-->
तुझ्या गळा, माझ्या गळा...

तुझ्या गळा, माझ्या गळा...

बुधवार दि. 05 डिसेंबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
तुझ्या गळा, माझ्या गळा...
शिवसेना आणि भाजप यांच्यातले संबंध हे तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो अशा प्रकारातले आहेत हे आता नव्याने सांगण्यचे काही कारण नाही. आता जशा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत तशा तुझ्या गळा, माझ्या गळा... चा फार्स आता सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपाने 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपली वेगळी चूल बांधली असली तरी नंतर सत्तेसाठी हे दोघे एकत्र आले. निवदान त्यावेळी शिवसेनेने सत्तेत शिरण्यासाठी त्यावेळी निदान बराच आटापिटा केला होता. त्यानंतर उभयतांनी सत्तेतील मलिदा खात असताना एकमेकांना पाण्यातच पाहिले. आता जसा लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत तसे भाजपाला समजून चुकले ाहे की, जर आपम शिवसेनेना सोबत घेतले नाही तर राज्यात यावेळी आपले मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आता कमळाबाईने डोळे मारण्यार सुरुवात केली. शिवसेनेलाही याची कल्पना होती. त्यामुळे गेल्या साडेचार वर्षात कितीही शिव्या दिल्या तरी भाजपा आपल्याकडे युतीकरायला येण्यारच हा त्यांचा आखाडा होता व तो आता खरा होत आहे. भाजपा नेत्यांच्या यातूनच मातोश्रीच्या वार्‍या वाढू लागल्या आहेत. यातूनच आता युतीच्या शक्यतेचे पतंग उडवले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाशिम जिल्ह्यातल्या एका कार्यक्रमात एकत्र आल्याने युतीचे पतंग उडवण्याच्या प्रकाराला आणखी हवा दिली गेली. अर्थात अशा प्रकारची हवा देण्याचे काम माध्यमांना हाताशी धरुन मुद्दाम केली जात आहे, हे सांगावयास नकोच. आता त्यानंतर आपली पत वाढवून घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी लगेच शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आणि सरकारविरोधात आक्रमक होण्याचे आदेश देत युतीचा पतंगच कापला. खरे तर शिवसेनेने स्वबळाचा नारा देऊन आता तीन वर्षे लोटली आहेत. त्यामुळे उध्दव ठाकरे हे आपला शब्द फिरविणार नाहीत असे गृहीत धरले तर युती होऊ शकत नाही. परंतु सत्ता काबीज करावयाची असेल तर स्वबळावर जाऊन अवलक्षण करुन दाखविणे हे गणित नक्की आहे. त्यामुळे ठाकरे आपला शब्द फिरवून युतीचे घोडे अखेरच्या क्षणी दामटू शकतात. अगदी शेवटच्या क्षणी हे केल्यास आपली जास्त जागा मिळविण्याची हौस देखील फिटू शकते असाही त्यांचा कयास असावा. सगळेच जर सुरळीत झाले तर ते राजकारण कसले? शिवसेनेला काहीही करुन आपल्या कर्‍ह्यात आणावयाचेच असा चंग भाजपाने बांधला आहे. भर सभेत स्वबळाचा नारा आणि पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असे सांगणार्‍या उद्धव ठाकरेंना गृहीत धरुन भाजपा आपली गणिते आखत आहे. शिवसेना-भाजपाचे सध्या ताणले गेलेले संबंध हे दोघे ठरवून करीत आहेत, की शिवसेनेला खरोखरीच स्वबळावर निवडणूक लढवायची ाहे, यासंबंधी आजवर सर्वच राजकीय विश्‍लेषकांचे निकाल खोटे ठरतील असा अंदाज आहे. शिवसेनेने स्वबळाची भूमिका जाहीर केल्यानंतर सुधीर मुनगंटीवारांनी मातोश्री दरबारी जाऊन प्रयत्न केले. त्यावर शिवसेनेनेही आपल्या स्वबळाच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. तरीही गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील एवढेच नाही तर दस्तुरखुद्द मुख्यमंत्रीही शिवसेनेची आळवणी करताना पाहायला मिळाले. ही आळवणी सुरु असताना कोणी काही बोलले नाही. पण कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघे नेते एकत्र आले आणि चर्चा सुरु झाली. लोकसभेचे घोडामैदान आता पार दूर नाही. पाच राज्यांच्या विधानसभेचे निकाल लागल्यावर भाजपा आपली पुढील धोरण आखेल. परंतु शिवसेना त्यांना यावेळी सोबत लागणार हे नक्कीच. राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो, याचे प्रतिबिंब सध्या राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. भाजप-शिवसेनेत कमालीचा दुरावा झाल्यानंतर शिवसेनेला कोकणात शह देण्यासाठी भाजपने राणे यांना आपल्या गोटात ओढले होते. काँग्रेसच्या विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा द्यायला लावून नारायण राणे यांना भाजपाने राज्यसभेवर पाठविले. आता भाजप व शिवसेनेत चार वर्षांच्या कटूतेनंतर पुन्हा दिलजमाई होत असेल तर शिवसेनेचे कट्टर विरोधक राणे भाजप आघाडीतून आऊट होण्याच्या तयारीत असल्याची चिन्हे दिसत आहेत.  राणे यांच्यापेक्षा भाजपला शिवसेनेचाच अधिक आधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, भाजपच्या या राजकीय कुटनितीच्या जाळ्यात अडकलेल्या राणे यांनी पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची वाट धरण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसने राणेंसाठी दरवाजे सध्या तरी बंद केल्याचे स्पष्ट संकेत मिळाल्यावर राणे बहुदा राष्ट्रवादीची वाट धरतील असेच दिसते. शरद पवार यांनी राणे यांची त्यांच्या गावी जाऊन भेट घेतली. त्यापूर्वी काही दिवसांपासूनच राणे राष्ट्रवादीच्या सोबत जाण्याची जोरदार चर्चा होती. काँग्रेसमध्ये परत घेतील याची खात्री वाटत नसल्याने त्यावर सुवर्णमध्य म्हणून शरद पवार यांनी राणे यांना राष्ट्रवादीच्या सोबत येण्याचे आवाहन केल्याचे सूत्रांचे मत आहे. राणे यांच्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभेसह इतर चार विधानसभा मतदारसंघावर राजकीय समीकरणे बदलू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. कोकणातील मराठा समाजात नारायण राणे यांच्याबद्दल सहानुभूती आहे. पहिल्यांदा आरक्षणाचा निर्णय घेण्यात राणे यांच्या समितीचे सर्वाधिक योगदान होते, हे मराठा समाज नाकारत नाही. अशा राजकीय स्थितीत राणे आघाडीत सामील झाले, तर कोकणात नवी राजकीय समीकरणे दिसतील, असा दावा केला जात आहे. बहुदा राणे नवी समीकरणे जुळवून भाजपा विरोधी गोटात येतील असे दिसते.
-------------------------------------------------------------------

0 Response to "तुझ्या गळा, माझ्या गळा..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel