-->
रोखठोक राज ठाकरे

रोखठोक राज ठाकरे

मंगळवार दि. 04 डिसेंबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
रोखठोक राज ठाकरे
ठाकरे घराण्यातील रोखठोकपणा काही नवीन नाही. बाळासाहेब ठाकरे यांची तर रोखठोकपणाबद्दल ख्यातीच होती. बाळासाहेब कधी कोणाच्या तोंडावर काय सुनावतील याची खात्री नसायीच. बाळासाहेबांचे वडिल प्रबोधनकारांचा तर रोखठोकपणाबाबत कुणीच हात धरु शकत नाही. त्यांनी अंधश्रध्दा व देवाधर्मावर एवढी जहरी जाहीरपणाने टीका केली आहे व लिहून ठेवली आहे की त्यातून त्यांचा स्पष्टवक्तेपणा सर्वांनाच जाणवतो. मात्र या ठाकरे घराण्यात उध्दव ठाकरे यांचा स्पष्टवक्तेपणा अजून तरी काही दिसत नाही. उलट सत्तेत राहून सत्तेचा मलिदा लाटत आपल्या सहकारी पक्षावर टीका करुन आपण विरोधातच आहोत असे भासवून ते दोन्ही ढोलकी बडवत असतात. त्याउलट त्यांचे चुलत बंधू राज ठाकरे रोखठोक आहेत. एवढे सर्व सांगण्याचे निमित्त एवढेच होते की, राज ठाकरेंनी रविवारी उत्तर भारतीय महापंचायततर्फे आयोजित केलेल्या सभेत जोरदार भाषण केले. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचे हे ठाकरी भाषेतील भाषण हिंदीतून झाले. आपल्या वडिलांना उत्तम हिंदी व उर्दू येत होते याची आठवण करुन देत त्यांनी हिंदी ही सुंदर भाषा असली तरी ती राष्ट्रभाषा नाही. मुळात तसा निर्णयच कधी झालेला नाही. मी तुमच्यासमोर स्पष्टीकरण द्यायला आलो नाही. आयोजकांना माझी भूमिका उत्तर प्रदेश-बिहारमध्येही दाखवायची आहे म्हणून मी हिंदीत बोलत आहे, अशी सुरुवात करून ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना खडे बोल ऐकवले. आपलीच जुनी भूमिका मांडावयास आलो आहेत असे त्यांनी सांगितले असले तरी त्यांना हिंदी मतपेढीत शिरावयाचे असल्यानेच त्यांनी हे भाषण केले असे म्हणावे लागेल. उत्तर भारतीयांच्या सभेत राज ठाकरे यांनी हातचे काहीही न राखता आपला स्पष्टवक्तेपणा दाखवून दिला असला तरी मुळात या कार्यक्रमामागील ठाकरे यांचा हेतू काय होता, अशीही चर्चा आता होणे स्वाभाविकच आहे. त्यांना उत्तर भारतीय मतपेढीमध्ये शिरकाव करायचा आहे, की उत्तर भारतीयांबाबतची कठोर भूमिका पुन्हा दाखवून मराठी मतदारांमधील विश्‍वास बळकट करायचा आहे, या प्रश्‍नांची उत्तरे आत्ताच देता येणार नाहीत. राजसाहेबांनी या सभेत मांडलेले मुद्दे हे सर्वांनाच पटण्यासारखे आहेत. स्थानिक विरुध्द बाहेरुन आलेले हा संघर्ष काही नवा नाही. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यात हा संघर्ष झाला आहे. हे सांगताना त्यांनी देशा-विदेशातील इतिहासातली व आत्ताची अनेक उदाहरणे दिली. त्यामुळे या सभेसाठी राज ठाकरेंनी चांगलेच होम वर्क केले होते, हे स्पष्टपणे जाणवले. सच कडवा है, वो समझना चाहिये... आपको भी, अशी सुरुवात करून राज ठाकरे आपली भूमिका ठोसपणाने मांडत गेले. स्थानिक लोक रोजगारापासून वंचित होणार नाहीत हे पहायला हवे, असे इंदिरा गांधी यांनीच म्हटले होते. उत्तर प्रदेश-बिहार येथील उद्योगांमध्ये तेथील लोकांना प्रथम प्राधान्य मिळाले पाहिजे. तसेच महाराष्ट्रातल्या उद्योगांमध्ये मराठी व्यक्तींना प्राधान्य मिळालेच पाहिजे; मात्र महाराष्ट्रातील रेल्वे नोकरभरतीच्या जाहिराती उत्तर प्रदेश-बिहारमध्ये प्रसिद्ध होतात. नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य, फेरीवाल्यांची समस्या या बाबी आम्ही उत्तर भारतीयांना सांगायला गेलो तेव्हा आमच्याशी बोलताना अत्यंत वाईट भाषा वापरली गेली, त्याचमुळे संघर्ष झाला, असेही त्यांनी आपण केलेल्या हिंसाचाराचे स्पष्टीकरण दिले. सभेच्या सुरुवातीला आपण स्पष्टीकरण देण्यासाठी आलेलो नाही असे जरी त्यांनी सांगून अब्राहम लिंकन यांचे यासंबंधीचे म्हणणे सांगितले असले तरीही राज ठाकरे यांची ही सभा ही स्पष्टीकरणासाठीच होती, असे म्हमावे लागेल. पंडित नेहरू ते थेट नरेंद्र मोदींपर्यंत अनेक पंतप्रधान उत्तर प्रदेशातून निवडून आले, तरीही त्या राज्याचा विकास झाला नाही. नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना स्थलांतर करावे लागते. इतर राज्यांत जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मारहाण, अपमान सहन करावा लागतो. आपल्या राज्यांचा विकास का केला नाही, असा प्रश्‍न तुम्ही या नेत्यांना का विचारत नाही? तुमचा स्वाभिमान गेला कुठे? अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांवर प्रश्‍नांची सरबत्ती केली. यात चूक असे काहीच नाही. या प्रश्‍नांची उत्तरे राज्यकर्त्यांनी दिलीच पाहिजेत. संघर्ष करायची मला इच्छा नाही, पण परिस्थिती बदलली नाही, तर राज्याराज्यांत संघर्ष होईल. म्हणून सांगतो, तुम्ही तुमच्या नेत्यांना उत्तर प्रदेश, बिहारची स्थिती सुधारायला सांगा. साठीच्या दशकात दाक्षिणात्यांच्या लोंढ्यांविरोधात मुंबईत आंदोलने झाली. त्यानंतर, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशसारख्या राज्यांनी उद्योगात प्रगती केली आणि लोंढे थांबले, हे राज ठाकरे यांचे म्हणणे काही खोटे नाही. आता उलट अशी स्थीती आहे की, उच्चशिक्षीत मराठी मुले आज बंगलोर, हैद्राबाद, चेन्नई येथे जाऊन नोकर्‍या करीत आहेत. प्रत्येक राज्यात तेथील प्रादेशिक, भाषिक अस्मितेसाठी संघर्ष होतात. रोजगार जिकडे उपलब्ध असतो तिकडे लोकांचे तांडे पोहोचताच. यासाठी औद्योगिकीकरणाचे केंद्राकरण नको आहे तर विक्रेंद्राकीरण झाले पाहिजे. स्तानिकांना आपल्या परिसरात जर रोजगार मिळाला तर ते बाहेरच्या राज्यात जातीलच कशाला? हा राज ठाकरेंचा सवाल काही चुकीचा नाही. स्थानिकांना रोजगारात प्राधान्य दिले पाहिजे या राज ठाकरेंच्या मागणीतही तथ्य आहे. एकूणच पाहता, राज ठाकरे यांच्या रोखठोक भाषणाने अनेक गैरसमज दूर होतील, यात काही शंका नाही. यातून हिंदी भाषिकांच्या मतपेढीत त्यांनी हात घातला आहे. त्याचबरोबर त्यांना कदाचित भाजपाविरोधी महाआघाडीचे दरवाजेही खुले होऊ शकतील.
------------------------------------------------------------

0 Response to "रोखठोक राज ठाकरे"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel