-->
महाराष्ट्राचा ‘नीळकंठ’ ( अग्रलेख)

महाराष्ट्राचा ‘नीळकंठ’ ( अग्रलेख)

दिव्य मराठी | Aug 26, 2013 EDIT

स्वातंत्र्यसैनिक, उद्योगपती, सहकार क्षेत्रात काम केलेले एक कार्यकर्ते व क्रियाशील शेतकरी नीळकंठराव कल्याणी काळाच्या पडद्याआड गेले. स्वातंत्र्यपूर्व कालखंड, स्वातंत्र्यानंतरची संमिश्र अर्थव्यवस्था आणि 91 नंतरचे आर्थिक उदारीकरणाचे युग, अशा गेल्या शतकातील तीन महत्त्वाच्या कालखंडातील कल्याणी हे साक्षीदार होते. कराडजवळच्या कोळे या गावी 1928 मध्ये एका सधन शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कल्याणी यांच्याकडे घरची सुबत्ता होती. सुखासमाधानाने ते एका सधन शेतक-याचे आयुष्य जगू शकले असते. परंतु ऐन तरुणपणातच ते स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झाले. कराड येथे शालेय शिक्षण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. तेथेदेखील शिक्षण घेत असताना त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत मोठ्या हिरिरीने भाग घेतला. त्या वेळी त्यांचा दोन मोठ्या नेत्यांशी संपर्क आला. एक म्हणजे यशवंतराव चव्हाण आणि दुसरे शंतनुराव किर्लोस्कर.
शंतनुरावांशी तर त्यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते. देश स्वतंत्र झाल्यावर आपल्याला उद्योगधंदे उभारून देशसेवा करायची आहे, असे शंतनुरावांनी त्यांच्यावर संस्कार केले आणि दुसरीकडे यशवंतरावांनी त्यांना महाराष्ट्रात सहकार क्षेत्रामुळे आपण कशी प्रगती करू शकतो याचा रोडमॅप तयार करून दिला. त्यामुळे नीळकंठरावांनी उद्योग उभारणी व सहकार क्षेत्र अशा दोन्ही ठिकाणी काम सुरू केले. सहकार क्षेत्रात कार्यरत असूनही उद्योगधंदा करणारे कल्याणी हे एकमेव उद्योगपती असावेत.1962 मध्ये त्यांच्याकडे भूविकास बँकेचे अध्यक्षपद देण्यात आले.
नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्रातील कर्जे व जिंदगी याबाबतची वाटणी करण्याचे काम त्यांच्याकडे आले. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात देशातील अग्रेसर भूतारण बँक असा लौकिक भूविकास बँकेने मिळवला व जास्तीत जास्त कर्जवाटपाचे उद्दिष्ट साध्य केले. अशा प्रकारे एकीकडे सहकार क्षेत्रात कार्यरत असताना नीळकंठरावांनी आपल्या उद्योसमूहाची मुहूर्तमेढ रोवली. 1960 मध्ये त्यांनी कराड येथे पहिला फोर्जिंग उद्योग सुरू केला. त्यानंतर दोन वर्षांतच त्याचे नामकरण त्यांनी ‘भारत फोर्जिंग’ असे केले. आज ही कंपनी अर्धशतकानंतर जगात पोहोचली आहे. त्या काळी देशात उद्योगधंदे सुरू झाले होते. त्यामुळे फोर्जिंग व्यवसायाला मोठी मागणी होती. तसे पाहता नीळकंठरावांचा या उद्योगातील तांत्रिक अनुभव शून्य होता. कारण त्यांचे शिक्षण हे कॉमर्समधील होते. कारखाना चालवण्यासाठी व्यवस्थापनाची पदवीही त्यांच्याकडे नव्हती. परंतु यात यशस्वी होण्याची जिद्द असल्याने त्यांनी प्रत्येक बाब शिकून घेतली आणि आपला उद्योग वाढवला. या कामी त्यांना वेळोवेळी  शंतनुराव किर्लोस्कर यांचे मार्गदर्शन लाभत असे.
कराडवरून त्यांनी आपला मोर्चा झपाट्याने विस्तारत असलेल्या पुण्याकडे नेला. 70 च्या दशकात पुण्यात उद्योगधंदे, प्रामुख्याने वाहन उद्योगातील कंपन्या झपाट्याने वाढत होत्या. हे लक्षात घेऊन कल्याणींनी मुंढवा येथे आपला फोर्जिंगचा नवीन कारखाना काढला.  या उद्योगाला केवळ देशातच नाही, तर विदेशातून मागणी येऊ लागली. 1974 मध्ये भारत फोर्जने निर्यातीला प्रारंभ केला. त्यानंतर दोनच वर्षांत देशात मोठ्या प्रमाणावर संप, आंदोलने सुरू झाली आणि उद्योगधंद्यांसाठी मोठा कठीण काळ आला. सुरुवातीला आणीबाणी, त्यानंतर जनता पक्षाची राजवट यात उद्योगधंद्यांना मोठ्या संकटातून जावे लागले. त्या काळी भारत फोर्जमध्येही 77 दिवसांचा झालेला संप गाजला होता. देशाला पोलादाची गरज मोठ्या प्रमाणात लागणार हे ओळखून त्यांनी कल्याणी स्टील हा पोलाद निर्मितीचा प्रकल्प 1973 मध्ये उभारला. कोरेगाव भीमा येथे एलोरा इंजिनिअरिंग, म्हैसूर येथे रॉकवेल ऑटोमोटिव्ह, जळगाव येथे कल्याणी ब्रेक्स, कल्याणी शार्प असे नवीन प्रकल्प उभारून आपल्या उद्योगसमूहास देशपातळीवर पोहोचवले. 1980 नंतर उद्योगधंद्यांचा भरभराटीचा काळ सुरू झाला. याच काळात नीळकंठरावांनी आपले पुत्र बाबा कल्याणी यांच्याकडे हळूहळू कंपनीची सूत्रे सोपवण्यास सुरुवात केली. 
बाबा कल्याणी यांनी बिट्स पिलानी येथील नामवंत शिक्षण संस्थेतून तसेच विदेशातून अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेतले होते. देशाभोवती मोठे आर्थिक संकट 91 मध्ये आले. आपण आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेस प्रारंभ केला. त्या वेळी कल्याणी समूहाकडे तरुण तडफदार नेतृत्व बाबा कल्याणींच्या रूपाने तयार होते. नीळकंठराव त्या वेळी विशेष सक्रिय नसले तरी त्यांचे समूहातील प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष असे. नीळकंठरावांनी कराडहून ज्या उद्योगसमूहाची स्थापना केली त्या समूहाला त्यांनी देशपातळीवर नेले. त्यांच्या पुत्राने तर हाच समूह जागतिक पातळीवर नेला आणि दोन अब्ज डॉलरहून जास्त उलाढाल करून दाखवली. कल्याणी समूहातील कंपन्यांची नोंदणी विदेशातील शेअर बाजारात केली. याच काळात कल्याणी समूहातील बाबांचे नाव फोर्ब्जच्या यादीत झळकले. नवीन आर्थिक धोरणाचा फायदा करून घेऊन आपला उद्योगसमूह भरभराटीस नेल्याचे नीळकंठरावांनी पाहिले. शून्यातून उभारलेल्या आपल्या उद्योगसमूहाचा हा वटवृक्ष जगात पोहोचल्याचे त्यांनी पाहिले. संमिश्र अर्थव्यवस्थेच्या काळात नीळकंठरावांनी बहुतांशी उद्योगधंदे उभारले. ते उभारताना नफा-तोट्याचा विचार केला नाही. जो उद्योगधंदा आपण करीत आहोत ती देशसेवा आहे, असे समजून उद्योगांची स्थापना केली. आपल्या उद्योगातील कामगारांसाठी त्यांनी कल्याणीनगर उभारले ते याच भावनेतून. अशा प्रकारे जुन्या पिढीत वाढलेला व नवीन अर्थव्यवस्थेशी जवळचे नाते सांगणारा दूरदृष्टी असलेला हा उद्योजक काळाच्या पडद्याआड गेल्याने उद्योग क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. देशाच्या औद्योगिक नकाशावर नीळकंठ कल्याणींचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.

0 Response to "महाराष्ट्राचा ‘नीळकंठ’ ( अग्रलेख)"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel