-->
आत्महत्यांचे पेव

आत्महत्यांचे पेव

मंगळवार दि. 27 मार्च 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
आत्महत्यांचे पेव
गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न एकाने केला. अशा प्रकारे मंत्रालयासमोर किंवा मंत्रालयाच्या आवारात आत्महत्या करण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यात वाढले आहेत. आजवर आपल्याकडे शेतकर्‍यांच्या आतमहत्याच गाजत होत्या. परंतु आता मंत्रालयातील आत्महत्या हा एक चर्चेचा विषय झाला आहे. अर्थात आत्महत्या माणूस हा त्यांच्यात ज्यावेळी अगतीकता येते, सर्वच दरवाचे बंद होतात व तो आपल्यापुढील समन्यांचे निवारण होत नाही असे त्याला जाणवते त्यावेळीच तो शेवटचा उपाय म्हणून आत्महत्या करण्यास धजावतो. गेल्या पंधरा दिवसापूर्वी पुण्यातील एकाने जी.एस.टी. कराच्या ओझ्यामुळे धंदा संपुष्टात आल्यामुळे आत्महत्या केल्याची बातमी आली होती. एकूणच समाजात सध्या आत्महत्या होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरदार, महिला, कलाकार असे समाजातील सगळ्या घटकांमधील व्यक्ती आत्महत्या करताना दिसतात. बरे जसा गरीब शेतकरी आत्महत्या करताना दिसतो तसा चांगल्या आर्थिक स्थितीतील लोकांच्याही आत्महत्या वाढत चालल्या आहेत. आत्महत्येची कारणे वेगवेगळी असतात. अनेकदा आत्महत्येची कारणे दिसतात, एखादा आत्महत्या करताना थेच आपले कारणच लिहून ठेवतो. तर काही जणांच्या आत्महत्येचे कारण कधीच उलगडत नाही. तंत्रज्ञानाने जग जवळ आले आहे, पण लोकामधला संवाद हरवतोय. सोशल मिडियावर लोक सक्रिय असताता पण त्यातले अनेक त्यांचे मित्र हे आभासी असतात. अनेकदा त्यांच्याशी कधी थेट बोलणेही होत नाही. अशा प्रकारे नातेवाईक, आप्त, मित्र-मैत्रिण, आई-वडिल ही नाती केवळ कागदावर राहिल्यासारखी झाली आहेत. त्यांच्याशी कौटुबिक जिव्हाळा, मैत्री राहिलेली नाही, लोकांचा परस्परांविषयीचा जिव्हाळा संपल्यात जमा आहे. त्यातून माणूस हा एकटा पडू लागला आहे. अनेकदा अडचणी, समस्या सोडवायला मित्रांची, नातेवाईकांची मदत होते. परंतु आता तशी नातीच शिल्लक राहिलेली नाहीत. त्यातून परिस्थितीचा अतिरेक झाला आहे. दहावी, बारावी परीक्षांचा मोसम आला की, आत्महत्यांचे प्रमाण वाढते. पेपर चांगला गेला नाही, चांगले मार्क मिळणार नाही, चांगल्या कोर्सला प्रवेश मिळणार नाही, ही कारणे त्यामागे असतात. खरे तर दहावी- बारावीची परिक्षा हे काही अंतिम ध्येय नव्हे, परंतु आपम आता असे काही स्पर्धेच्या नावाखाली चित्र तयार केले आहे की, बस या परीक्षात यश मिलाले नाही तर तुमच्या जीवनाला काहीच अर्थ राहिला नाही. कुटुंबियांच्या पाल्यांकडून असलेल्या वाढत्या अपेक्षा, मार्कांची जीवघेणी स्पर्धा, क्लास, कॉलेज, अभ्यास या धकाधकीतून थकलेले विद्यार्थी यांच्यावर एवढा दबाव असोत की, ते यातून बाहेर पडून खरे आयुष्य जगण्यास शिकतच नाहीत. परीक्षा कालावधीत शिक्षण विभागातर्फे जिल्हापातळीवर समुपदेशकदेखील नियुक्त केले जातात. पण त्याचा फारसा लाभ होत नाही. मुळात घरातच संवाद वाढला, पाल्यांचा कल ओळखून अभ्यासक्रमाची निवड, अपयशाच्या काळात मानसिक आधार दिला गेला तर मुले या मार्गाला वळणार नाही. मुळातच या परीक्षेला नापास होणे म्हणजे तुम्ही आयुष्यात आता काहीच करु शकणार नाहीत, ही समजूत बदलली पाहिजे. शेतकरी आत्महत्येविषयी मंथन विविध पातळ्यांवर सुरु आहे. स्वामीनाथन आयोग, कर्जमाफी, वीजबिल माफी, कृषिमूल्य आयोगाकडून योग्य दराची हमी असे पर्याय सुचविले जात आहे. आंदोलने होत आहे. परंतु ठोस उपाययोजना होत नसल्याने आत्महत्या सुरुच आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाच्या मुळाशी जाऊन त्यासंबंधी काम करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी कशासाठी आत्महत्या करतो त्याची नेमकी कारणे शोधली गेली पाहिजेत. केवळ नोकरशाहीवर भरवसा ठेऊन हा प्रश्‍न सोडविला जाऊ शकत नाही. शेतकर्‍याचा माल बाजारात पोहोचला की, दर कोसळतात, लागवडीचा खर्च निघत नाही. यावर सरकारने शेतकर्‍याला निश्‍चित हमी भाव दिल्यास शेतकरी निर्धास्त होईल. शेतीचे गणित बिघडले आहे, त्याचे परिणाम बळीराजाच्या कुटुंबियांना भोगावे लागत आहे. आजही आपल्याकडे 70 टक्के लोकसंख्या कृषी क्षेत्राशी निगडीत असताना सरकार, समाज यांच्याकडून गांभीर्याने विचार होत नाही, हे चिंताजनक आहे. गेल्या दोन दशकात आर्थिक उदारीकरण झाल्यापासून आपल्या समाजात अनेक बदल झाले आहेत. माणसे ही परस्परांपासून दुरावत चालली आहेत. अहंकार, विक्षिप्तपणा, हेकेखोर वृत्तीमुळे दुरावा निर्माण होतो. सामंजस्य, मनाचा मोठेपणा, क्षमाशील वृत्ती ही गुणवैशिष्टे आपल्यासाठी नाहीच, असा समज करुन माणसे स्वकीयांना दूर लोटतात. यासाठी माणसातील, नातेवाईकातील, मित्रांतील संवाद वाढण्याची व त्यात सकारात्मकता येण्याची गरज आहे. पूर्वी जपानमध्ये सर्वाधिक आत्महत्या होत, आता आपणही जपानला यात मागे टाकू की काय अशी भीती वाटू लागली आहे. आत्महत्या हा शेवटचा उपाय आहे. मध्यंतरी मुंबईतील एका ज्येष्ठ नागरिक असलेल्या जोडप्याने आमचा सांभाळ करावयास कोण नाही यासाठी आत्महत्या करुन जीवन संपविण्याची परावानगी न्यायालयाकडे मागितली होती. ही घटना आपल्याला मनस्ताप देणारी आहे. परंतु याचा कुणी विचारच केला नाही. जेष्ठ नागरिकांच्या सध्याच्या काळात समस्या आहेत, त्याकडे कोणच लक्ष देत नाही. सरकारने आपली जबाबदारी पध्दतशीररित्या टाळली आहे. तर ज्या जेष्ठांकडे पैसा नाही त्यांचे दिवस वाईट आहेत. त्यांच्यासाठी सरकार काही करणार आहे किंवा नाही? आत्महत्येचे वाढत जाणारे हे पेव आपल्या समाजातील अस्वस्थता दाखविते. त्यावर लवकरच उत्तर न शोधल्यास आपल्या देशाचे समाजस्वास्थ बिघडण्यास वेळ लागणार नाही.
-------------------------------------------------------------------

0 Response to "आत्महत्यांचे पेव"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel