-->
संपादकीय पान गुरुवार दि. १३ फेब्रुवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
बाल गुन्हेगारीची वाढती समस्या
--------------------------
गेल्या काही वर्षात आपल्याकडे प्रामुख्याने मुंबईत बाल गुन्हेगारीच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होणे ही सर्वात मोठी चिंतेची बाब ठरावी. गेल्या वर्षात मुंबईत बलात्कार केलेल्या बाल गुन्हेगारांची संख्या १०० टक्क्याने वाढली आहे. तर बाल गुन्हेगारांकडून होणार्‍या विनयभंयांच्या गुन्ह्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. त्याच्या जोडीला चोर्‍या, मारामारी यासंबंधीचे बाल गुन्हेगारांच्या गुन्ह्यातही वाढ नोंदविली गेली आहे. गेल्या वर्षात मुंबईसारख्या महानगरात बाल गुन्हेगारांच्या गुन्हेगारीत सुमारे सरासरी १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या काळात जवळपास ७०० गुन्हे नोंदविले गेले. म्हणजे सरासरी दोन गुन्हे हे बाल गुन्हेगारांवर नोंदविले जात असतात. गेल्या वर्षी दिल्लीतील बलात्काराच्या प्रकरणी जे सहा आरोपी होते त्यात एक आरोपी हा बाल गुन्हेगार होता. या घटनेनंतर बाल गुन्हेगारी हा विषय चर्चेच आला. बाल गुन्हेगारांचे वय हे १८ वरुन कमी करुन १६वर आणावे अशी मागणी विविध थरातून होऊ लागली. सरकारने देखील ही मागणी तत्वत मान्य करुन त्यासंबंधी कायद्यात बदल करण्यासाठी पावले उचलली आहेत. आज जगात अनेक देशात बाल गुन्हेगारांच्या वयाची मर्यादा ही १६ वर्षे आहे. त्यामुळे आपणही सध्या असलेली वयाची मर्यादा कमी करावी अशी मागणी होणे स्वाभाविक आहे. परंतु केवळ कायद्यात बदल करुन बाल गुन्हेगारी थांबविता येणार नाही. त्यासाठी बाल गुन्हेगारीची नेमकी कारणे कोणती आहेत याचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना केली पाहिजे. उद्याची पिढी जर चांगली घडवायची असेल तर अल्पवयीन मुलांपासून त्याची सुरुवात केली पाहिजे. बाल वयात त्यांच्यावर चांगले संस्कार घडविले तर आपली भविष्यातील पिढी चांगली घडणार आहे. त्यादृष्टीने विचार करता, आपल्याकडील मानसशास्त्रज्ञांच्या मते बाल गुन्हेगारीचे मूळ हे त्यांच्या उपाशी राहाण्यामागे आहे. या बालकांना जर पोटभर दोन वेळचे खाणे मिळाले तर यातील अनेक जण गुन्हेगारीकडे वळणार नाहीत. हे एक भयाण वास्तव आहे. स्वातंत्र्यानंतर सहा दशके लोटली तरी आपण आपल्या देशातील बालकांना दोन वेळचे अन्न देऊ शकत नाही, ही सर्वात मोठी दुदैवी घटना आहे. पूर्वी आपल्याकडे बाल मजुरी सर्रास चालू होती. परंतु आपण गेल्या दोन वर्षापासून बाल मजुरीला आळा घातला. त्याचे कायदे कडक केले. मात्र त्यामुळे बाल मजुरी रोखली गेली. मात्र दुसर्‍या बाजुला जे रोजगार करुन आपले पोट भरत होते त्यांच्या पोटाची व्यवस्था सरकारने काही केली नाही. याचा परिणाम म्हणून बाल गुन्हेगारांची संख्या वाढली असावी. बाल मजुरीचे समर्थन कुणी करु शकत नाही. मात्र त्याच्या जोडीला सरकारने बाल मजुरांची पोटापाण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. बाल गुन्हेगारीची जी अनेक कारणे आहेत त्यातील बाल मनावर दूरचित्रवाणीमुळे होणार्‍या संस्काराचे महत्वाचे कारण ठरावे. गेल्या काही वर्षात आपल्याकडे टी.व्ही. चॅनेल्सनी धुडगूस घातला आहे. ही चॅनेल्स आपले दर्शक वाडावेत यासाठी कोणत्याही थराला जातात. यातून आपल्या मालिकांमध्ये भांडणे, हिंसाचार, गुन्हेगारी दाखविण्याची चॅनेल्समध्ये चढाओढ असते. हे सर्व पाहताना बाल मनावर अनेकदा वाईट संस्कार होतात. कोवळ्या बाल मनावर या चॅनेल्सच्या माध्यमातून जे संस्कार होत असतात त्यातून त्यांचे मन हिंसेकडे, गुन्हेगारीकडे वळते. कारण या मुलांवर चॅनेल्समधील घटना मनावर कोरल्या जातात आणि त्यादृष्टीने त्यांची मानसिकता तयार होते. यातून गुन्हेगारी वाढीस लागण्याचा धोका निर्माण होतो. परंतु चॅनेल्समधील जी गुन्हेगारी दाखविली जाते त्यावर कुणी आळा घालू शकेल असे वाटत नाही. बाल गुन्हेगारांचे वय कमी करणे ही निव्वळ मलमपट्टी आहे, त्यासाठी बाल गुन्हेगार घडणार नाहीत यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे.
------------------------------------------  

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel