-->
शुक्रवार दि. ८ फेब्रुवारीच्या अंकासाठी अग्रलेख
तरुणाईची ताकद वाढली
लोकसभेच्या निवडणुका होण्यासाठी आता जेमतेम तीन महिने शिल्लक आहेत. आपल्याकडील प्रत्येक राजकीय पक्ष आता निवडणुकीच्या लगीनघाईला लागला आहे. परंतु यावेळी एक महत्वाचा मतदार ठरणार आहे तो नवमतदार. गेल्या पाच वर्षात आपल्याकडे देशात सुमारे ९.७ कोटी तरुण नवा मतदार नोंद झाला आहे. ही आकडेवारी गेल्या वेळच्या तुलनेत पाहता १३.५ टक्क्‌यांनी वाढली आहेत. २०१४ सालच्या आकडेवारीनुसार, तामीळनाडू, हरयाणा, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यात झपाट्याने नव मतदार वाढला आहे. देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तरप्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. गेल्या पाच वर्षात या राज्यात १.८ कोटी मतदार वाढले आहेत. त्यामुळे आता या राज्यात एकूण मतदार हे १३.४४ कोटी एवढे झाले आहेत. म्हणजे पाकिस्तानच्या लोकसंख्येपेक्षाही उत्तरप्रदेशाचे मतदार जास्त आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्रात ७.९ कोटी मतदार आहेत. त्यानंतर पश्चिमबंगाल (६.२५ कोटी), आंध्रप्रदेश (६.२४ कोटी) व बिहार (६.२१ कोटी) या राज्यांचा क्रमांक लागतो. २००९ सालापासून दोन आकडी संख्येने मतदार वाढले अशा राज्यांच्या यादीत उत्तरप्रदेश (१५.५टक्के) सर्वात आघाडीवर आहे. त्याखालोखाल उत्तराखंड (१५.३टक्के), राजस्थान (१४.२टक्के), बिहार (१३.९टक्के), छत्तीसगढ (१३टकके), पंजाब (११.८टक्के) यांचा क्रमांक लागतो. हा जो मतदार वाढला आहे तो अर्थातच नवीन तरुण मतदार आहे. हा मतदार उत्साही आहे तसेच तो आपले कर्तव्य आहे असे समजून मतदान करतो. त्यामुळे त्याच्या मताला विशेष किंमत प्राप्त झाली आहे. हा नव मतदार मग तो शहरी असो किंवा ग्रामीण त्याच्या मनात मोठ्या इच्छा आहेत आणि त्याला यात ज्या पक्षाची साथ लाभणार त्याच्या बाजूने तो राहाणार हे नक्की. हा तरुण वर्ग टेक्नो सॅव्ही आहे. त्याचे प्रत्येकाचे फेसबुक अकाऊंट आहे, व्हॉटस् अपच्या माध्यमातून तो सर्व मित्रांशी संपर्कात असतो. अशा प्रकारे सोशल मिडियशी संबंधित असलेल्या या तरुण वर्गाला आपण आपल्याकडे खेचू शकतो असा अंदाज बांधून भाजपाने आपल्या प्रचाराचे मुख्य केंद्र सोशल नेटवर्किंगवर केंद्रीत केले आहे. परंतु आपण या जोरावर केवळ मते मिळवू शकतो हा त्यांचा भ्रम आहे. आजच्या तरुणांना त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारा पक्ष आपलासा वाटतो. धर्म, जातीच्या नावावर त्याची दिशाभूल करणे आता कोणलाच शक्य होणार नाही. कारण त्यांना भेडसाविणार्‍या प्रश्न यात प्रामुख्याने रोजगाराच्या प्रश्नाची सोडवणूक कोण करणार याबाबतीत त्यांना जास्त उत्सुकता आहे. आपला देश हा जगातील सर्वात तरुण देश आहे. आपल्या एकूण लोकसंख्येच्या ५० टक्केहून जास्त लोक तिशीच्या आतले आहेत. अशी परिस्थिती जगातील आज कोणत्याही देशात नाही. संपूर्ण युरोप हा म्हातार्‍यांचा देश झाला आहे. तिकडे जेवढ्यांना रोजगार आहे त्यापेक्षा जास्त पेन्शनर आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या तारुण्याचा गौरव वाटत असेल तर आपल्यावर त्यांची मोठी जबाबदारीही आहे. या तरुणाच्या हाताला काम देण्याचे आव्हान आपल्याला आहे. गेल्या दहा वर्षात कॉँग्रेसने रोजगार निर्मितीत फारशी प्रगती केलेली नाही. सध्या फक्त तरुणांना आकर्षित करण्यासाठी जाहीरातबाजीच करण्यात येत आहे. भाजपा हा गुजरातचे मॉडेल देशापुढे ठेवतो, परंतु गुजरातने रोजगार निर्मितीत काही फार मोठी प्रगती केलेली नाही, हे वास्तव कुणालाच नाकारता येणार नाही. गुजरात आज जे विकासाचे चित्र निर्माण करीत आहे तो विकास नसून भकास आहे. काही मोजके रस्ते चकाचक केल्याने सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारत नाही. गुजरातमध्ये विकास झाला असे एकीकडे ढोल बजावला जातो तर दुसरीकडे रोजगाराच्या संधी वाढलेल्या नाहीत असे अहवाल सांगतो. त्यामुळेच हा तरुण सध्याच्या या सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या कारभाराला विटला आहे असे चित्र आहे. परिमामी त्याने दिल्लीत आम आदमी पक्षाला मोठ्या प्रमाणात मतदान करुन कॉँग्रेस व भाजपाला पर्याय म्हणून त्या पक्षाला मतदान केले. देशपातळीवरील या दोन्ही पक्षांचा हा पराभव फार बोलका आहे. आम आदमी पक्षाचा मोठ्या संख्येने मतदार हा तरुण आहे. अशा प्रकारे देशातला तरुण एक वेगळा विचार करु लागला आहे. तीन महिन्यांपूर्वी दिल्लीत त्याने आपली चुणूक दाखविली आहे. आता आगामी लोकसभा निवडणुकीतही तो आपली ताकद खर्‍या अर्थाने दाखविल. आपल्याकडे आता ३५ कोटी एवढ्या मोठ्या संख्येने मध्यमवर्गीय आहे. हा मध्यमवर्गीय पूर्वी मतदानाला जाण्यापेक्षा पिकनिकला जाणे पसंत करीत असे. आता मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही. देशातील मध्यमवर्गीय हा जागृत झाला आहे. त्याला मतदानाचे महत्व पटले आहे. आपम आपल्या मताच्या जोरावर आपल्याला पाहिजे त्या सरकारला सत्तेवर आणू शकतो हे त्याला पटले आहे. मध्यमवर्गीय तरुण जो यावेळी नवमतदार म्हणून मतदान करायला पुढे येणार आहे त्याच्यात मनात सत्ताधारी कॉँग्रेस व विरोधी पक्ष भाजपा यांच्याविषयी असंतोष खदखदतो आहे. हा असंतोष यावेळी लोकसभा निवडणुकीत बाहेर पडणार आहे. त्यामुळे यावेळी मोठ्या संख्येने जो तरुण नव मतदार मतदानासाठी बाहेर पडणार आहे तो कोणाची बाजू घेतो त्यानुसार दिल्लीच्या तख्तावर पंतप्रधान बसणार आहे. तरुणांची ही ताकद कुणालाच नाकारता येणार नाही.
     

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel