-->
काळ बदलला,  प्रश्‍न कायम...

काळ बदलला, प्रश्‍न कायम...

शुक्रवार दि. 23 मार्च 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
काळ बदलला,
प्रश्‍न कायम... 
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून 2011मध्ये दिल्लीतील जंतरमंतरवर अण्णा हजारेंचे उपोषण अरविंद केजरीवाल यांच्या इंडिया अगेन्स्ट करप्शन या एन.जी.ओ.च्या वतीने आयोजित केले होते. आज त्या घटनेला सात वर्षे लोटली आहेत. परंतु मध्यंतरीच्या या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यावेळी अण्णा हजारे, रामदेवबाबा, किरण बेदी, भूषण पिता-पुत्र आणि केजरीवाल अशी पंचकडी लोकपाल विधेयक व भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून यूपीए-2 सरकारवर तुटून पडत होती. कॉग्रेसच्या व विरोधातील अनेक सर्व नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात होते. हे आरोप करण्यात केजरीवाल हे अग्रभागी होते. आता त्याच केजरीवालांनी या आरोपाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कॉग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांची माफी मागितली आहे. अण्णांच्या या आंदोलनानंतर अरविंद केजरीवाल हे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आहेत. किरण बेदी यांनी भाजपा प्रवेश केल्यावर त्यांची राजकीय कारकिर्द काही यशस्वी होऊ शकली नाही, मात्र त्यांची वर्णी राज्यपालपदी लावून त्यांचे पुर्नवसन करण्यात आले. भूषण हे केजरीवाल यांच्या सरकारमध्ये सत्ता उपभोगत आहेत. तर ज्या लोकपालासाठी आग्रही भूमिका घेत अण्णा आता पुन्हा आपले आंदोलन आता 23 मार्चपासून सुरु करीत आहेत. असे नेहमी म्हटले जाते की, अण्णांच्या बरोबर एका आंदोलनात असलेले नेते पुन्हा त्यांच्यासोबत दिसत नाहीत. गेल्या वेळी दिल्लीत अण्णांच्या सोबत असलेले नेते यावेळी त्यांच्याबरोबर नाहीत हे वास्तव आहे. काळ बदलला असला तरी अण्णांनी त्यावेळी मांडलेले प्रश्‍न आजही कायम आहेत. दिल्लीतील व राज्यातील सरकार बदलून आता चार वर्षे लोटली आहेत. परंतु अण्णांनी मांडलेल्या मागण्यांना सर्वच राज्यकर्त्यांनी गोड बोलून हरताळ फासला आहे. सीमाशुल्क खात्यात वरिष्ठ पदावर काम करत असल्याने नोकरशाहीचा चांगला अनुभव असणारे आणि माहिती अधिकारासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा रॅमन मॅगेसेसे पुरस्कार मिळाल्याने केजरीवाल यांच्या सर्व आरोपांत तथ्य असल्याचा ग्रह देशभरातील मध्यमवर्ग विशेषत: उच्चशिक्षित तरुणांनी, उदारमतवादी-लोकशाहीवादी विचारवंतांनी व मीडियाने करून घेतला होता. त्यामुळे केजरीवाल यांची प्रतिमा अँग्री यंग मॅनशी तुलना करणारी ठरली होती. सर्व सामान्यांचे पाणी-वीज-घर-भ्रष्टाचार असे प्रश्‍न मांडणारा, नैतिकेची भूमिका मांडणारा व आदर्श राजकारणाविषयी सामान्यांच्या मनातील भावनांना मांडणारा नेता या आंदोलनातून मिळाला अशी समजूत अनेकांची झाली. केजरीवाल सर्वच पक्षातील प्रस्तापित राजकार्‍यांना भ्रष्टाचारी सहजरित्या बोलत, जसे काही त्यांच्या खिशात भरपूर पुरावेच आहेत. त्या बळावर त्यांनी आम आदमी पक्ष स्थापन करून दिल्ली विधानसभा निवडणुकांत भाजप व काँग्रेससारख्या मातब्बर पक्षांना धूळ चारली. निवडणुकीत यश मिळून सत्ता आल्यावर केजरीवाल यांना आपल्याला पुढे काय मांडून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. केजरीवाल यांच्याविरोधात भाजपचे अरुण जेटली, नितीन गडकरी, काँग्रेसच्या शीला दीक्षित व पंजाबमधील माजी मंत्री मजिठिया यांनी मानहानीचे दावे दाखल केले तेव्हा कायद्याच्या पातळीवर आरोप सिद्ध करण्याची केजरीवाल यांच्यावर वेळ आली आणि ते पद्धतशीर अडकले गेले. आता चार वर्षांनंतर न्यायालयात आरोपांचे पुरावे देता येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर केजरीवाल एकेकाला माफीनामे देत सुटले आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी मजिठिया यांची माफी मागितली आणि आपल्याभोवती संशयाचे ढग निर्माण केले. केजरीवाल यांचे माफीनामे म्हणजेे त्यांच्यात आता परिपक्वता आली, असे म्हणता येईल. सत्तेत असताना अनेक बाबी करता येतात, अनेकांवर बेछूट आरोप करणे सोपेही असते परंतु सत्ता आल्यावर त्या सत्तेचा वापर जनतेसाठी करणे हे सोपे नाही, हे त्यांना नंतर उमगले. केजरीवाल यांनी आपण त्याबाबतीत किती प्रामाणिक आहोत हे दाखविण्यासाठी यापूर्वीही असे अनेक माफीनामे दिले आहेत. राजकारणात विरोधकांची माफी मागणे ही दुर्मिळ बाब असली तरी या खेळामुळे नेत्याची राजकीय प्रतिमा ढासळते. मतदारांचा विश्‍वासही कमी होतो. केजरीवाल यांनी स्वत:ची प्रतिमा विश्‍वासार्ह व प्रामाणिक नेता अशी केली होती व ते आता स्वत: आपण चूक केली, असे सांगतात. केजरीवाल यांच्याकडे आज पुरावे नाहीत त्यामुळे त्यांनी माफी मागणे पसंत केले. केजरीवाल यांचा गेल्या सात-आठ वर्षांतला राजकीय प्रवास हा काही सुखकारक नाही. त्यांना भाजपाशी टक्कर देताना नाकी नऊ आले आहेत. कॉग्रसेशी त्यांचे वैर आहेच. त्यामुळे एकाच वेळी दोन मोठे शत्रु त्यांना झेलावे लागत आहेत. त्यांच्या पक्षाचा प्रभाव कमी होत आहेच, पण तेथे भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली आहेत. केजरीवाल यांनी अजून जेटली व शीला दीक्षित यांची माफी मागितलेली नाही. हे दोन नेते आगामी निवडणुका पाहता त्यांना माफी देतील का, ही देखील शंका आहेच. आण्णांच्या आंदोलनातून निर्माण झालेले नेते काही भविष्यात आपले राजकीय वजन वाढवतील असे दिसत नाही. अण्णांनी मात्र आता त्यांना आपल्या व्यासपीठावर न घेण्याचे जाहीर केले आहे. अण्णांना मागच्या आंदोलनाच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा होता हे काही छुपे राहिलेले नाही. आता अण्णांच्या मागे कोण राहिले आहे? हा सवाल आहे. भाजपाचे सरकार यातून बदनाम होईल हा अंतस्थ हेतू गृहीत धरला तरीही कॉग्रेस पाठिंबा देईल असे वाटत नाही. त्यामुळे अण्णांच्या आंदोलनाच्या मागे छुपा पाठिंबा देऊन कोण रसद पुरविते त्यावर त्यांच्या आंदोलनाचे यश अवलंबून राहिल.
---------------------------------------------------------

0 Response to "काळ बदलला, प्रश्‍न कायम... "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel