालून दरवेळी फसवताही येत नाही. धर्माच्या नावावर लोकांचे धृवीकरणे करुन सत्ता काबीज करता येते, पण ती केवळ त्या जोरावर टिकवता येत नाही, याचा धडा आता भाजपाने घ्यावयास हवा. मुस्लिम मतांचे धृवीकरण करुन कॉँग्रेसने यापूर्वी हा धडा घेतला आहे. या निकालानंतर लोकसभेच्या निवडणुका आता तोंडावर आल्या असताना विरोधकांची मोट बांधण्याच्या प्रयत्नांना वेग येईल. किंबहुना विरोधकांचे बळ आता वाढले आहे. त्यात कॉँग्रेस आता याचे नेतृत्व करण्यासाठी योग्य पक्ष आहे हे लोकांपुढे आले आहे. गेल्या काही वर्षातील मोदी सरकारवरची नाराजी व राज्यातील विद्यमान सरकारची निराशाजनक कामगिरी जनतेपुढे मांडून त्या विरोधाची हवा आपल्या शिडात भरण्यास कॉँग्रेस पक्ष यशस्वी झाला आहे, असे म्हणता येईल. आता याची जर पुनरावृत्ती लोकसभेच्या निवडणुकीत करावयाची असेल तर कॉँग्रेसला सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्रित घेऊन जावे लागेल. भाजपाचा पराभव एकटा कॉँग्रेस पक्ष करु शकत नाही, हे लक्षात घेऊन त्यांना आखणी करावी लागेल. विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या धर्तीवर लोकसभेचे निकाल लागत नाहीत, हे वास्तव स्वीकारुन लोकसभेला राष्ट्रीय प्रश्‍न हाताळावे लागणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या तीन राज्यांच्या विजयाची हवा डोक्यात जाऊ न देता बेसावध राहाता कामा नये, तरच भाजपाचा देश पातळीवर पराभव होऊ शकतो.

0 Response to "कॉँग्रेसला अच्छे दिन !"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel