-->
धक्कादायक घटना

धक्कादायक घटना

शनिवार दि. 24 मार्च 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
धक्कादायक घटना
गेल्या चार दिवसात देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. यातील पहिली घटना म्हणजे, तीन बांगला देशी घुसखोरांना दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस)ने पुणे परिसरातून अटक केल्यानंतर महाड येथून आणखी एक बांगलादेशी घुसखोराला पकडण्यात आल्याने बांगलादेशी घुसखोरांची पाळेमुळे महाडपर्यंत पोहोचली असल्याचे उघड झाले आहे. दुसरी घटना म्हणजे, अहमदनगर येथे कुरिअर कंपनीच्या कार्यालयात आलेल्या पार्सलचा झालेला क्रुड बॉम्बचा स्फोट. या दोघना म्हणजे महाराष्ट्र पुन्हा एकदा अतिरेक्यांच्या निशाण्यावर असल्याची चिन्हे दाखवितो. या दोन्ही घटना धक्कादायक असल्या तरी त्यातून बोध आत्ताच घेऊन अतिरेक्यांच्या कारवायांना आतच कसा अटकाव करता येईल ते पाहणे आवश्यक ठरणार आहे. अहमदनगर येथील झालेल्या स्फोटातील ते पार्सल पुण्याच्या सरहद्द या संस्थेचे संजय नाहर यांच्यासाठी आलेले होते, मात्र ते त्यांच्या पर्यंत पोहोचण्याअगोदरच त्याचा स्फोट झाला, म्हणजेच त्यांना यात टार्गेट करण्यात आले होते हे नक्की. अतिरेकी घटना व त्याची पाळेमुळे येथे राज्यत काही प्रमाणात असणे हे काही नवीन नाही. गेल्या काही वर्षात ही पाळेमुळे अनेकदा उघडही झाली आहेत. परंतु आजवर ती शहरापर्यंत मर्यादीत होती. आता मात्र महाडसारख्या ग्रामीण भागात ती पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. महाडमध्ये मुस्लिम वस्ती मोठ्या संख्येने असल्याने त्याबाबत विशेष चिंता व्यक्त झाली, ते स्वाभाविकच आहे. बांगलादेश सरकारने बंदी घातलेल्या अरसान उल्ल बांगला टीम (एबीटी) या दहशतवादी संघटनेशी लागेबांधे असलेल्या तीन बांगला देशी घुसखोरांना दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस)ने पुणे परिसरातून अटक केल्यानंतर महाड येथून आणखी एक बांगलादेशी घुसखोराला पकडण्यात आल्याने बांगलादेशी घुसखोरांची पाळेमुळे महाडपर्यंत पोहोचली असल्याचे उघड झाले. रायगड पोलीस आणि स्थानिक पोलीस मात्र याबाबत अनभिज्ञ होते, असे समजते. पुण्यातील आकुर्डी आणि वानवडीमध्ये तीन बांगला देशी नागरिक वास्तव्य करत असून त्यांचा बांगलादेशामध्ये बंदी घालण्यात आलेल्या एबीटी या संघटनेशी संबंधित असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे एटीएसचे सहाय्यक आयुक्त सुनील दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम जाधव यांच्या पथकाने पुण्यातील आकुर्डी आणि वानवडी येथून महमद हबीदउर रहमान हबीब उर्फ राज जेसुब मंडल, महमद रिपन होस्सेन आणि हन्नन अन्वर हुसेन खान या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून महाडमधील ही पाळेमुळे उघड झाली. कोकणात पूर्वी 92 च्या स्फोटातील स्फोटके किनारपट्टीवर उतरली होती. त्यानंतर कोकणात फारशा अतिरेकी घटनांची नोंद नव्हती. मात्र आता महाडमधील ही घटना पाहता चिंतेची बाब ठरणारी आहे. अहमदनगर येथे कुरिअरमार्फत पाठविल्या जात असलेल्या रेडिओसदृश वस्तूचा झालेला स्फोट हा क्रूडफ बॉम्बचा होता हे निष्पन्न झाल्याने हा घातपाताचा कट होता हे लक्षात येते. सरहद संस्थेचे संजय नहार यांच्या नावाने हे पार्सल पाठविले होते. त्यामुळे हा त्यांच्याच घातपाताचा कट होता हा प्राथमिक निष्कर्ष निघतो. राज्यात नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे या सामाजिक कार्यकर्त्यांची हत्या झाली. त्या प्रकरणांचा उलगडा आपली पोलीस यंत्रणा अद्याप करु शकलेली नाही. अशावेळी संजय नाहर यांच्यावर हल्ला करण्याचा कट असल्याचा संशय येणे हे देखील धक्कादायक म्हटले पाहिजे. पंजाब आणि काश्मीरच्या शांततेसाठी आयुष्य वाहून घेतलेल्या संजय नहार यांच्यासाठी कुणी बॉम्बची भेट पाठवावी ही बाब अनाकलनीय व यातनादायीही आहे. जेव्हा सत्तर, ऐंशीच्या दशकात पंजाब खलिस्तानी चळवळीत हिंसाचाराने धगधगत होता तेव्हा नहार यांनी पंजाबच्या शांततेसाठी शांतिमार्च काढला. तेथे जाऊन तरुणांशी संवाद साधला. पंजाब शांत झाला, तेव्हा त्यांनी काश्मीरच्या शांततेसाठी प्रयत्न सुरु केले. त्यासाठीच सरहद नावाची संस्था सुरू केली. काश्मीरच्या मुलांना व तरुणांना मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी ते सतत आग्रही आहेत. पूर्वी पंजाब व आता काश्मिरमधील अतिरेक्यांच्या हल्यात किंवा कारवाईत मारल्या गेलेल्यांच्या मुलांची अतिशय दैना होते. त्यांचा कधी कुणीच वाली राहत नाही. त्या निष्पाप मुलांचा तो काय दोष. त्या मुलांसाठी काही तरी करावे व त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणावे या हेतूने नाहर हे गेली दोन दशकाहून जास्त काळ आपले काम करीत आहेत. हे काम सोपे नाही, अनेक अडचमींवर मात करीत त्यांनी आपले हे काम निर्धमीपणाने सुरु केले आहे. या मुलांना त्यांनी संपूर्ण देश दाखविला, शिकविले, त्यांचे पुनर्वसन केले. स्वत:च्या शाळेत दाखल करुन घेतले. पुणे-काश्मीर फ्रेंडशीप, हिंदू पंडित-काश्मिरी मुस्लीम असे फोरम तयार केले. महाराष्ट्र व पंजाब यांच्यात सांस्कृतिक आदानप्रदान वाढविणारे घुमान हे महत्त्वाचे केंद्र पंजाबमध्ये आहे. घुमान ही संत नामदेव यांची कर्मभूमी. तेथे 88 वे मराठी साहित्य संमेलन व्हावे ही कल्पना व त्यासाठीचे परिश्रमही त्यांचेच होते. अशा या शांतताप्रिय माणसावर हल्ला करण्याचे कट रचणे हे न उलगडणारे कोडे आहे.
सौहार्द व शांततेसाठी नहार आग्रही असताना त्यांना ही स्फोटके कोण पाठवू इच्छिते आहे? याची पाळेमुले खणून काढणे गरजेचे आहे. त्यातून राज्यात नेमक्या अतिरेकी कारवाया कोणत्या दिशेने कार्यरत आहेत त्याचा अंदाज येऊ शकतो व भविष्यात आपण घातपाताची प्रकरणे रोखू शकतो.
--------------------------------------------------------

0 Response to "धक्कादायक घटना"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel