-->
आता जी.एस.टी.चा ही इव्हेंट!

आता जी.एस.टी.चा ही इव्हेंट!

गुरुवार दि. 22 जून 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
आता जी.एस.टी.चा ही इव्हेंट!
सध्याच्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने प्रत्येक गोष्ट ही इव्हेंट म्हणून साजरा करुन इवलीशी एखादी बाब डोंगराएवढी दाखविण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे आपण खूप मोठे काम करीत आहोत असे जनतेला ते भासवित आहेत. गॅसची सबसिडी असो किंवा योगा दिवस त्याची जबरदस्त प्रसिद्दी करुन तो एखादा इव्हेंट म्हणून साजरा करावयाचा हे आता नित्याचेच झाले आहे. आता सरकार येत्या 1 जुलैपासून जी.एस.टी.ची अंमलबजावणी करणार आहे. आता हा देखील एक मोठा इव्हेंट म्हणून सरकार साजरे करणार आहे असेच दिसते. स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वात मोठी कर सुधारणा असलेल्या जीएसटीची अंमलबजावणी 30 जूनच्या मध्यरात्रीपासून देशभरात सुरु होईल. त्यानिमित्ताने 30 जूनच्या मध्यरात्री संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये विशेष कार्यक्रम होणार आहे. यावेळी वाजतगाजत जीएसटीचे स्वागत करण्यात येणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासह संसदेचे सर्व खासदार, जीएसटी परिषदेचे सदस्य, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि अधिकारी वर्गाला या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, एचडी देवेगौडा यावेळी मंचावर उपस्थित असतील. तासाभराच्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी मार्गदर्शन करतील. जीएसटी संदर्भात दोन लघुपटही यावेळी दाखवण्यात येणार आहेत. केरळ व काश्मीर वगळता जीएसटी लागू करण्यास सर्व राज्यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे केरळ व काश्मीर वगळता सर्व राज्यांत एक जुलैपासून जीएसटी लागू होईल. केरळ विधानसभेत पुढील आठवड्यात जीएसटी कायदा संमत केला जाणार आहे. तर काश्मीरमध्येही त्या दिशेने हालचाल सुरू आहेत. त्यात भरीस भर म्हणून जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या प्रमोशनसाठी अर्थ मंत्रालयाने बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन यांची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून निवड केली आहे. लोकांपर्यंत जीएसटी म्हणजे काय, त्याचे फायदे काय या सर्व गोष्टी लोकांच्या मनात बिंबविण्यासाठी बिग बींची निवड करण्यात आली आहे. याआधी अमिताभ बच्चन यांची निवड होण्यापूर्वी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची जीएसटीसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली होती. स्वातंत्र्यांचा उत्सव साजरा करण्यासाठी 15 ऑगस्ट 1947च्या रात्री भाग्योदयाच्या दिशेने नावाने एक सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याच प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन जीएसटीच्या शुभारंभासाठी करण्यात आले आहे. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात होईल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यावेळी जीएसटी कायद्याच्या अंमलबजावणीसंबंधी औपचारिक घोषणा करतील. एकूणच जी.एस.टी.चा इव्हेंट म्हणऊन सरकार करेल. खरे तर या जी.एस.टी.चा मुक्य प्रणेता हा कॉग्रेस पक्ष आहे. मात्र त्यावेळी विरोधात असणार्‍या भाजपाने व त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असणार्‍या नरेंद्र मोदी यांनी याला विरोध केवळ विरोधासाठी विरोध म्हणून केला होता. मात्र सत्तेत आल्यावर भाजपाने यु टर्न घेतले व जी.एस.टी. कसे चांगले आहे ते सांगण्यास सुरुवात केली. शेवटी आता त्यांच्याच राज्यात ही नवी कर रचना अंमलात येत आहे. हा योगायोग नसून नियतीने केलेला आघात आहे. आता ही नवी कररचना यशस्वी होवो. जगात ही पध्दती मान्य झाली आहे, आपल्याकडेही ती होईल. मात्र भाजपाने यापूर्वी विरोध केला नसता तर जी.एस.टी. ची अंमलबजावणी सुरु होऊन आता किमान आठ वर्षे झाली असती. याची यावेळी आठ़वण आल्याशिवाय रहावत नाही.

0 Response to "आता जी.एस.टी.चा ही इव्हेंट!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel