-->
सोनईचा दणका

सोनईचा दणका

सोमवार दि. 22 जानेवारी 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
------------------------------------------------
सोनईचा दणका
आन्तरजातीय प्रेमसंबंधातून अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे घडलेल्या तिहेरी हत्याकांडातील सहा दोषी आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठाविल्याने एकच खळबळ उडाली आहे. जातीय विव्देषातून झालेले हे हत्याकांड असल्याने हा केवळ साधासुधा गुन्हेगारी खटला नव्हता तर यामागे जातीय विव्देष व अहंकार होता. त्यामुळे या खटल्याच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. सध्याच्या काळात मनुवादी प्रवृत्ती जोर धरीत असताना व जातीयवादाचे बीज कसे घट्ट होईल हे जाणीवपूर्वक पाहिले जात असताना न्यायालयाने दिलेल्या या निकालाला फार मोठे महत्व आहे. न्यायालयाने आपल्या निकालात,ही हत्त्या जातीय विव्देषातून झालेली असल्याने या आरोपींना समाजात राहाण्याचा हक्क नाही असे पोटतिडकीने म्हटले आहे. पाच वर्षापूर्वी गणेशवाडी शिवारात काळजाचा थरकाप उडविणारे हे हत्याकांड घडले होते. या खटल्याचा निकाल देताना न्यायालयही अतिशय संवेदनशील झाले होते. अतिशय दुर्मिळ असा हा गुन्हा असून जातिय विव्देषातून सवर्ण जातीतील मुलीच्या कुटुंबियांनी दलित युवकाची अतिशय निर्घुण अशी हत्या केली आहे, असे न्यायमूर्तींनी सांगितले. जात व्यवस्था एड्सप्रमाणे पसरु नये, यासाठी आरोपीच्या कौर्याला कठोर शिक्षा न दिल्यास ते लांडग्यासारखे फिरुन समाज भयग्रस्त करतील. समाजाला भयमुक्त करण्यासाठी आरोपींना कठोर शिक्षा सुनावली जात असल्याचे न्यायालयाने जे म्हटले आहे ते योग्यच आहे. हे तिह्री हत्याकांड म्हणजे मानवतेला लागलेला एक कलंकच म्हटला पाहिजे. सचिन सोहनलाल धारु हा नाशिकच्या बागलाण तालुक्यातील एक तरुण नेवासा फाटा येथे असलेल्या घाडगे पाटील शिक्षण संस्थेत सफाईचे काम करीत होता. याचा महाविद्यालयात सोनईनजिक विठ्ठलवाडीतील एक मुलगी शिकत होती. ही मुलगी मराठा समाजातील होती. या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता व ही कुणकुण मुलीच्या नातेवाईकांना लागली होती. अशोक नवगिरे या तरुणाने ही बातमी त्या मुलीच्या घरी कळविली होती. हा मुलगा याच शिक्षणसंस्थेत जे.सी.बी. यंत्रचालक म्हणून कामाला होता. मध्यंतरीच्या काळात सचिनला दमदाटी करुनही तो या मुलीच्या प्रेमापासून वेगळे होण्यास तयार नव्हता. शेवटी त्याला विचारपूर्वक कट रचून मारण्याचा डाव आखण्यात आला. त्या मुलीच्या घराजवळील मैला उचलण्याचे काम असल्याचे सांगून त्याला चार हजार रुपये मोबदला देण्याचे कबूल करण्यात आले. हे काम करण्यासाठी सचिनसोबत आणखी दोघे जण आले होते. मुलीच्या वडिलांना व त्यांच्या साथीदारांनी सचिनसह त्याच्या सोबत आलेल्या दोघांनाही मारुन टाकले. खून केल्यावर त्यांच्या शरिराचे तुकडे करुन कूपनलिकेत व कोरड्या विहिरीत टाकण्यात आले होते. एकूणच हा प्रकार अत्यंत घृणास्पद व मानवतेला काळीमा फासणारा होता. आपल्या दोघा मित्रांचा खून करुन सचिनने आत्महत्या केल्याचा बनाव यावेळी रचण्यात आला होता. परंतु पोलिसांनी या गुन्ह्याचे खरे गुन्हेगार केवळ 24 तासात शोधून काढले. एकतर हे तिहेरी हत्याकंड व त्याला जातीचा कोन असल्यामुळे तसेच प्रत्यक्ष गुन्हा घडला त्यावेळी कुणीच साक्षीदार नसल्याने पोलिसांना देखील हे सर्व सिध्द करणे ही मोठी कौशल्याची बाब होती. परंतु पोलिसांच्या मदतीला अत्याधुनिक तंत्रज्ञान धाऊन आले व या गुन्ह्याची उकल झाली. केवळ मोबाईलवरील संभाषण व त्यांचे टॉवरवरुन लोकेशन शोधल्यामुळे खरे गुन्हेगार शोधता आले. पोलिसांनी देखील अशा प्रकारे या गुन्ह्याची उकल झपाट्याने करणे व नंतर न्यायालयात गुन्हेगारांना शिक्षा ठोठाविणे हे मोठ्या कसबिने केल्याने पोलिसांचेही अभिनंदन करणे क्रमप्राप्त ठरते. डी.एन.ए. चाचणी व मोबाईल हेच या गुन्ह्याचे खरे साक्षीदार ठरले आहेत. अशा प्रकारे अत्याधुनिक शास्त्राचा व तंत्रज्ञानाचा अवलंब करुन गुन्हेगार सुटू शकणार नाहीत, उलट हे तंत्रज्ञान त्यांना नव्हे तर पोलिसांच्या भल्याचे ठरते, हे आता पुन्हा एकवार सिध्द झाले आहे. जातीच्या बंधनांमुळे माणूस आपली माणूसकी व मानवधर्म कशा प्रकारे हिरावून बसला आहे, ह या खटल्यावरुन स्पष्ट दिसते. आपल्याकडे शेकडो वर्षापासून असलेली ही जात व्यवस्था मानवाच्या विकासाच्या आड येते, त्याला माणूस म्हणून जगण्याला असमर्थ ठरविते तरीही आपण या जातीच्या जोखडातून काही मुक्त होण्यास तयार नाही, हे दुर्दैवी आहे. जाती, धर्माच्या भिंती या माणसाने तयार केलेल्या आहेत व त्यातून माणूस जोडला नाही तर तोडला जातो, हे आजवर अनेकदा आपण पाहतो-अनुभवतो आहोत. परंतु त्यातून धडा घेण्यास आपण काही तयार नाही. हे जोखड आपण खर्‍या अर्थाने कधी फेकणार व एकसंघ समाज कधी घडविणार हे एक न सुटणारे कोडे झाले आहे. आपल्याकडे औद्योगिकीकरणानंतर जाती-धर्माच्या भिंती कोसळून पडतील अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु आपल्या शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण होऊनही आपण ही बधने काही तोडू शकलेलो नाही. उलट गेल्या दोन दशकात आपण जातीयवादाच्या अधिकच जवळ गेलो आहोत. आपण जोपर्यंत ही जोखडे फेकून देणार नाही तोपर्यंत आपण खर्‍या अर्थाने विकसीत राष्ट्र म्हणून मिरवू शकणार नाही. सोनईच्या या निकालाने आपल्याला एक मोठा धडा शिकविला आहे. परंतु आता तरी आपण यापासून बोध घेऊन जातीपातीच्या बंधनातून मुक्त होणार किंवा नाही हा खरा सवाल आहे. तसे न झाल्यास या गुन्हेगारांची शिक्षा ही केवळ एक शिक्षाच राहिल, त्यातून समाजाने बोध घेणे महत्वाचे आहे.
------------------------------------------------------------

0 Response to "सोनईचा दणका"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel