-->
घसरता शैक्षणिक दर्जा

घसरता शैक्षणिक दर्जा

शनिवार दि. 20 जानेवारी 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
------------------------------------------------
घसरता शैक्षणिक दर्जा
आपल्याकडे शिक्षण हे ज्ञानार्जनासाठी घेतले जात नाही तर मार्क मिळविण्यासाठी घेतले जाते. त्यामुळे आपण मुलांना शिक्षण देताना त्यांना त्यातील किती समजले, उमगले याचा विचार न करता त्याला संबंधित विषयात शंभरात 99 मार्क मिळविण्याचे आहेत असे टार्गेट ठेवून शिकविले जाते. किंबहुना अनेकवेळा मुलांना ठराविक प्रश्‍न परीक्षेला येणारच व त्याचाच अभ्यास करावा असे सांगून त्यांच्याकडून घोकमटप्पी करुन घेतली जाते. त्यामुळे मुलांना त्याशिवाय अन्य काही शिकविण्याचे कष्टही घेतले जात नाहीत. त्यामुळे मुलांची देखील आपल्याला शिकायचे आहे ते मार्क मिळविण्यासाठीच, एकदा का मार्क आपल्या पदरात पडले की शिकलेले विसरलो तरी आपल्याला काही फरक पडत नाही अशी त्यांची ठाम समजूत झालेली असते. हे सर्व होत असताना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आपला शैक्षणिक दर्जा घसरत असतो हे कुणाच्याही लक्षात येत नाही. शिक्षक, शिक्षण खाते व मुलांनाही या विषयी काही देणे घेणेे नसते. शाळेचा रिझल्ट चांगला लागला की शिक्षक व संस्था चालक खूष, मात्र शिक्षण घेतलेल्या मुलांना त्या शिक्षणाचा किती फायदा होणार याचा कोणीच विचार करीत नाही. यामुळे आपल्याकडील शैक्षणिक दर्जा आता सुमार होत चालला आहे. याचे पडसाद नुकत्याच प्रसिध्द झालेल्या एका अहवालात उमटले आहेत. प्रथम या संस्थेच्या वतीने गेल्या 12 वर्षांपासून देशातील विद्यार्थ्यांच्या प्राथमिक वाचन, लेखन, गणित आणि सामान्य ज्ञान याबाबतच्या शैक्षणिक दर्जाचे सर्वेक्षण करून असर म्हणजे अ‍ॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट प्रकाशित केला जातो. आजपर्यंत 6 ते 14 या वयोगटातील विद्यार्थ्यांचे यासंबंधी सर्वेक्षण केले जात असे. यंदा पहिल्यांदाच 14 ते 18 या वयोगटातील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. या पहाणीत देशातील 24 राज्यांतील 28 जिल्ह्यांमधील 30 हजार विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतील प्राथमिक वाचन, लेखन, गणित, मोजमाप, भूगोल याबाबत आवश्यक किमान बुद्धिमत्तेचे प्रश्‍न विचारण्यात आले. त्यापैकी 25% विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतील परिच्छेद सहजतेने वाचता आला नाही, 43% विद्यार्थी किमान भागाकार करू शकले नाहीत, 44% विद्यार्थ्यांना साधे मोजमाप करता आले नाही. या विद्यार्थ्यांना भारताचा नकाशा दाखवून सामान्य ज्ञानाचे चार प्रश्‍न विचारण्यात आले. त्यानुसार 86% विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिले, परंतु 36 % विद्यार्थ्यांना देशाची राजधानी कोणती? या प्रश्‍नाचे उत्तर देता आले नाही. 21% विद्यार्थ्यांना तुम्ही कोणत्या राज्यात राहता? या प्रश्‍नाचे उत्तर देता आले नाही, तर 58% विद्यार्थ्यांना देशाच्या नकाशावर त्यांचे राज्य ओळखता आले नाही. 7 वी ते 12 वी या वयोगटातील इतक्या मोठ्या संख्येच्या विद्यार्थ्यांना या प्रश्‍नांची उत्तरे माहीत नसणे हे आपल्या दर्जाहीन राष्ट्रीय शिक्षणाचे चित्र आहे. तरुणांच्या हाती देशाचे वर्तमान आणि भविष्य हे दोन्ही अवलंबून आहेत. देशाचे भावी मतदार व एक सुजाण नागरिक असणार्‍या या कुमारांचे शैक्षणिक संगोपन किती निकृष्ट होत आहे हे यातून समजतेे. सर्वांना सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण देणारा ऐतिहासिक शिक्षण हक्क कायदा आपण केला, हा निर्णय चांगलाच होता त्याबाबत शंका नाही. शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्व शिक्षा अभियानासारख्या योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र, हे सारे ज्यासाठी केले त्या सार्वत्रिक शिक्षणाचा दर्जा आपण अजूनही सुधारू शकलो नाही. एकीकडे ही शैक्षणिक गुणवत्ता सुमार असताना दुसरीकडे मात्र हीच मुले तंत्रज्ञानाच्या बाबतीत पुढे गेली आहेत. या पाहाणीपैकी 72.6% विद्यार्थी मोबाइल वापरतात, 28% विद्यार्थी इंटरनेट वापरतात, तर 25% विद्यार्थी संगणक वापरतात. यातील 60 टक्के विद्यार्थ्यांनी त्यांना पदवीपर्यंत शिक्षण घेण्याची इच्छा असल्याचे नमूद केले. त्यांना डॉक्टर, इंजिनिअर, पोलिस, शिक्षक, सरकारी अधिकारी बनण्याची स्वप्ने आहेत. आणखी एक धक्कादायक निकष म्हणजे, 40% विद्यार्थ्यांच्यासमोर कोणतेही रोल मॉडेल नाही. या मुलांना कुणालाच डोळ्यापुढे ठेवावे असे आढळलेले नाही. स्वत:च्या उन्नतीसाठी पूरक असे प्रेरणादायी व मार्गदर्शक आदर्शही त्यांना सभोवताली दिसत नाहीत, हे एक दुर्दैव ठरावे. हे केवळ शैक्षणिक नव्हे, तर नैतिक कुपोषण आहे. सध्याच्या शिक्षण व्यवस्थेचा व संपूर्ण समाजव्यवस्थेचा हा पराभव आहे. सध्या प्रत्येक राजकीय पक्ष युवांना साद घालतो, कारण युवांकडे ते मतपेटी म्हणून पाहतात. परंतु या मतपेटीच्या पुढे जाऊन आपण या तरुणांना काही चांगले आदर्श द्यावेत, त्यांच्यापुढे नवी आव्हाने द्यावीत, त्यांचा चांगले ज्ञान द्यावे याचा विचार करताना दिसतच नाहीत. भारत हा जगातील सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जातो. याची घोषणा संयुक्त राष्ट्रसंघानेच केली आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये 26 कोटी, तर भारतात एकूण लोकसंख्येच्या 35 कोटी लोकसंख्या कुमारवयीन आहेत. परंतु आपल्याकडील तरुण आज दिसाहीन आहे. अर्थात यात काही मोजक्या तरुणांचा समावेश नाही. हुसंख्या तरुमांची स्थिती ही हा अहवाल पाहिल्यास विदारकच आहे. त्यामुले आपल्या तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात आहे. परंतु याबाबत शिक्षक, शाळांचे प्रशासक, शिक्षण मंत्रालय फारसे काही करताना दिसत नाहीत. या अहवालाच्या शिफारशी देखील बसनात गुंडाळल्या जातील. अशी दिशाहीन पिढी भविष्यात देशाला कुठेे नेणार असा सवाल आहे.
----------------------------------------------------------------------

0 Response to "घसरता शैक्षणिक दर्जा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel