-->
विचारवंत, साहित्यिक  डॉ. गंगाधर पानतावणे

विचारवंत, साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे

बुधवार दि. 28 मार्च 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
विचारवंत, साहित्यिक
डॉ. गंगाधर पानतावणे
ज्येष्ठ विचारवंत लेखक, दलित साहित्याचे अभ्यासक, संपादक आणि पहिल्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे यांनी मंगळवारी वयाच्या 80 व्या त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजाराशी झूंज देत होते. डॉ. पानतावणे यांच्या जाण्याने आपण एका ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिकाला मुकलो आहोत. डॉ. पानतावणे यांनी 2009 साली अमेरिकेतील सॅन होजे येथे झालेल्या पहिल्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. दलित साहित्याचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळे त्यांनी केलेले बरेचसे लेखन हे दलित साहित्याच्या अनुषंगाने असेच आहे. त्यापैकी धम्मचर्चा,मूल्यवेध, मुकनायक, विदोहाचे पाणी पेटले आहे, वादळाचे वंशज, दलित वैचारिक वाड्मय, किल्ले पन्हाळा ते किल्ले विशाळगड, साहित्य, प्रकृती आणि प्रवृत्ती, साहित्य शोध आणि संवाद हे सर्व ग्रंथ वैचारिक आणि समीक्षात्मक असे आहे. त्यांची ही साहित्य संपदा पाहता अशा प्रकारचे लिखाण करणारे त्यांच्याशी समकालिन असे हाताच्या बोटावर मोजता येतील असे साहित्यिक होते. अस्तितादर्शनया नियतकालिकाच्या संपादकपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारली व प्रदीर्घ काळ त्या जबाबदारीला न्याय दिला. तसेच दलित आत्मकथा, दलित साहित्य, चर्चा आणि चिंतन, लोकरंग, स्त्री आत्मकथन, महारांचा सांस्कृतिक इतिहास हे त्यांनी संपादन केलेले काही ग्रंथ आजही एक महान ठेवा म्हणून आपल्यापुढे आहेत. चळवळीला वैचारिक अधिष्ठान देणारे नियतकालिक म्हणून अस्मितादर्शकडे पाहिले जाते. हे नियातकालीक म्हणजे त्यांनी एक चळवळीचे एक वैचारिक अधिष्ठान असावे हे ठरवून विकसीत केले. या नियतकालीकाच्या संदर्भात त्यांनी केलेले संपादन हा एक एतिहासिक ठेवा ठरणार आहे. गंगाधर विठोबाजी पानतावणे हे मूळचे विदर्भातले. 28 जून 1937 साली नागपूर येथे त्यांचा जन्म झाला. डी.सी. मिशन स्कूल येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. तर नवयुग विद्यालय आणि पटवर्धन हायस्कूल नागपूर येथे माध्यमिक शिक्षण झाले. 1956 साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नागपूर महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. आणि एम. ए. ची पदवी मिळवली. मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी पी. एच. डी. ची पदवीही मिळवली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. मॅट्रिक झाल्यावरच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली होती. प्रतिष्ठान नियतकालिकातून त्यांनी सुरुवातीला विपुल लेखन केले आणि त्यानंतर त्यांनी विविध विषयांवर भरपूर लेखन केले. दलित साहित्याचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांनी केलेले बरेच लेखन हे दलित साहित्याच्या अनुषंगाने असेच जाते हे वास्तव काही नाकारण्यात अर्थ नाही. डॉ. पानतावणे यांना पद्मश्री सन्मान करुन केंद्र सरकारने एका प्रतिभावंताचा उचित गौरव केला होता. दलित साहित्याने अंधार नाकारला आहे, कलंकित भूतकाळ नाकारला आहे, मानसिक गुलामगिरीतून दलित मुक्त होऊ पाहत आहेत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानातून ते तेजस्वी होत आहेत, अशा शब्दात दलित साहित्याची पाठराखण करणार्‍या पानतावणे यांनी महाराष्ट्रातील साहित्यिकांची एक मोठी फळी घडवली आहे. अनेक लेखक त्यांनी तयार केले, त्यात अनेक दलित साहित्यिक, लेखकांचा समावेश आहे. नागपुरात जन्मलेल्या पानतावणे यांनी नंतर औरंगाबादमध्ये प्राध्यापकी करीत असताना उभारलेली साहित्यिक चळवळ केवळ मराठीतच नव्हे, तर अखिल भारतीय पातळीवर गौरवाने ओळखली गेली. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलात जात असलेल्या पानतावणे सरांनी पुढे आंबेडकरांच्या विचारांची कास जन्मभर सोडली नाही. औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात मराठीचे अध्यापन करीत होते तेव्हा अस्मितादर्श या नियतकालिकाचा विचार पुढे आला. नंतर त्याच्या संपादनामुळे त्यांचे नाव कायम आदराने घेतले गेले. त्या माध्यमातून झालेली दलित साहित्याच्या सौंदर्यशास्त्राची चर्चा असो, की नवोदितांच्या साहित्याला पाठबळ देणे असो, व्यापक पातळीवर रूजलेले हे कार्य मराठवाड्यासह महाराष्ट्रभर पोहोचले. त्या माध्यमातून भरलेले मेळाव्यांनी नियतकालिकातून सुरू झालेल्या कार्याने एका चळवळीचे रूप घेतले. ललित साहित्यापासून व्यक्तिगत लेखन सुरू केलेल्या पानतावणे यांनी लोकसाहित्य, कविता, नाटक, समीक्षा आणि संशोधनपर लेखन केले. साहित्य, संस्कृती, धर्म, इतिहास, मानववंशशास्त्र हे त्यांचे अभ्यासविषय त्यांनी ताकदीने मांडले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, दलित साहित्य अकादमी, फाय फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाची गौरववृत्ती आदी पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत. मराठवाडा साहित्य संमेलन, अमेरिकेत झालेले पहिले विश्‍वमराठी साहित्य संमेलन अशा अनेक संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. पद्मश्री किताबाने त्यांच्या सन्मानात आणखी एक तुरा खोवला गेला. महाविद्यालयातील निवृत्तीनंतर ते साहित्य क्षेत्रात सक्रिय राहिले. त्यांनी आपला त्या क्षेत्रात ठसा उमटविला. त्यांनी मराठी साहित्याची केलेली सेवा ही ऐतिहासिक अशीच आहे. त्यांच्या कार्याचा शासनानेही दखल घेऊन उचीत सन्मान केला होता. डॉ. पानतावणे यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्रात झालेली हानी कधीही भरुन निघणारी नाही.
-----------------------------------------------------------

0 Response to "विचारवंत, साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel