-->
दोन भावुक घटना...जन्मगावच्या...

दोन भावुक घटना...जन्मगावच्या...

रविवार दि. 21 जानेवारी 2018 च्या अंकासाठी लेख- 
------------------------------------------------
दोन भावुक घटना...जन्मगावच्या...
-----------------------------------------
एन्ट्रो-आठवड्याभरात मानवतेच्या नातेसंबंध सांगणार्‍य दोन महत्वाच्या भावुक घटना घडल्या. यातील पहिली घटना होती, 26/11 रोजी दहशतवाद्यांनी मुंबईतील नरिमन हाउसच्या छाबड सेंटरवर केलेल्या भीषण हल्ल्यातून बचावलेला मोशे होल्ट्जबर्ग तब्बल 10 वर्षांनी मुंबईत परतला होता व दुसरी घटना होती...अलिबागचे मूळ रहिवासी असलेले बेने इस्त्रायली म्हणजे ज्यू आपल्या जन्मगावी येऊन आपली मराठी संस्कृती व मराठी भाषेशी असलेल्या नात्याची गाठ पक्की करुन गेले. या दोन्ही घटना इस्त्रायलशी जोडलेल्या आहेत व मानवतेच्या नातेसंबंधांशी जोडणार्‍या आहेत. या घटनाशी आणखी एक दुवा जोडला गेला तो म्हणजे इस्त्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांची भारत भेट...
-------------------------------------
आठवड्याभरात मानवतेच्या नातेसंबंध सांगणार्‍य दोन महत्वाच्या भावुक घटना घडल्या. यातील पहिली घटना होती, 26/11 रोजी दहशतवाद्यांनी मुंबईतील नरिमन हाउसच्या छाबड सेंटरवर केलेल्या भीषण हल्ल्यातून बचावलेला मोशे होल्ट्जबर्ग तब्बल 10 वर्षांनी मुंबईत परतला होता व दुसरी घटना होती...अलिबागचे मूळ रहिवासी असलेले बेने इस्त्रायली म्हणजे ज्यू आपल्या जन्मगावी येऊन आपली मराठी संस्कृती व मराठी भाषेशी असलेल्या नात्याची गाठ पक्की करुन गेले. या दोन्ही घटना इस्त्रायलशी जोडलेल्या आहेत व मानवतेच्या नातेसंबंधांशी जोडणार्‍या आहेत. या घटनाशी आणखी एक दुवा जोडला गेला तो म्हणजे इस्त्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांची भारत भेट. या तिनही घटना भारत-इस्त्रायल मैत्रीचा एक नवा पूल बांधणारा ठरणार आहे. त्यादृष्टीने या तीन घटनांना फार महत्व आहे. माणसा-माणसातील प्रेम यामुळे वाढील जसे लागणार आहे व त्यातून दोन देशातील संबंधही अधिक वृध्दींगत होत जातील यात काही शंका नाही. दहशतवादी हल्ल्यात आई-वडिलांना गमावल्यानंतर मोशे त्याच्या आजी-आजोबांसोबत इस्रायलमधील अफुला शहरात राहत आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांच्या शिष्टमंडळासह तो भारतात आला होता. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायल दौर्‍यावर असताना त्यांनी मोशेची भेट घेतली होती. तसेच देशात सुरक्षित वातावरण असून पंतप्रधानांनी मोशेला भारतभेटीचे आमंत्रण दिले होते. त्या वेळी मुंबईत राहून शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा मोशेने व्यक्त केली होती. आता तो पुन्हा एकदा आपल्या जन्मस्थळी आला तेव्हा आणखीनच भाऊक झाला. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरात असलेल्या नरिमन हाउसच्या छाबड सेंटरचाही समावेश होता. दहशतवाद्यांनी या इमारतीत घुसून सहा रहिवाशांचा बळी घेतला होता, या हल्ल्यात इमारतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान आणि पडझड झाली होती. दहशतवादी हल्ल्यात मोशे या दोन वर्षांच्या लहान मुलाला वाचविण्यात यश आले होते. मात्र त्याचे आईवडील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ठार झाले. हे दोघेही मुंबई आणि परिसरातील ज्यू नागरिकांबाबत अभ्यासासाठी 2003 मध्ये मुंबईत आले होते. हल्ल्यात वाचलेल्या छोट्या मोशेला त्याचे आजी-आजोबा इस्रायलला घेऊन गेले होते. त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी डागडुजी करून छाबाड सेंटरची इमारत उभी करून पूर्ववत सुरू करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायल भेटीदरम्यान मोशे व त्याच्या कुटुंबाला दहा वर्षांचा मल्टिपल एंट्री व्हिसा दिला होता. हल्ल्याच्या कटू आठवणी मोशेच्या मनावर खोलवर रुतल्या आहेत. आता मोशेसह त्याचे आजी-आजोबा पुन्हा मुंबईत आल्याने हल्ल्यातील त्या स्मृतींना नव्याने उजाळा मिळाला आहे. भारत-इस्त्रायल संबंध दृढ होण्याच्या दृष्टीने मोशे हा एक मोठा दुवा ठरणार आहे. सहकार्याचा या दोन देशातील पूल मोशेच्या माध्यमातून बांधला जाणार हे नक्की. एकीकडे या कडू आठवणी दाटून आलेल्या असताना पूर्वी अलिबागेत राहाणारेे मराठी भाषिक बेने इस्रायली लोक मुंबई आणि अलिबाग परिसरात एकवटले होते. इस्त्रायलच्या पंतप्रधानांच्या भेटीची पार्श्‍वभूमी त्यासाठी होती. यानिमित्ताने मराठी भाषिक इस्रायली लोकांचे एक छोटेखानी संमेलन अलिबाग आणि मुंबई येथे पार पडलेे.  बेने इस्रायली लोकांमध्ये मराठी भाषा आणि महाराष्ट्रीय संस्कृती टिकून राहावी हा या संमेलनामागचा मूळ उद्देश. या निमित्ताने इंटरनॅशनल ऑर्गनायजेशन ऑफ बेने इस्रायली या संस्थेची स्थापनाही करण्यात आली आहे. इस्रायल आणि जगभरातील विविध देशांत मराठी भाषा बोलणारे 80 जवळपास हजार लोक आहेत. यांना बेने इस्रायली असे संबोधले जाते. इस्रायलच्या निर्मितीनंतर महाराष्ट्रातून यातील बहुतांश जण आणि त्यांचे कुटुंबीय तिथे स्थलांतरित झाले. मात्र मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांच्यांशी जोडली गेलेली त्यांची नाळ अद्याप तुटलेली नाही. साधारणपणे 2300 वर्षांपूर्वी ज्यू लोकांना घेऊन जाणारे एक जहाज अलिबागजवळील एका खडकावर आदळून फुटले. या जहाजातील अनेक लोक मृत्युमुखी पडले व केवळ 14 जण बचावलेे. त्यात सात महिला आणि सात पुरुषांचा समावेश होता. ते नवगाव येथील किनार्‍याला आले. जहाज अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आपल्या साथीदारांचे त्यांनी नवगाव समुद्रकिनार्‍यावर असलेल्या एका जागेत अंत्यसंस्कार केले. भारतातील ज्यू लोकांची ही पहिली दफनभूमी. बोटीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या स्मरणार्थ येथे एक स्मारक उभारण्यात आले आहे. गेल्याच आठवड्यात येथे बेने इस्रायलींना श्रद्धांजली वाहाण्यात आली. इस्रायलच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने ज्यू आपल्या मायदेशी गेले, अलिबागमधील ज्यूंचाही त्यात समावेश होता. आज या घटनेला सहा दशके लोटली असली तरीही त्यांच्या कुटुंबीयांमध्ये मराठी भाषा आणि संस्कृतीची ओढ कायम आहे. नवीन पिढीने मराठी भाषा शिकावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. भारतात राहून आपला धर्म आणि संस्कृती जोपासण्याचे स्वातंत्र्य या देशाने दिले त्याबद्दल ते नेहमीच धन्यवाद देतात. आपल्या सर्वधर्मसमभावाच्या धोरणाचा तो एक भाग होता. मात्र यातून आपण जगात ज्यूंशी मैत्रीचा पूल बांधला आहे. भारताबद्दल बेने इस्रायली लोकांमध्ये कमालीचा आदर आणि आपुलकी कायम आहे.अलिबाग व रायगड जिल्ह्यात मोठया संख्येने हे लोक होते. नवगाव येथे दाखल झाल्यानंतर बेने इस्रायली लोक अलिबाग आणि आसपासच्या परिसरात स्थायिक झाले. अलिबाग, कोर्लई, मुरुड, पेण, पनवेल या परिसरात जाऊन त्यांनी व्यवसाय सुरू केले. मुळातच हा समाज उद्योजक असल्याने त्यांचा वावर हा उद्योजकीय समाजात मोठ्या संख्येने होता. सुरुवातीच्या काळात तेलबियांपासून तेल काढण्याचा व्यवसाय त्यांनी केला. शेती व पूरक उद्योग सुरू केले. अलिबागमध्ये प्रसिद्ध असणार्‍या अशा जिरा सोडा आणि आइसक्रीम सोडयाचा शोध या बेने इस्रायलींनी लावला. इस्रायल ही जरी आमची मातृभूमी असली तर भारत ही आमची जन्मभूमी आहे, असे ते आदराने नेहमी सांगतात. आता अलिबाग व परिसरात बेने इस्त्रायली कुटुंबे हाताच्या बोटावर मोजण्याइतपत शिल्लक राहिली आहेत, मात्र ते इथून गेलेल्या इस्त्रायलच्या बांधवांशी अजूनही संपर्कात आहेत. काही जणांनी तर जाताना आपली घरे विकली नाहीत, आजही वर्षातून एकदा ते आवर्जुन येतात. त्यांनी येथील मातीशी नाते आजही कायम टिकविले आहे. अशा या लोकांच्या पूर्वजांचा इतिहास सांगणार्‍या नावगाव येथील स्मृतिस्तंभ हा चांगल्यारितीने विकसीत केल्यास ते एक मोठे पर्यटनाचे केंद्र ठरु शकते. त्यासाठी आता केंद्र सरकारने व येथील बेने इस्त्रायली लोकांनी पुढे येऊन प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी निधींची कमतरता पडणार नाही, परंतु आपल्याकडील पुरातत्व विभागाने सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. हे साकारल्यास आपल्याकडील पूर्वजांचा एक मोठा ठेवा ठरेल.
------------------------------------------------------------- 

0 Response to "दोन भावुक घटना...जन्मगावच्या..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel