-->
सोशल मिडियाची   काळीकुट्ट बाजू

सोशल मिडियाची काळीकुट्ट बाजू

सोमवार दि. 26 मार्च 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
सोशल मिडियाची 
काळीकुट्ट बाजू
सोशल मिडिया भोवती कितीही आकर्षण व ग्लॅमर असलेतरीही त्या मिडियाची काळीकुट्ट बाजू आता जनतेपुढे आली आहे. अर्थात त्यामुळे सोशल मिडियावर बंदी आणणे असे म्हणून चालणार नाही तर या मिडियाच्या अनेक मर्यादा व त्यातील बनावट खाती या सर्वांचा विचार करता एकूणच या आभासी जगाबद्दल नव्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या मदतीने मिळवलेला विजय, ब्रेक्झिटवर ब्रिटनमध्ये झालेले मतदान या दोन घटना जगाच्या राजकारणाला वळण देणार्‍या ठरल्या. अमेरिकेसारख्या लोकशाहीवादी, उदारमतवादी देशात कट्टर उजव्या, धर्मांध राजकारणाचे नेतृत्व करणार्‍या ट्रम्प यांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद, तर दुसरीकडे वसाहतवादातून भांडवलशाही पसरवणार्‍या ब्रिटनने स्वत:चीच बाजारपेठ वाचवण्यासाठी संरक्षणवादी भूमिकेचे समर्थन करणे आणि त्यासाठी स्थलांतराविरोधातही आक्रमक भूमिका घेण्याने जगातील विचारवंत थक्क झाले होते. जगातील विकसीत जगात एवढी आत्मसंकुचीत वृत्ती कशी बळावली याचे आनेकांना आर्श्‍चय वाटलेही होती. अनेकांनी सध्याच्या प्रचलित राजकारण्यांना व त्यांच्या धोरणांवर दोषारोप केले होते. मात्र आभासी दुनियेच्या या जगात काही वेगळेच घडत होते. दोन दिवसांपूर्वी ब्रिटनमधील केंब्रिज अ‍ॅनालिटिका या डेटा कंपनीने ट्रम्प यांना अध्यक्षीय निवडणुका जिंकण्यात व ब्रिटनचे ब्रेक्झिटच्या बाजूने मत वळवण्यात फेसबुकवरच्या लाखो ग्राहकांची माहिती चोरली आणि त्यांना ट्रम्प व ब्रेक्झिटविषयी अनुकूल मत देण्यास प्रवृत्त केले हे उघड झाल्याने जगभर हलकल्लोळ माजला. या घटनेच्या निमित्ताने डेटा कंपन्यांची नफेखोरी व फेसबुकचा कावेबाजपणा उघड झाला. शिवाय सोशल मीडियाची एक काळीकुट्ट बाजू जगापुढे आली. या आभासी जगातील असत्य धाग्यांनी विणले गले असून त्यात जगातील जनता गुरफटली गेल्याचे आढळले होते. अर्थात गेल्या वेळच्या 2014 सालच्या निवडणुकीतही आपल्या देशात सोशल मिडियाने महत्वाची भूमिका पार पाडली हे काही छुपे राहिलेले नाही. 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर येण्यामागच्या अनेक कारणांपैकी सोशल मीडियातील भाजपचा खर्‍या-खोट्याचा घणाघाती प्रचार हे एक महत्त्वाचे कारण होते. तसेच त्यावेळी सत्ताधारी असूनही कॉग्रेस पक्षाने सोशल मिडीयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेत्रदीपक विजयानंतर अमेरिकेच्या भेटीत फेसबुकच्या कार्यालयाला भेट देऊन या कंपनीचे कौतुकही केले होते, याची आता आठवण होते. नवीन तंत्रज्ञानाच्या आधारावर ग्राहकांची माहिती चोरून राजकीय पक्ष मतदारांवर आपला प्रभाव पाडण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात याचा अनुभव आपल्याला पहिल्यांदा आला. अमेरिकेत मात्र सोशल मिडियाच्या प्रभावाखाली झालेली ट्रम्प यांची दुसरी निवडणुक होती. राजकीय पक्ष आपल्या प्रचारात सर्रास खोटेपणाचा अवलंब करतात. त्यांचा उद्देश काही करुन निवडणूक जिंकमे हाच असतो. सोशल मीडियातून खरे वा खोटे यातील सीमारेषा पूर्णत: पुसून केवळ खोटी माहिती मतदारांच्या माथी मारली जाते, ही घटना लोकशाहीला मारक ठरणारी आहे. आता मात्र अमेरिकेतील निवडणुकीत फेसबुकचा डेटा वापरण्यात आल्याच्या रिपोर्टवर चिंता व्यक्त करताना फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्ग याने आमची कंपनी भारतासहित जगभरातील निवडणुकांमध्ये अखंडत्व राखण्यासाठी बांधिल आहे असे सांगितले आहे. झुकेरबर्गने रशियासारख्या देशांनी अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे मान्य केले. आमच्या हातून काही चुका झाल्या आहेत. पण त्या सुधारण्यासाठी आम्ही उपाययोजना देखील राबवल्या आहेत, असे झुकेरबर्गने म्हटले आहे. पुन्हा असे प्रकार होणार नाही, असे आश्‍वासनही त्याने युजर्सना दिले आहे. भारतात पुढील वर्षी मोठी निवडणूक होत आहे, ब्राजिलमध्येही निवडणूक आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये महत्वाच्या निवडणुका पार पडणार असून या निवडणुकांचे अखंडत्व फेसबुकर सुरक्षित राहिल ही आमची जबाबदारी असून यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करु, असे मार्क झुकेरबर्गने सांगितले आहे. अनेक देशांमधील निवडणूक प्रक्रियेत बाहेरील गोष्टींचा प्रभाव पडू नये यासाठी फेसबुकने काय उपाययोजना केल्या आहेत या प्रश्‍नावर बोलताना मार्क झुकेरबर्गने ही माहिती दिली. परंतु आता त्यांच्यावर विश्‍वास कोणी ठेवेल का, असा सवाल आहे. फेसबुकचा प्रसार वाढत होता, तेव्हा हे माध्यम जगाच्या कानाकोपर्‍याला जोडणारे, लोकशाही सशक्त करणारे म्हणून जगापुढे आले होते. त्यात फेसबुक, ट्विटर, रेडिट, व्हॉट्सअ‍ॅप या माध्यमांनी ट्युनिशिया, इजिप्तमधील हुकूमशहांची राजवट उलथवण्यात सिंहाचा वाटा उचलल्यामुळे या माध्यमातील ताकदीचा प्रत्यय जगापुढे आला. सिरियातले गृहयुद्ध, स्थलांतरितांची असहायता, इसिसची नृशंस हत्याकांडे यांच्या सोशल मीडियातील बातम्यांनी जग हेलावून जात होते. पारंपरिक माध्यमांना समांतर माध्यम म्हणून सोशल मीडियाकडे पाहिले जात होते. त्यामुळे त्याचे आकर्षण वाढत जाऊन लाखो लोक या माध्यमाचा भाग झाले. परंतु खोटी माहिती, अफवा या खर्‍याच आहेत, तेच सत्य आहे हे बिंबवण्याचे डेटा कंपन्यांचे कारस्थान आता उघड झाले. डिजिटल युगात माहिती कंपन्यांचे भांडवल आहे व त्यावर अब्जावधी डॉलरची इंडस्ट्री उभी आहे. या कंपन्या माहितीची चोरी करून आपल्याच आकांक्षांशी प्रतारणा करत असतील तर त्यातून अराजकच निर्माण होईल; त्याची जबाबदारी फेसबुक घेत नाही. एकूणच सोशल मिडियाच्या आभासी जगाबद्दल भ्रमाचा भोपळा आता फुटला आहे. त्याची काळी बाजू जनतेपुढे आली आहे. याचा अर्थ हे माध्यम वाईट आहे असे नव्हे. मात्र त्यांना आता नियमनाकाली आणण्याची गरज निर्माण झाली आहे.
-------------------------------------------------------

0 Response to "सोशल मिडियाची काळीकुट्ट बाजू"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel