-->
घबराटीचे अर्थकारण (अग्रलेख)

घबराटीचे अर्थकारण (अग्रलेख)

दिव्‍य मराठी | Aug 24, 2013 EDIT

डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 63 च्या वर गेल्याने आपल्या अर्थव्यवस्थेवर फार मोठे संकट आले असल्याचे चित्र सध्या निर्माण केले जात आहे. त्यावर जागतिक बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ कौशिक बसू यांनी फार मार्मिक टिप्पणी केली आहे. त्यांच्या मते, वृत्तपत्रांतून रुपयाच्या घसरणीचे जे चित्र रंगवले जात आहे ते तेवढे वास्तववादी नाही. रुपयाच्या घसरणीचे जसे तोटे आहेत तसे फायदेही आहेत. रुपयाच्या घसरणीच्या तोट्यांवर लक्ष केंद्रित करून अश्रू ढाळण्यापेक्षा त्यामुळे होत असलेल्या फायद्यावर जादा लक्ष देऊन आपल्या अर्थव्यवस्थेला त्यातून कशी चालना देता येईल, हे पाहणे शहाणपणाचे ठरेल. चलनाची ही घसरण फक्त आपल्याच देशात नाही तर झपाट्याने अर्थव्यवस्था विस्तारणा-या पाच देशांच्या समूहातील सर्वांना भेडसावणारी समस्या आहे. बरे रुपयाची घसरण ही आपण आर्थिक उदारीकरण स्वीकारल्यापासून घडलेली काही नवीन घटना नाही. उदारीकरणापूर्वीही सरकार रुपयाचे अवमूल्यन जाहीर करतच असे. 2011 मध्ये तर रुपया 20 टक्क्यांनी घसरून 44वरून 54वर पोहोचला होता. त्याउलट आता जून महिन्यापासून रुपया 15 टक्क्यांनीच घसरलेला आहे. आपल्यासारख्या विकसनशील देशाच्या चलनाचे मूल्य घसरणे ही काही नवीन बाब राहिलेली नाही. ती एक निरंतर प्रक्रिया असते. अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारणेच्या वाटेवर लागल्याने तेथे उद्योगधंद्यांना दिलेल्या सवलती आता मागे घेतल्या जात आहेत. याचा परिणाम म्हणून विकसनशील देशांत केली जाणारी गुंतवणूक मंदावण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ‘अंकल सॅम’ने भारतातील आपली गुंतवणूक काढून घेऊन ती अमेरिकेत गुंतवण्यास सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की, जून महिन्यापासून रुपयाची घसरण सुरू झाली. त्याचबरोबर सध्या आपली चालू खात्यातील तूट वाढली आहे. सध्या आपल्याकडे विदेशी चलनाचा राखीव साठा पुरेसा असला तरी सात महिने पुरेल एवढाच आहे. अशा स्थितीत रिझर्व्ह बँक बाजारात हस्तक्षेप करण्यास कचरत आहे. त्याच्या जोडीला विकास दर घसरून पाच टक्क्यांवर खाली आला आहे. विकास दराचा वेग आपण एकेकाळी नऊ टक्के गाठला होता. परंतु गेल्या पाच वर्षांतील जागतिक मंदीचे पडसाद आपल्याला भोगावे लागले. रुपयाची घसरण रोखण्यासाठी गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने भारतीय नागरिक व कंपन्यांना विदेशात मालमत्ता खरेदीवर निर्बंध आणल्याने एकूणच सरकारबद्दल निराशेचे वातावरण निर्माण झाले. त्यातच चलन बाजारात होणारी सट्टेबाजी रुपयाच्या घसरणीत भर घालत आहे.

सध्याच्या अंदाजानुसार रुपयाचे मूल्य 65 ते 70च्या दरम्यान स्थिरावेल, असा अंदाज आहे. यामुळे आयात होणारी प्रत्येक वस्तू महाग होणार असल्याने सर्वात मोठा फटका पेट्रोलियम पदार्थांना बसेल. सोनेदेखील त्यामुळेच चढत आहे. अर्थात, सोने महागल्याने आम आदमीला काही विशेष फटका सहन करावा लागणार नाही. मात्र पेट्रोलियम पदार्थांनी आपल्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येईल आणि महागाईही वाढेल. मात्र रुपयाच्या घसरणीमुळे अनेक उद्योगांना फायदाही होणार आहे. यात प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान, औषधे, मेटल्स, मेडिकल टुरिझम व निर्यातप्रधान उद्योगांचा समावेश असेल. आपल्याकडे गेल्या काही वर्षांत तयार कपडे उद्योगांची निर्यात मंदावली होती. परंतु आता रुपयाच्या घसरणीमुळे ही निर्यात वाढण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेतील मंदी ओसरू लागल्याने आपल्याला ही निर्यात आता वाढवता येईल. मेडिकल टुरिझम हेदेखील क्षेत्र रुपयाच्या घसरणीमुळे वाढणार आहे. आपल्याकडे जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा आहेत. अमेरिका व युरोपातील महागड्या वैद्यकीय सेवांना पर्याय म्हणून तेथील अनेक रुग्ण भारतात येऊन येथे उपचार करतात. आता या सेवांना चांगले दिवस येतील व आपल्याला विदेशी चलन मिळू शकते. विदेशी पर्यटकांना भारतात येणे- मग ते वैद्यकीय कारणासाठी असो वा फिरण्यासाठी- आकर्षक ठरले आहे. मात्र भारतातून विदेशात पर्यटनाला जाणा-यांच्या मात्र खिशाला जास्त खार पडेल. औषध व आयटी उद्योगांनाही रुपयाच्या घसरणीचा लाभ उठवता येईल. भारत हे औषधांचे एक मोठे उत्पादन केंद्र झाले आहे. देशात उपलब्ध असलेले स्वस्त मजूर व उच्चशिक्षित कर्मचारी याचा फायदा घेत अनेक बहुराष्ट्रीय औषध कंपन्या भारताचा उत्पादन करण्यासाठी वापर करतात आणि येथून जगात विविध औषधांची मोठी निर्यात होते. रुपयाच्या घसरणीचा औषधांच्या निर्यातवृद्धीसाठी उपयोग होईल. आयटी उद्योगानेदेखील मोठ्या प्रमाणावर गेल्या काही वर्षांत निर्यात करून आपला ठसा जागतिक बाजारपेठेत उमटवला आहे. आता या उद्योगाची निर्यात वाढण्यास मदत होईल. या कंपन्यांना आता जास्त आक्रमकतेने युरोपीय बाजारपेठेत प्रवेश करता येईल. त्यामुळे पुढील काही वर्षांत आयटी उद्योगातील भारतीय कंपन्या अधिक जोमाने जागतिक बाजारपेठेत वाटचाल करताना दिसतील. अर्थातच याचा देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होणार आहे. अशा प्रकारे आपण रुपयाच्या घसरणीमुळे ज्या उद्योगांना फायदा होणार आहे त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून निर्यात वाढवल्यास आपल्या अर्थव्यवस्थेवरील सध्याचे संकट सौम्य होण्यास मदत होईल. रुपयाच्या घसरणीमुळे मनात घबराट निर्माण करून घेण्यात काहीच अर्थ नाही. उलट अशी घबराट निर्माण केल्यास त्याचे दीर्घकालीन परिणाम आपल्याला भोगावे लागतील, हे विसरता कामा नये.

0 Response to "घबराटीचे अर्थकारण (अग्रलेख)"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel