-->
प्रचारक राष्ट्रपती भवनात!

प्रचारक राष्ट्रपती भवनात!

बुधवार दि. 21 जून 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
प्रचारक राष्ट्रपती भवनात! 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रपतीपदीही संघाचे एकेकाळचे प्रचारक व विद्यमान बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांची नियुक्ती होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. त्यामुळे देशातील या दोन सर्वेच्चपदी आता संघाचे प्रचारक असतील. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात झालेला हा सर्वात मोठा बदल म्हटला पाहिजे. अर्थात सध्या भाजपा आपण दलित राष्ट्रपती करीत असल्याचा मोठा आव आणीत आहे. परंतु देशाच्या राष्ट्रपतीपदी पोहोचणारे ते काही पहिले दलित ठरणार नाहीत. यापूर्वी के.आर. नारायणन हे राष्ट्रपतीपदी आरुढ झालेले पहिले दलित होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधक कितीही एकत्र आले तरीही एन.डी.ए.चा उमेदवार विजयीच ठरणार हे नक्कीच आहे. त्यामुळे राष्ट्रपतीभवनात पोहोचणारे कोविंद हे पहिले प्रचारक ठरणार आहेत. राष्ट्रपतिपदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एन.डी.ए.चा कोणता उमेदवार देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. उद्योगपती रतन टाटांपासून ते विद्यमान सभापती सुमित्रा महाजन यांच्यापर्यंत अनेक नावांची चर्चा होती. मात्र यासंबंधी लालूप्रसाद यादव यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते की, सध्या भावी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण असेल ते नाव मोदींच्या पोटात आहे. अखेर लालूंची ही भविष्यवाणी खरीच ठरली.  मोदींनी विरोधक व जनता या दोघांनाही चकित केले. भाजपाच्या नेत्यांनी सर्व विरोधकांशी एक सोपस्कार म्हणून चर्चा कोली होती. माकप नेते सिताराम येचुरी यांच्या सांगण्यानुसार, हा एक जनसंपर्क करण्याचा प्रकार होता. कोणतेही नाव भाजपाने पुढे ठेवले नव्हेत. त्यामुळे एकमताने ही निवडणूक होणे कठीण आहे. आता भाजपानेही विरोधकांचा पाठिंबा मागणे हा देखील एक उपचारच केला आहे. भाजपाने ही निवडणूक मोठ्या फरकाने जिंकण्याची मोर्चेबांधणी केली आहे. येत्या काही दिवसात भाजपाचे अध्यक्ष संपूर्ण देशाचा दौरा करणार आहेत. नुकताच त्यांनी मुंबईतही दौरा केला होता. आपण दलित उमेदवार देऊन फार मोठी बाजी मारीत आहोत असे भाजपाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. कारण एक तर हा पहिला दलित राष्ट्रपती नव्हे. दुसरे म्हणजे राष्ट्रपतीपदासारख्या उमेदवाराचा विचार करताना एखाद्या जातीला महत्व न देणे हेच योग्य राहिल. कारण राष्ट्रपतीपदासाठी असे राजकारण करणे चुकीचे आहे. कोविंद हे किती चांगले उमेदवार आहेत हे सांगण्याच आता प्रयत्न होईलही. मात्र ते संघाचे असल्याने निर्धमी राजकारण करण्यांना हे नाव कदापी पसंत पडणारे नाही. यासंबंधी अ‍ॅड् प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलेली प्रतिक्रीया अतिशय बोलकी आहे. आम्ही संविधानवादी आहोत, संघवादी नाही, असे आंबेडकर म्हणतात ते काही चुकीचे नाही. कॉग्रेसने याला उत्तर म्हणून लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीराकुमार यांची निवड करण्याचे ठरविलेले दिसते. बहुदा त्यांचेच नाव विरोधकांचा उमेदवार म्हणून जाहीर होईल. यामुळे सत्ताधार्‍यांच्या घोषणेतील हवाच काढली जाणार आहेत. कारण मीराकुमार या दलित आहेतच शिवाय त्या तुल्यबळ ठरणार्‍या आहेत. तसेच त्या बिहारच्या देखील आहेत. त्यामुळे कोविंद यांच्या निवडणुकीला खरे आव्हान मीरा कुमार देऊ शकतील. मात्र विरोधकांची ताकद तशी कमीच आहे. खरे तर मोदींनी एक चांगली संधी या निवडीच्या निमित्ताने गमावली आहे, असे म्हणता येईल. आज त्यांच्याकडे एकादा उमेदवार निवडून आणण्याची ताकद आहे, त्यामुळे कोणत्याही जातिच्या चौकटीत न अडकता भारताला आधुनिकतेकडे नेणारा एखादा चेहरा दिला असता तर मोदींचे निश्‍चितच कौतुक झाले असते. मात्र मोदींनी जातीच्या चौकटीबरोबरच पक्षाची प्रतिमा उजळविण्याचा प्रयत्न करण्याला प्राधान्य दिले.  ज्याप्रकारे अटलबिहारी वाजपेयींनी पंतप्रधानपदी असताना अब्दुल कलाम यांचे वान सुचवून खर्‍या अर्थाने सर्वांना चकित केले होते, तसे काही यावेळी घडले नाही. मात्र तसे करण्याची संधी मोदी यांनी गमावली आहे, असेच म्हणावे लागेल. मात्र मोदींच्या राजकारणाची दिशा लक्षात आली तर कोविंद यांची उमेदवारी समजून घेता येते. देशाला वेगळे वळण देण्याची भाषा मोदी करत असले तरी त्याआधी भाजपचे स्थान पक्के होणे हे महत्त्वाचे आहे. मोदी व शहा यांचे प्रत्येक पाऊल त्या दिशेने पडत असते. सरकारच्या धोरणात अडचणी आणू शकणार्‍या व्यक्तीला राष्ट्रपतिपदावर मोदी बसवणार नाहीत. तसेच संघाच्या विचारसरणीशी जवळीक असलेल्या व्यक्तीची निवड अपेक्षित होतीच. मोदी सरकार हे दलितविरोधी आहे, असा प्रचार सातत्याने सुरू असल्याने त्याला उत्तर दिले जाणार हे अपेक्षित होते. संघनिष्ठा, संसदीय कामाची समज व वादापासून दूर हे तीन गुण कोविंद यांच्याकडे आहेत. राज्यपाल म्हणून त्यांची बिहारमधील कामगिरी चांगली आहे. किंबहुना नितीशकुमार त्यांच्या कामावर खुश आहेत. दलित नेता अशी त्यांची ओळख नाही. मात्र, ती ओळखच आता महत्त्वाची ठरेल. शिवसेना मोठा आव आणून गेले काही दिवस रससंघचालक मोहन भागवत व डॉ. स्वामीनाथन यांचे नाव पुढे करीत होते. परंतु ही नावे कुणालाच मान्य होणारी नव्हती. सरसंघचालक तर थेट राष्ट्रपती होणार नाहीत. संघाची तशी काम करण्याची स्टाईलच नाही. त्यामुळे शिवसेनेची नावे ही निव्वळ करमणूकच होती. शिवसेनेच्या अपरिपक्व राजकारणाचा तो एक भाग झाला. आता शिवसेना कोणाला पाठिंबा दर्शविते ते महत्वाचे ठरणार आहे. शिवसेनेचा हिंदुत्वाचा अजेंडा कोविंद यांच्या राष्ट्रपती होण्याने पूर्ण होऊ शकतो. अशा स्थितीत शिवसेना त्यांना पाठिंबा देईल का ते पहावे लागेल.
---------------------------------------------------------

0 Response to "प्रचारक राष्ट्रपती भवनात! "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel